दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात नव्या ब्रिटनला आकार कोणी दिला? याचे राजकीय/ आर्थिक क्षेत्रातले उत्तर काहीही असो… ब्रिटनमधल्या रोजच्या जगण्याचा अनुभव त्या काळात पालटून टाकण्याचे काम मात्र केनेथ ग्रेंज यांनीच केले! त्यामुळेच तर ‘सर’ ही पदवी त्यांना मिळाली होती. ते अभिकल्पकार- म्हणजे डिझायनर. त्यातही, ‘इंडस्ट्रिअल डिझाइन’ हे त्यांचे क्षेत्र. फॅशन डिझायनर जसे झटपट प्रसिद्धी मिळवतात, तसे इंडस्ट्रिअल डिझाइनमध्ये नसते. रोजच्या वापरातली, मोठ्या प्रमाणावर तयार होऊन एखाद्या देशातच नव्हे तर जगभर जाणारी उत्पादने डिझाइन करणारे कैक जण तर निनावीच राहातात. पण याला जे अनेक सन्माननीय अपवाद आहेत, त्यांपैकी केनेथ ग्रेंज हे सर्वांत ज्येष्ठ होते. ९२ वर्षांचे होऊन २१ जुलै रोजी ते निवर्तले.

‘केनवूड’चे मिक्सर-ग्राइंडर कसे दिसावेत, हे त्यांनी ठरवले. ‘कोडॅक’ने पहिला झटपट कॅमेरा बाजारात आणला तोही केनेथ यांनी अभिकल्पित केला होता. त्याहीपेक्षा, मुंबईच्या लोकलगाडीचे ‘मिलेनियम रेक’ समोरून जसे दिसतात त्यांच्या डिझाइनचा मूळ स्राोत असलेली ‘ब्रिटिश हायस्पीड ट्रेन- १२५’ केनेथ यांनीच साकारली होती. विजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्यांचा तोवर चपटाच असणारा ‘चेहरा’ त्यांच्यामुळे बदलला! मग ब्रिटनभरच्या टपालपेट्याही त्यांच्या डिझाइननुसार तयार झाल्या. लंडनमध्ये पहिल्यांदाच ‘२० पेन्स टाका आणि दोन तास मोटार उभी करा’ अशी हमी देणारी ‘पार्किंग मीटर्स’ त्यांनीच डिझाइन केली, त्यांत ‘दोन तासांपेक्षा जास्त वेळ झाला, आता आणखी एक नाणे टाका’ अशी शिस्त लावणारी सोयसुद्धा होती. इलेक्ट्रॉनिक उपकरणे येण्याच्या आधीचे हे सारे अभिकल्प असल्यामुळे, यंत्रसंभार सांभाळूनच आकार ठरवावा लागे. म्हणूनही असेल, पण केनेथ ग्रेंज यांनी अभिकल्पित केलेला ‘हेअर ड्रायर’ एखाद्या जाडजूड कंपासपेटीसारखा आयताकृती होता आणि त्याच्या एकाच बाजूला, त्या वेळच्या वातानुकूलन यंत्राची आठवण देणाऱ्या फटी होत्या.

आधुनिकतावादी दृश्यकला-चळवळ १९१७ पासून जोमात असल्यामुळे १९३० पर्यंत डिझाइन क्षेत्रातसुद्धा आधुनिकतावादी विचारांचे वारे वाहू लागलेले दिसत होते. ‘बाउहाउस’ ही संस्था तर, कलाशिक्षणाचाही मूलगामी फेरविचार करून त्यात आधुनिकतावाद आणत होती. त्यामुळे केनेथ ग्रेंज हे काही डिझाइनमधल्या आधुनिकतावादाचे उद्गाते नव्हेत, पण या आधुनिकतावादी डिझाइनचा स्वीकार वाढू लागला, तेव्हाच्याच काळात त्यांचे काम बहरले. त्यांचा जन्म १९२९ सालचा, म्हणजे ऐन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते किशोरवयात असल्यामुळे त्यांना कुठे लढायला जावे लागले नाही. पण या काळात त्यांची शाळा बदलली, कौशल्यशिक्षण घ्यावे लागले. या मुलाची कल्पनाशक्ती बरी आहे, हात चांगला आहे, हे पाहून त्यांना उपयोजित कलेच्या वर्गात टाकण्यात आले. पण आपली कल्पनाशक्ती नुसती ‘बरी’ नसून उत्कृष्ट आहे, हे मात्र १९५२ नंतर, विविध वास्तुरचनाकारांकडे सहायक म्हणून काम करताना केनेथ यांना स्वत:च उमगले. मग १९५८ मध्ये त्यांनी स्वत:चा डिझाइन स्टुडिओ थाटला. उतारवयातही सल्लागार, शिक्षक या नात्यांनी ते या क्षेत्रात राहिले होते. ‘केनेथ ग्रेंज- डिझायनिंग द मॉडर्न वर्ल्ड’ हे त्यांच्या विषयीचे नवे पुस्तक गेल्या मार्चमध्येच प्रकाशित झाले होते.

Story img Loader