‘स्वत:च्या कामाबद्दल अलिप्तपणा राखता आला पाहिजे, ते इथं जमलंय तुला’- अशा शब्दांत व्ही. शांताराम यांनी दाद देणे, हा मधुरा जसराज यांच्यासाठी ‘आज तो आनंद आनंद…’ सारखा क्षण होता. शांताराम आणि विमलाबाई वणकुद्रे यांच्या चार अपत्यांपैकी मधुरा या एक. ‘शांतारामा’ या व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्राचे शब्दांकन केल्यानंतर त्यांनी या महान दिग्दर्शकाबद्दल एक लघुपटदेखील तयार करण्याचे ठरवले, पण त्यांच्याकडे चित्रित सामुग्री (फूटेज) इतकी जमा झाली होती की पाच तासांचा दीर्घपटच बनला असता! दिग्दर्शकाचा खरा कस संकलनातच असतो, हा वडिलांचा शिरस्ता मधुरा यांनीही पाळल्यानंतर ही दाद मिळाली होती! दुसरा लघुपट त्यांनी केला तो ‘संगीत मार्तण्ड पंडित जसराज’. या लघुपटानंतर पं. जसराज यांची ओळख करून देतानाही ‘संगीत मार्तण्ड’ हा शब्दप्रयोग केला जाऊ लागला. संगीताविषयीची गुणग्राहकता मधुरा यांच्याकडे जसराज-भेटीच्या आधीपासून होती. वयाच्या सोळाव्या वर्षी मधुरा यांनी शिवकुमार शर्मा (तेव्हाचे वय १७) यांचे गुण हेरले होते आणि ‘पपा, हे वाद्या तुम्ही पुढल्या चित्रपटात वापराच’ असा आग्रहदेखील केला होता. त्याचे फलित म्हणजे ‘झनक झनक पायल बाजे’ (१९५५) या चित्रपटात शिवकुमार शर्मांना, आणि एकंदर हिंदी चित्रपटसृष्टीत संतूर या तोवर काश्मिरी लोकवाद्या समजल्या जाणाऱ्या वाद्याला मिळालेली संधी!

जसराज यांच्याशी परिचयदेखील संगीत-मैफलींतूनच झाला. पहिली भेट १९५४ सालची, मग १९६० पर्यंत फक्त मैफलींच्या निमित्तानेच झालेल्या भेटीगाठींतून वाढत गेलेले आकर्षण आणि १९६० मध्ये जसराज महिनाभरासाठी मुंबईत राहायला आल्यावर आणाभाका… असा तो प्रवास १९६२ मध्ये ‘पपांनी मुलाची आणि मुलाकडच्यांची सगळी चौकशी केल्यानंतर मगच’ विवाहापर्यंत गेला.

त्यानंतर मात्र ‘पंडित जसराज यांच्या पत्नी’, पुढल्या काळात ‘शारङ्गदेव आणि दुर्गा जसराज यांची आई’ ही मधुरा जसराज यांची ओळख बनली. सुमारे तीन दशकांच्या खंडानंतर, वयाच्या पन्नाशीनंतर त्या पुन्हा कार्यरत झाल्या. ‘शांतारामा’ हे पुस्तक तर गाजलेच. त्यावरून काहीसे वादही झाले. वास्तविक व्ही. शांताराम यांच्या चरित्रप्रवासात विमलाबाई ते जयश्री, संध्या हेही टप्पे आले आहेत, जयश्री कामुलकर आणि विवाहित, चार मुलांचे वडील असलेले शांताराम यांच्या प्रेमप्रकरणामुळेच ‘प्रभात फिल्म कंपनी’ फुटली असाही प्रवाद आहे, पण हा वैयक्तिक तपशील वगळून, शांतारामांचा चित्रपटप्रवास आणि त्यांच्या कलाजाणिवांवर झालेले संस्कार यांचाच पट रेखाटणारे हे ५०० हून अधिक पानांचे पुस्तक आहे. त्याचा इंग्रजी अनुवाद साडेतीनशे पानी झाला, त्यातही मधुरा यांचा पुढाकार होता. चित्रपट आणि नाटकांशी केवळ निर्माती म्हणून कधीकधी संबंधित राहिलेल्या मधुरा यांनी वयाच्या पंच्याहत्तरीनंतर ‘आई तुझा आशीर्वाद’ (अलका कुबल, अशोक सराफ, रमेश भाटकर- २०१०) या चित्रपटाचे लेखन- दिग्दर्शन केले.

तरीही त्यांच्या निधनाची बातमी ‘पं. जसराज यांच्या पत्नी मधुरा यांचे निधन’ अशीच आली. पतीनिधनानंतर २०२० पासून त्या खचूनच गेलेल्या दिसल्या. यातून, ‘स्वत:च्या कामाबद्दल अलिप्तपणा राखता आला पाहिजे’ हे व्ही. शांतारामांनी त्यांना खूप उशिरा सांगितले का, अशी चुटपुट मात्र कायम राहणार आहे.