अक्साई चीनमध्ये टेहळणी करणारे, १९७१ च्या युद्धात पूर्व पाकिस्तानात (बांगलादेश) अकस्मात हल्ला चढवत पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडणारे युद्धनायक मेजर जनरल राजेंदर नाथ (निवृत्त) यांचे चंडीगढ येथे ९८ वर्षी निधन झाले. सैन्य दलात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांचे नेतृत्व कौशल्य ठळकपणे अधोरेखित झाले होते. १९४६ मध्ये ते भारतीय लष्करी प्रबोधिनीत दाखल झाले. देशाला स्वातंत्र्य मिळत असताना ११ गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. लष्करी गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना अक्साई चीन परिसरात टेहळणी करणारे ते पहिले अधिकारी बनले. १९७१ च्या युद्धात नाथ यांनी ६२ माऊंटन ब्रिगेडचे नेतृत्व केले. शत्रूला सुगावा लागू नये म्हणून सैन्याची हालचाल, तैनाती बेमालूमपणे करण्यात आली. त्यांच्या ब्रिगेडने पूर्व पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणे काबीज केली. मधुमती नदी काठावरील लढाई सर्वाधिक रोमहर्षक ठरली. कुमारखली शहर काबीज करण्यासाठी रात्रीतून चपळाईने हालचाली करण्यात आल्या. चिलखती रेजिमेंटचे रशियन बनावटीचे पीटी – ७६ रणगाडे नदीपात्रातून पलीकडे नेण्यात आले. ब्रिगेडने असा हल्ला केला की, कमांडर मेजर जनरल अन्सारी यांच्यासह पाकिस्तानच्या नऊ डिव्हिजनला आत्मसमर्पण करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. या मोहिमेची यशस्विता लक्षात घेऊन ६२ माउंटन ब्रिगेड हा दिवस ‘मधुमती दिवस’ म्हणून साजरा करते. पश्चिम कमांड मुख्यालयात चंडी मंदिरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यालाही ‘मधुमती मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. युद्धानंतर नाथ यांनी जम्मू- काश्मीरमधील पायदळ विभागाचे नेतृत्व केले. वेलिंग्टनस्थित डिफेन्स सव्र्हिसेस स्टाफ महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. भारतीय लष्करी प्रबोधिनीचे कमांडंट म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला ते सैन्य दलातून निवृत्त झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा