सीतास्वयंवराच्या प्रसंगात कथानायक वाकून शिवधनुष्य हाती घेतो आणि ते धनुष्य मोडते, यासारखा प्रसंग बाहुल्यांच्या खेळात- त्यातही ज्या खेळामध्ये बाहुल्यांच्या हालचाली खालून- काठय़ा अथवा तारांद्वारे केल्या जातात अशा ‘काठी कंधेई नाच’ या प्रकारात घडवून आणताना मागुनिचरण कुंअर किती उत्तुंग दर्जा गाठत आणि मागुनिचरण यांच्या प्रतिभेमुळेच त्या लाकडी बाहुलीचे कंबरेपासूनचे पाय, गुडघे, धड आणि हात यांच्या हालचाली कशा ‘साक्षात प्रभु रामासारख्या’ होत आणि ते धनुष्यही कसे मोडे याच्या आठवणीच आता ओदिशातल्या दोन पिढय़ांकडे उरतील. ‘पद्मश्री’ आणि केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेले  कुंअर शनिवारी, वयाच्या ८७ व्या वर्षी निवर्तले. ओदिशातली तरुण पिढी ‘रील्स’च्या आहारी जाण्यापूर्वीच्या दोन पिढय़ांना त्यांची प्रतिभा माहीत आहे. कधीकाळी केवळ स्थानिक पातळीवर होणाऱ्या ‘काठी कंधेई’च्या लोककलेला कलाप्रकाराचा दर्जा दिला तो मागुनिचरण यांनीच. बाहुल्यांच्या या खेळासाठी त्यांनी जे पथक स्थापले त्याचा पसारा ३०० निरनिराळय़ा बाहुल्या, त्या हाताळण्यासाठी ५० माणसे आणि २० विविध आख्यान-नाटके असा वाढला होता. ओदिशाच्या कानाकोपऱ्यांत आणि शेजारच्या बिहार, झारखंड राज्यांतही त्यांचे ग्रामीण चाहते होते.

हे असे काम करण्यासाठी निष्ठा तर लागतेच पण त्यात पुढे जाण्यासाठी कौशल्यही आवश्यक होते. बाहुल्या स्वत:च घडवल्याखेरीज आपण मनासारखा खेळ करू शकत नाही, हे जाणून ओदिशातील पारंपरिक शिल्पकार भगवान जेना यांच्याकडे मागुनिचरण शिकले. हे शिक्षण मातीतून शिल्पे घडवण्याचे, लाकूड तसेच दगडातून प्रतिमा कातून काढण्याचे होते. बाहुल्यांसाठी केवळ मऊ/ हलक्या लाकडाचाच वापर त्यांनी केला, तरी दगडी मूर्तिकलेवरही हात बसल्यामुळे त्यांच्या आख्यान-नाटकांमधल्या बाहुल्यांच्या प्रतिमा ठोकळेबाज लाकडी न दिसता ‘देवांसारख्याच’ दिसत!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh odisha central sangeet natak akademi award kunar amy
First published on: 03-06-2024 at 05:13 IST