‘‘धाकटे आकाश’ ही कादंबरी लिहीत असताना दुसरी एक भावना हळूहळू ठळक होत गेली. जसजसा लिहीत गेलो त्या प्रमाणात फुलोरा झडत जावा तसा आनंद झडत गेला..’’ मनोहर शहाणे यांनी आपल्या ‘धाकटे आकाश’ या पहिल्या  आणि लहानग्याचे भावविश्व संवेदनशीलपणे मांडणाऱ्या कादंबरीच्या मनोगतात लेखन अवस्थेविषयी केलेले हे मनोज्ञ विवेचन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांच्या ‘इतिहासाचे दात करवती’, ‘इहयात्रा’, ‘झाकोळ’, ‘देवाचा शब्द’, ‘पुत्र’, ‘शहाण्यांच्या गोष्टी’, ‘ससे’यांसारख्या कथा- कादंबऱ्यांतून वाचकांना वैविध्यपूर्ण साहित्याचा आनंद घेता आला. नाशिकच्या साठोत्तरीत साहित्य मंडळातून त्यांचे नाव पुढे आले. आपल्या वैशिष्टय़पूर्ण शैलीतून त्यांनी मराठीतील महत्त्वाच्या लेखकांमध्ये नाममुद्रा उमटवली.

सराफी व्यवसाय करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात शहाणेंचा जन्म झाला. वडिलांच्या निधनानंतर त्यांना हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढावे लागले. त्यांनी शाळेत असतानाच स्नेहसंमेलनात ‘क्रांती’ नावाची नाटिका लहिली. नाटकांमधून भूमिकाही केल्या. हस्तलिखिते, मासिके चालवली. हाच वारसा पुढे नेत त्यांनी ‘पालवी’, ‘अमृत’ या मासिकांचे संपादन केले.

मुलांना उत्तम बौद्धिक खाद्य पुरवण्यात ‘अमृत’ या नियतकालिकाचे मोठे योगदान आहे. ते अधिक वाचनीय करण्यात शहाणेंचा मोलाचा वाटा होता. ‘गांवकरी’त मुद्रितशोधक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी पुढे ‘गांवकरी’ व दिवाळी अंकाचे संपादक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. शहाणेंनी ‘सत्यकथे’तून कथा लिहिण्यास सुरुवात केली आणि ते बंद पडेपर्यंत वास्तवदर्शी आणि भेदक कथा लिहिल्या. मौज प्रकाशनाने एकामागून एक अशा त्यांच्या सात कादंबऱ्या प्रकाशित केल्या. शहाणेंच्या प्रत्येक कादंबरी, कथेतून वेगळेपण दिसत असले तरी माणूस हा नियतीच्या हातातील एक खेळणे आहे आणि त्याचे अस्तित्व शून्य आहे, हे समान सूत्र जाणवते. शहाणेंना ‘भाऊ पाध्ये पुरस्कार’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार’, ‘राज्य नाटय़ पुरस्कार’, ‘महाराष्ट्र फाय फाऊंडेशन पुरस्कार’ अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

शहाणेंच्या ‘झाकोळ’, ‘देवाचा शब्द’, ‘लोभ असावा’ यांतील नायक प्रश्न उपस्थित करतात. पण हे सारे नियतीचे गुलाम होतात. पीडित व भोळय़ माणसांबद्दलची कणव, प्रसंगांतून जाणवणारी भेदकता आणि दाहकता हे दोन्ही प्रकार शहाणेंच्या कादंबरीत प्रकर्षांने जाणवतात. त्यांचा लेखनप्रवास अभ्यासताना एक लेखक म्हणून उत्तरोत्तर येत जाणारी प्रगल्भता जाणवते. त्यांच्या अखेरच्या काळातील लेखनात जीवनविषयक सखोल चिंतन अनुभवण्यास मिळते.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh manohar shahane novel writing amy
Show comments