‘प्रिट्झकर पारितोषिक’ वास्तुरचनाकारांना दिला जाणारा; एक लाख डॉलर, पदक आणि महत्त्वाचे म्हणजे विजेत्याचे व्याख्यान अशा स्वरूपाचा, अर्धशतकाहून अधिक काळ नावाजलेला सन्मान. हे पारितोषिक मिळवण्याचा मान दिवंगत वास्तुरचनाकार बाळकृष्ण दोशी यांच्याखेरीज कुणाही भारतीयाला आजवर मिळाला नसला तरी, हे पारितोषिकच पाश्चात्त्यधार्जिणेच असल्याची टीका तेवढ्याने हाेऊ शकत नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियाई देशांतील कितीकांना तो मिळाला आहे. यंदाचे विजेते रिकेन यामामोटो हे तर, ‘प्रिट्झकर’ मिळवणारे आठवे जपानी वास्तुरचनाकार आहेत!
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: राम गोपाल बजाज
यामामोटो यांना वयाच्या ७९ व्या वर्षी हे पारितोषिक मिळते आहे, तेही त्यांच्या कारकीर्दीच्या ५१ व्या वर्षी. सन १९७३ पासून पुढल्या पाच वर्षांत ‘आले काम, केले काम’ असेच त्यांचेही सुरू असावे. पण १९७७ साली त्यांनी बांधून पूर्ण केलेली ‘यामाकावा व्हिला’ ही वास्तू वैशिष्ट्यपूर्ण ठरली. तिचे मालक श्रीयुत यामाकावा यांना जंगलातल्या टेकाडावर मोकळेढाकळे घर बांधून हवे होते. ‘व्हरांडा’ हा शब्द यामामोटो यांना अजिबात माहीत नसताना (व्हरांड्याला त्यांच्या फर्मच्या संकेतस्थळावर आजही ‘व्हेरांडा’ ऐवजी ‘टेरेस’ असा इंग्रजी शब्द वापरला जातो), हे यामाकावांचे घर बैठे, उतरत्या छपराचे आणि इतक्या मोठ्या व्हरांड्याचे होते की जणू आपली बापू कुटीच! पुढल्या काळात- विशेषत: १९९१ नंतर प्रचंड बहरलेल्या कारकीर्दीत काचा, काँक्रीटचा भरपूर वापर रिकेन यामामोटो करू लागले. त्यांच्या कामातील ‘बापू कुटी’वजा रचनेचे काही पैलू मात्र इतिहासजमा होण्यापासून वाचले! याच त्या पैलूंनी आज त्यांना वैशिष्ट्यपूर्ण ठरवले आहे. हे पैलू म्हणजे मोकळेपणा, आरपार दिसेल अशी रचना आणि एकंदर वास्तूमधून प्रतीत होणारी समाजकेंद्री वृत्ती. वास्तू ही निव्वळ खासगीपणाचा आसरा नसते, तिच्यात सामाजिक देवाणघेवाणही फुलत असते हा आग्रह त्यांनी जपला. अगदी स्वत:साठी भरवस्तीत वैयक्तिक घर बांधतानासुद्धा मधूनच दिसणारे आकाश हवे, जिन्याच्या खालून वरच्या खोल्या दिसाव्यात या अपेक्षा त्यांनी पाळल्या. विद्यापीठे, वाचनालये, संशोधनकेंद्रे यांची संकुले बांधताना तर यामामोटो यांचे हे सारे आग्रह टिपेला पोहोचले. यामामोटोंचे गुरू हिरोशी हारा हेदेखील काच वापरणारे वास्तुरचनाकार, पण हिरोशींच्या ‘उमेदा स्काय बिल्डिंग’ (ओसाका) आदी रचनांमध्ये काचेचा वापर भपका आणि चमत्कृतीसाठी झाल्यासारखे दिसते. यामामोटोंनी ‘सर्व वर्ग सर्वांना दिसावेत’ यासारख्या साध्यासुध्या कल्पना विद्यापीठभर प्रचंड प्रमाणावर प्रत्यक्षात आणल्या, तेव्हा काचेचा वापर सामाजिकतेसाठी केला. समाजाचा विचार करणारे वास्तुरचनाकार, असा त्यांचा खास उल्लेख ‘प्रिट्झकर’ची निवड जाहीर करणाऱ्यांनीही केला आहे.