‘आजकाल सर्वत्र ‘विकास’ हा शब्द प्रचंड चलतीत आहे. भौतिक विकास हा माणसाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेच.. त्याबद्दल दुमत असू शकत नाही. परंतु त्याचबरोबर विविध कला, साहित्य, संस्कृती आणि मूल्ये या गोष्टीही माणसासाठी तितक्याच, किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाच्या आहेत. त्या माणसाकडे नसतील तर त्याने भौतिक प्रगतीची कितीही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तुंग शिखरे गाठली तरी तो गर्तेत कोसळल्याशिवाय राहणार नाही. माणसाचे ‘माणूसपण’ अधोरेखित करणाऱ्या या गोष्टी आहेत. त्यांच्याविना माणूस ‘माणूस’ म्हणवून घ्यायला लायक उरणार नाही..’ हे उद्गार आहेत एका रंगचिंतकाचे! त्याचे नाव- राम गोपाल बजाज! सध्या वय ८५ च्या उंबरठय़ावर असलेल्या राम गोपाल बजाज यांनी अवघे आयुष्य रंग-अध्ययन, रंग-अध्यापन, रंगकर्मी म्हणून व्यतीत केलेले असल्याने त्यांचे हे विचार कुणाही संवेदनशील व्यक्तीला पटल्याशिवाय राहणार नाहीत.

बिहारमधल्या एका खेडेगावात जन्म आणि बालपण गेलेल्या राम गोपाल बजाज यांना घरातील गरीब परिस्थितीमुळे दत्तक दिले गेले होते. परिस्थितीच्या थपडा खात ते आज ‘महिन्द्र एक्सलन्सी इन थिएटर अ‍ॅवार्ड’ (मेटा)च्या कारकीर्द- गौरवापर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे साहित्यातून एम. ए. करत असतानाच त्यांची राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यामुळे प्रगल्भ, समृद्ध साहित्याचा त्यांचा अभ्यास त्यांच्या घडणीत केंद्रस्थानी राहिल्यास आश्चर्य नव्हे. इब्राहिम अल्काझींच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नाटय़शाळेत रंगकार्याचे प्रशिक्षण घेत असताना त्यांना अनेक प्रश्नही पडत होते. पुढे ते स्वत:च राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात अध्यापक आणि रेपर्टरीचे प्रमुख झाले. नंतर तिथेच ते संचालकही झाले. इरफान खान, अनुपम खेर, आशुतोष राणा, सीमा बिश्वास, पंकज त्रिपाठी यासारख्या त्यांनी घडवलेल्या अनेक शिष्यांना नाटक शिकूनही चित्रपटांकडेच प्रामुख्याने वळावे लागले याची त्यांना खंत आहे.

‘घाशीराम कोतवाल’सारख्या महत्त्वाच्या नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहली किरण तक’, ‘स्कंदगुप्त’, ‘कैद-ए-हयात’, ‘आषाढ का एक दिन’ यासारखी अनेक नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. गिरीश कार्नाडांच्या ‘तलेदंड’चे ‘रक्तकल्याण’ हे हिंदी भाषांतरही केले.

आपल्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातील कारकीर्दीत त्यांनी ‘भारत रंग महोत्सव’ आणि ‘जश्न-ए-बचपन’ हे नाटय़महोत्सव सुरू केले; जे आज राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महत्त्वाचे रंगमहोत्सव म्हणून ओळखले जातात. ‘उत्सव’ आणि ‘गोधूली’ या चित्रपटांत ते साहाय्यक दिग्दर्शक होते. ‘मासूम’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘मिर्च मसाला’, ‘चांदनी’, ‘परझानिया’, ‘मँगो ड्रीम्स’, ‘जॉली एलएल. बी.’, जॅकी चानचा ‘द मिथ’ आदी समांतर आणि मुख्य धारेतील चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास सन्मान, पद्मश्री यांनी ते सन्मानित आहेत. 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh ram gopal bajaj mahindra excellence in theater award amy