खन्ना हे आडनाव (१९७० ते १९९० च्या दशकांतले हिंदी चित्रपट पाहणाऱ्या) सर्वांना चांगलेच परिचित असते, पण लुधियाना जिल्ह्यातील ‘खन्ना’ हेच ज्यांचे मूळ गाव, त्या कथालेखक प्रेम प्रकाश यांनी मात्र उमेदवारीच्या काळात ‘खन्नवी’ अशा आडनावाने लेखन केले. अर्थात वयाच्या तिशीपासून पुढली ६० वर्षे प्रेम प्रकाश म्हणूनच ते अधिक ओळखले जात. पंजाबी कथेला ग्रामीण वातावरणातून शहरी किंवा निमशहरी वास्तवात आणण्याचे काम त्यांनी केले, तसेच या बदलत्या वास्तवातले मानवी नातेसंबंध, स्त्रीपुरुषसंबंध आणि सामाजिक/ वैयक्तिक भावनांतले ताणेबाणे त्यांच्या लघुकथांमधून अभिव्यक्त झाले. म्हणजे उदाहरणार्थ, ‘फाटक्या शर्टातला हा रिक्षावाला अवाच्या सवा पैसे मागतो आहे, म्हणून मी त्याच्याशी हमरीतुमरीवर आलो, त्याच्या कानशिलात लगावली, तर माझी बायको उलट त्याचीच बाजू घेऊ लागली….’ इतक्या साध्या प्रसंगातून फुलत जाणारी ‘माडा बंदा’ ही कथा फक्त एका अनावश्यक हाणामारीची न ठरता शहरातल्या विषमतेचे दर्शन घडवणारी ठरते… तिथेही न थांबता ती, या विषमतेचा साकल्याने विचार करण्याऐवजी आपण आपल्याच पायापुरते पाहणार का, असा सवालही वाचकाच्या मनात रुजवते.
कथालेखनातल्या या वास्तवदर्शनाचे श्रेय दैनिक वृत्तपत्रातल्या नोकरीला ते देत. ऐन विशीत, ‘खन्नवी’ म्हणून केलेले ललितलेखन ‘रोज़ाना मिलाप’ आणि ‘रोज़ाना हिंद समाचार’ या बुद्रुक दैनिकांतल्या नोकरीमुळे झाले आणि मग, कुठल्याशा कार्यक्रमात नाइलाज म्हणून कथा सांगावी लागल्यामुळे कथालेखनाची सुरुवात झाली. खन्ना गावातून जालंधरला आलो तेव्हाच ‘मजलेवाल्या बिल्डिंगा’ पाहिल्याचे सांगणारा हा तरुण, शहरीकरणाला शरण न जाता त्यातले माणूसपण शोधू लागला. ते स्त्रियांमुळे टिकते, याच्या सखोल जाणिवेतून पुढे, ‘कथेतल्या स्त्रीपात्राची स्पष्ट कल्पना येत नाही तोवर लिखाण सुरू होत नाही’ अशी कबुली ते मुलाखतींमध्ये देत. एखाददोन मुलाखती ‘यूट्यूब’वरही आहेत; त्यांत ही कबुली नसली तरी छान तब्येतीचे वयस्कर प्रेमप्रकाश उत्साहाने बोलताना दिसतात.
मग, ही आशयगर्भ कबुलीसुद्धा जिंदादिल पंजाबी मिश्किलीने, ‘अहो बाई नसेल तर लेखणी सुरूच होत नाही माझी!’ अशा शब्दांत त्यांनी दिली असेल तरी हे शब्द रासवट वाटत नाहीत. त्यामागचे साहित्यबळ तर सर्वांसमोर आहेच. ‘कच्चघड़े’(१९६६), ‘नमाज़ी’ (१९७१), ‘मुक्ति’ (१९८०), ‘श्वेताम्बर ने कहा था’(१९८३), ‘प्रेम कहानियाँ’(१९८६),‘कुझ अनकिहा वी’ (१९९०), ‘रंगमंच दे भिख्सू’ (१९९५), ‘सुणदैं ़खली़फा’ (२००१), ‘पदमा दा पैर’ (२००९) आणि ‘कथा-अनंत’ हे निवडक कथांचे संकलन (१९९५); यांखेरीज हिंदीतही त्यांचा ‘डेड लाइन’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून इंग्रजीत त्यांच्या कथा ‘द शोल्डर बॅग अॅण्ड अदर स्टोरीज’ (२००५) या पुस्तकात संकलित झाल्या आहेत. ‘दस्तऐवज़’ ही एकच कादंबरी (१९९०) त्यांनी लिहिली; तर आत्मपर लिखाणाची ‘बंदे अंदर बंदे’ (१९९३) तसेच ‘आत्ममाया’ (२००५) ही दोन पुस्तके प्रकाशित झाली. १९९६ ते २००५ या काळात त्यांनी अन्य पंजाबी कथाकारांची पुस्तके संपादित केलीच, शिवाय अन्य भारतीय भाषांतील कथासाहित्य पंजाबीमध्ये अनुवादित केले. लघुकथेतूनही धारदार आशय पोहोचवण्याचा ‘इल्म’ त्यांच्याकडे आला कसा, याची उत्तरे दीड : त्यांची पदव्युत्तर पदवी उर्दू साहित्यात होती, हे अर्धेच उत्तर, पण एक पूर्ण उत्तर त्यांनी केलेल्या अनुवादांतून सापडते. प्रेमचंद, महाश्वेता देवी, सुरेन्द्र प्रकाश, काशिनाथ सिंह, सुरेंद्र वर्मा हे समाजाभिमुख लेखक पंजाबीत अनुवादरूपाने आणण्याआधीच त्यांनी आपला पिंड जोखला होता, हे ते उत्तर. त्यामुळेच, ‘साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२) विजेते लेखक प्रेम प्रकाश कालवश’ ही ३१ मार्चची बातमी हळहळ वाढवणारी ठरते.