लालनशाह फकीर हे मुघल साम्राज्याचा अस्त आणि ब्रिटिश वसाहतवादाचा उदयकाळ पाहणारे बंगाली संतकवी. ‘त्यांच्या कवितांनी रवीन्द्रनाथ टागोर, काझी नझरुल इस्लाम तसेच अमेरिकन कवी अॅलन गिन्सबर्ग यांना प्रेरणा दिली’ हे तर विकिपीडियाही सांगतो. पण भारताचे माजी परराष्ट्र सचिव मुचकुंद दुबे यांनी या लालनशाहच्या गीतांचा सुगम हिंदी गीतानुवाद केला होता… तो २०१७ मध्ये प्रकाशित तरी झाला; पण १९५३ साली- म्हणजे २० वर्षांचे असताना मुचकुंद दुबेंनी रवीन्द्रनाथांच्या ‘गीतांजली’तल्या अनेक कवितांचा अनुवाद केला, बांगलादेशी कवी शम्सउर्रहमान यांचीही गीते हिंदीत आणली, ती आजही त्या वेळच्या कुठकुठल्या हिंदी ‘साहित्य पत्रिकां’मध्ये विखुरलेली आहेत. जगण्याची उच्च ध्येये आध्यात्मिक बाजाच्या कवितेतून आकळून घेणारे मुचकुंद दुबे ऐन शीतयुद्धाच्या काळात ‘भारत कुणाही एका बाजूकडे झुकणार नाही’ ही तत्त्वाग्रही भूमिका संयुक्त राष्ट्रांत भारताचे दूत म्हणून मांडत राहिले होते. त्यानंतरचे उणेपुरे दीड वर्षभर (एप्रिल १९९० ते नोव्हेंबर १९९१) परराष्ट्र सचिवपदीही होते. त्यांच्या ज्ञानी व्यक्तित्वाची छाप अनेकांवर पडली होती, हे २६ जून रोजी त्यांच्या निधनानंतर आदरांजलीच्या ओघातून दिसले.
जसिदीह नावाच्या (आता झारखंडमधील) आडगावात १९३३ साली जन्मलेल्या मुचकुंद दुबे यांनी पाटणा विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर काही काळ अध्यापन करून केंद्रीय सेवा परीक्षा दिली आणि १९५७ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केला. भारताचे बांगलादेशातील उच्चायुक्त या पदासाठी १९७९ मध्ये त्यांची निवड होण्यामागे त्यांच्या राजनैतिक कौशल्यासोबतच, बंगाली भाषेवरील त्यांचे प्रभुत्व हेही कारण होते. पण असे प्रभुत्व तर फारसी, संस्कृत आणि फ्रेंच भाषांवरही त्यांनी मिळवले होते. चौफेर वाचनाने ते वाढवलेही होते. परराष्ट्र सेवेतल्या उमेदवारीच्या काळाचा योग्यरीत्या वापर करून, ऑक्सफर्ड व न्यू यॉर्क विद्यापीठांतूनही त्यांनी अर्थशास्त्राच्या पदव्या मिळवल्या. १९८२ पासून ते जीनिव्हात होते, तेथे ‘संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम’ (यूएनडीपी), ‘संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना’ (युनेस्को) आणि पुढे संयुक्त राष्ट्र आमसभेत भारताचे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत राहिले. परराष्ट्र सचिवपदाची त्यांची कारकीर्द ही आर्थिक उदारीकरण आणि ‘जागतिकीकरणा’चा राजनैतिक पाया भक्कम करणारी ठरली. निवृत्तीनंतर भारतीय विदेश सेवा संस्था (आता ‘सुषमा स्वराज विदेश सेवा संस्थान’) या नवे राजनैतिक अधिकारी घडवणाऱ्या संस्थेत सुप्रतिष्ठ प्राध्यापकपद त्यांना देण्यात आले, तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी आठ वर्षे अध्यापन केले. जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेला कारणीभूत ठरलेल्या ‘गॅट’ करारातील उणिवा ठासून मांडणारे दुबे, पुढे दिल्लीतल्या ‘कौन्सिल फॉर सोशल डेव्हलपमेंट’चे अध्यक्ष झाले. हे एकमेव पद नव्वदीतही त्यांनी उमेदीने सांभाळले होते. त्यांनी राजनय, अर्थकारण तसेच अन्य विषयांवर लिहिलेली ५० पुस्तके, ‘भारत त्यांना कळला हो…’ याची साक्ष देणारी आहेत.