पारितोषिकांमध्ये संगीतातील परमोच्च समजल्या जाणाऱ्या २८ ग्रॅमी बाहुल्या, २९००हून गाण्यांमध्ये निर्माता-नियोजक- संगीतकार म्हणून सहभाग, ५० हून अधिक चित्रपट आणि मालिकांचे पार्श्वसंगीत. यांपैकी निम्मे कार्य झाले असते, तरी क्विन्सी जोन्स यांचे नाव अमेरिकी संगीत इतिहासातून काढता आले नसते. पण जोन्स काही तितक्यावरच थांबले नाहीत. विल स्मीथ, ओप्रा विन्फ्रे यांसारख्या कित्येक डझनांहून अधिक कलाकारांची कारकीर्द ही क्विन्सी जोन्स या व्यक्तीने घडविली. त्या कित्येक डझनांपैकी सर्व खंडात ज्ञात असलेले नाव म्हणजे मायकेल जॅक्सन. ‘एमटीव्ही’ वाहिनी अमेरिकेत जन्मास येण्याचा (१ ऑगस्ट १९८१) आणि जॅक्सनचा दुसरा आल्बम ‘थ्रिलर’ (१९८२) येण्याचा काळ समांतर. जगातील सर्वाधिक विक्री झालेल्या या आल्बमचा निर्माता क्विन्सी जोन्स होता. १९३३ साली जन्मलेल्या आणि शिकागोतील स्थलांतरितांच्या वस्त्यांमध्ये चर्चमधील संगीतावर पोसलेल्या जोन्स यांनी भवताल गुन्हेगारीने भरलेला पाहिला. महायुद्धानंतर त्यांच्या पालकांना सिएटलमध्ये स्थलांतर करावे लागले. तिथल्या छोट्या हॉटेल्स आणि बारक्लबांतील बॅण्डमध्ये ‘ट्रम्पेट’वादक म्हणून उमेदवारी करीत, विविध शिष्यवृत्त्यांमधून संगीत महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत जोन्स यांची कला बहरली. अंध संगीतकार रे चार्ल्स याच्यासह काही काळ उमेदवारी करून युद्धोत्तर काळातील संगीतपटलावर चमकणाऱ्या सर्वच काळ्या कलाकारांसह काम केले. ‘रॉक अॅण्ड रोल’, ‘जॅझ’,‘ऱ्हिदम अॅण्ड ब्लू’ या साऱ्या प्रकारांतील संगीतांचे एकत्रीकरण केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा