मोठमोठे टॉवर्स मिरवणाऱ्या आणि झगमगणाऱ्या आजच्या मुंबईत अवघ्या ५० ते ६० वर्षांपूर्वी तब्बल १९ तमाशा थिएटर्स होती यावर आज कोणी तरी विश्वास ठेवेल का? तो काळ जगलेले मधुकर नेराळे तो सगळा इतिहास घेऊनच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. या १९ तमाशा थिएटर्सपैकी हनुमान थिएटर हे भर लालबागमधले तमाशा थिएटर त्यांच्या वडिलांनी १९४९ मध्ये सुरू केले होते. आत्ताच्या लालबागच्या चिवडा गल्लीच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली झाडेझुडपे काढून, जागा मोकळी करून, कनाती लावून तिथे सुरुवातीला हनुमान थिएटरच्या तमाशांचे फड रंगत. वडिलांनंतर मधुकर नेराळे यांनी हनुमान थिएटर चालवलेच शिवाय शाहिरी, तमाशा या अगदी खास मराठी लोककलांचा डोलाराही आपल्या खांद्यावर पेलून धरला. अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची स्थापना, तमाशा कलावंतांच्या संघटना उभारणे, शाहीर, तमाशा कलावंत यांचे प्रश्न सरकारदरबारी नेऊन ते सोडवून देणे, त्यांना निवृत्तिवेतनासह वेगवेगळ्या प्रकारची सरकारी मदत मिळवून देणे, सरकारच्या कलावंत मानधन समितीतील सहभाग अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्याच, त्याशिवाय ते स्वत: शाहीर होते. आपल्या मुलाची गाण्याची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना पंडित राजाराम शुक्ला यांच्याकडे गाणे शिकायला धाडले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिक्षण, गाणे थांबले, पण घडणे सुरू झाले.
वडिलांचा भायखळा बाजारातील भाजी विक्रीचा धंदा जसा त्यांनी सुरूच ठेवला, तसेच लोककलांना आश्रय देण्याचे वडिलांचे कामही पुढे नेले. मुंबईमधली इतर १८ तमाशा थिएटर्स काळाच्या ओघात बंद पडली असली तरी मधुकर नेराळे यांचे हनुमान थिएटर १९९५ पर्यंत सुरू होते. गिरणगावातील तीन लाख गिरणी कामगारांच्या जिवावर ५०च्या दशकात शाहिरी, तमाशा, वगनाट्य या लोककला मुंबईत जोमात होत्या. मुंबई हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्र होते आणि या चळवळीत शाहिरांचा मोठा सहभाग होता. त्यासाठी शाहिरी गर्जे, गिरणी कामगारांच्या मनोरंजनासाठी तमाशाचे फड रंगत. रज्याच्या कानाकोपऱ्यांतून मुंबईत आलेल्या गिरणी कामगारांनी जतन केलेल्या मराठी संस्कृतीला त्यावेळच्या साहित्यिकांकडून, राज्यकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळत होते. लोककलांची ही पालखी मधुकर नेराळे यांनी जबाबदारीने पेलून धरली. जसराज थिएटर या आपल्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून गाढवाचं लगीन, वरून कीर्तन आतून तमाशा, राजकारण गेलं चुलीत, उदं ग अंबे उदं, एक नार चार बेजार, पुनवेची रात्र काजळी अशा लोकनाट्यांचे शेकडो प्रयोग केले. महाराष्ट्र शासनाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार, प्राचार्य पी. बी. पाटील सोशल फोरम शांतिनिकेतन पुरस्कार, सांगलीचा कर्मयोगी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी नेराळे यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे लोककलांचा बुलंद आवाज हरपला आहे.