‘ऑडी’ची एकच, ‘बीएमडब्ल्यू’ आणि ‘फेरारी’च्यासुद्धा एकेकच गाडय़ा, झालेच तर एखादी ‘जग्वार’, एखादी ‘फोक्सवॅगन’, दोनतीन ‘रेनॉ’.. पण ‘लॅम्बॉर्गीनी’ दहा!
– ही यादी, मार्चेलो गांदीनी यांनी अभिकल्पित केलेल्या मोटारींपैकी भारतीयांना (ऐकून तरी) माहीत असलेल्या काहींची आहे. ही पूर्ण यादी नाही, उलट त्रोटकच आहे. मार्चेलो गांदीनी हे नाव वाचताक्षणीच ते इटालियन होते हे बहुतेकांच्या लक्षात आले असेल. पण ‘अभिकल्पित केलेल्या’ या मराठीतल्या शब्दांचा अर्थ ‘डिझाइन केलेल्या’ असा असावा, हाही विचार अनेकांना करावा लागला असेल! मार्चेलोंची भाषाच अभिकल्पाची. इटालियन भाषेतला ‘प्रोजेट्टो’ हा शब्द जरी ‘प्रोजेक्ट’शी मिळताजुळता भासला तरी ‘मूळ कल्पना’ किंवा ‘कल्पनेमागचे चिंतन’ इथपर्यंत त्याचे अर्थ भिडतात.
मोटारगाडय़ांचे अभिकल्पकार म्हणून जवळपास अर्धशतकभर काम केलेल्या मार्चेलो गांदीनींनी १३ मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. गेली सुमारे दहा वर्षे ते कार्यरत नव्हते. त्यांनी केलेल्या अभिकल्पांची उजळणी अनेकांनी केली. मोटारींसाठी वर उघडणारे दरवाजे, ही कल्पना ‘अल्फा रोमिओ ३३ कराबो’ या गाडीसाठी त्यांनी पहिल्यांदा वापरली. मोटारीला जणू पंख फुटावेत, असे ते दरवाजे! किंवा, ‘कन्सेप्ट कार’ हा प्रकार त्यांनी रुळवला.. म्हणजे ‘फॅशन शो’मधल्या कपडय़ांसारखी, केवळ ‘कार शो’मध्ये दिसणारी गाडी. अर्थातच ती रस्त्यावर धावू शकेलही, पण तिचे औद्योगिक उत्पादन कधी होणार नाही! अशा एकमेवाद्वितीय गाडय़ा प्रत्यक्ष तयार होईपर्यंत ते दिवसरात्र मेहनत करत. अशाच एका श्रममय रात्री एका कामगाराची ‘काउंटाश’ हाच शब्द वारंवार वापरण्याची लकब त्यांनी हेरली.. ‘आयशप्पत!’, ‘च्यामारी’ या शब्दांइतकेच या ‘काउंटाश’चे कार्य. मूळ इटालियनमध्ये त्याचा अर्थ ‘साथीचा रोग’ असा असला तरी ‘भय्यंकर!’ असा आनंदोद्गार म्हणून ‘काउंटाश’ वापरला जातो- तेच नाव मार्चेलोंनी त्या रात्री तयार झालेल्या लॅम्बॉर्गीनीला दिले, त्या कुर्रेबाज कारकंपनीनेही ते मान्य केले, हा किस्सा आजही लॅम्बॉर्गीनीच्या संकेतस्थळावर आहे! ‘कार डिझाइन न्यूज’ या नियतकालिकाने ‘कारकीर्द गौरव पुरस्कार’ सुरू केला, तेव्हा पहिला मान (२०१२) मार्चेलोचाच होता.
इटली हा देश फियाटसाठी ओळखला जाऊ लागला, तेव्हा १९५६- ५७ मध्ये मार्चेलो होते १९ वर्षांचे. मोटारींचेच अभिकल्प करायचे, हे त्यांनी ठरवले होते. त्यासाठीची व्यावसायिक संधी मात्र त्यांना १९६५ मध्ये मिळाली. अंतराळयाने, चंद्रावर पाऊल वगैरेंचा बोलबाला जगभर होण्यापूर्वीच ‘अंतराळयुगातल्या मोटारीं’च्या कविकल्पनेने मार्चेलोंना पछाडले होते, ती त्यांनी पूर्णही केली.