‘विज्ञान किती मनावर घ्यायचे, याबद्दल इथे वाटाघाटी सुरू दिसतात’ हे २०२३ मधल्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषदेच्या ‘प्रगती’बद्दल न्यू यॉर्क टाइम्सने विचारले असता योहान रॉकस्ट्रूम यांनी केलेले विधान खरे तर संयत शब्दांत संतापच व्यक्त करणारे होते. जर तुम्हाला विज्ञान काही सांगते आहे, काही इशारे देते आहे, तर ते ऐकले का जात नाही याबद्दलचा संताप. तो पर्यावरणाच्या बाबतीत ज्या फार थोड्यांना शोभतो त्यांमध्ये योहान रॉकस्ट्रूम यांचे नाव वरचे, कारण त्यांनी ‘प्लॅनेटरी बाउंड्रीज’- ग्रहजीवनाच्या सीमा- ही संकल्पना मांडून, त्यामध्ये नऊ सीमा कल्पून, प्रत्येक सीमेवर आपली किती हानी झाली आहे याचे विज्ञाननिष्ठ मोजमाप करण्याच्या पद्धती रूढ करण्यास प्राधान्य दिले! या कार्याचा गौरव म्हणून नुकताच त्यांना ‘टायलर प्राइझ फॉर एन्व्हायर्न्मेंटल अचीव्हमेंट’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पदक आणि अडीच लाख डॉलर रोख अशा स्वरूपाचा हा पुरस्कार, १७ मे रोजी त्यांना देण्यात येईल.
पुरस्काराचा सोहळाही विज्ञाननिष्ठच असेल. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातर्फे हा पुरस्कार जाहीर होत असला तरी तो घेण्यासाठी मानकरी तिथे जात नाहीत. त्याऐवजी त्यांच्याच संस्थेत त्यांचे व्याख्यान ठेवून तिथे त्यांना सन्मानित केले जाते, त्यानुसार प्रा. रॉकस्ट्रूम यांचे व्याख्यान जर्मनीतील ‘पोट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रीसर्च’ या संस्थेत होईल. या संस्थेचे ते संचालक आहेत. मूळचे स्वीडिश असलेल्या रॉकस्ट्रूम यांनी सन १९९२ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर फ्रान्समध्ये शेती व पर्यावरणविषयक पदवी घेतली आणि स्टॉकहोमला परतून पीएच.डी. संशोधन केले. त्यांचे काम २०१५ पर्यंत संधारणाला प्राधान्य देणारे होते. पण हानी इतकी प्रचंड होत असताना ती मोजली गेली पाहिजे, हे लक्षात आल्याने त्या प्रकारचे संशोधन त्यांनी सुरू केले. ‘प्लॅनेटरी बाउंड्रीज’ म्हणजे हवामान बदल, जैवविविधता व प्रजातींचे नामशेष होणे, सागरी आम्लतावाढ, जैव-भूरासायनिक प्रवाह (फॉस्फरस व नायट्रोजन चक्रे), जमीनवापरात बदल, ताज्या पाण्याचा वापर, वातावरणातील घातक सूक्ष्मकण-प्रमाण आणि अपरिचित घटकांचा आढळ असे नऊ घटक. ते सारे आपल्याला ऐकून माहीतच असतात, पण रॉकस्ट्रूम यांनी यातील प्रत्येक घटकाचे मोजमाप करण्याच्या पद्धतींवर भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नऊपैकी सात ‘सीमा’- घटकांच्या मापनपद्धती विज्ञानमान्य ठरल्या, दोन अन्य संशोधकांनी शोधल्या. या नऊपैकी सहा सीमांवर आपण ‘हरतो’ आहोत, हे संशोधनाअंती मोजूनमापून सिद्ध झालेले आहे. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मिळणारा ‘राइट लाइव्हलीहुड’ हा टायलर पुरस्कार, पर्यावरण-विज्ञानाच्या क्षेत्रापुरता मर्यादित आहे. तरी रॉकस्ट्रूम यांना तो मिळणे हा त्यांच्या संशोधनासोबतच त्यांच्या संयत संतापाचाही सन्मान आहे!