‘ही प्रयोगशाळा नसती तर मारवाडी बेपारी म्हणून मी सहज यशस्वी झालो असतो,’ असे राम नारायण अग्रवाल स्वत:बद्दल गमतीने म्हणत… पण तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्राची भुरळ त्यांना पडली आणि ‘अग्नी क्षेपणास्त्राचे जनक’, ‘अग्नीमॅन’, ‘अग्नी अग्रवाल’ म्हणून ते ओळखले गेले! भारतातील लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या अग्रवाल यांचे नुकतेच हैदराबाद येथे निधन झाले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (डीआरडीओ) १९८३ पासून प्रकल्प संचालक या नात्याने अग्रवाल यांनी महत्त्वाकांक्षी अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नेतृत्व केले होते.

जयपूरच्या व्यापारी कुटुंबात २२ जुलै १९४१ रोजी त्यांचा जन्म झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नेहरूकालीन आकर्षणातून त्यांनी सुरुवातीला मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून अंतराळ अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवली, मग बेंगळूरु येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून पदव्युत्तर पदवी… आणि जून १९६१ मध्ये ‘विशेष शस्त्रां’च्या संशोधनासाठी ते हैदराबाद येथील ‘संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळे’त (डीआरडीएल) कार्यरत झाले. हे ‘डीआरडीओ’चे पूर्वरूप. माजी राष्ट्रपती आणि भारताचे ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी इस्राोतून डीआरडीओत येऊन, १९८३ मध्ये ‘इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ सुरू केला. अग्रवाल हे अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे पहिले प्रकल्प संचालक बनले. २२ मे १९८९ मध्ये अग्रवाल यांच्या पथकाने १००० किलो वजनाच्या पेलोडसह ८०० कि.मी. मारा करणाऱ्या अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या यशाने अनेक विकसित राष्ट्रांना केवळ आश्चर्यचकित केले नाही तर त्यांच्या क्रोधाग्नीला निमंत्रण दिले. या टप्प्यावर भारताने अग्नीचे वर्णन ‘तंत्रज्ञान प्रात्यक्षिक’ असे केले असले तरी या यशाने पुढील पिढीला प्रेरणा मिळाली. पुढच्या पिढीतील प्रक्षेपक, ग्रहांचा शोध, बाह्य अवकाश वाहतूक इत्यादींसह अंतराळातील अनेक अनुप्रयोग भारतासाठी खुले झाले. अग्रवाल यांच्या २२ वर्षांच्या कार्यकाळात ‘अग्नी’च्या विविध आवृत्त्या विकसित करण्यात आल्या. २०१२ मध्ये प्रक्षेपित केलेल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘अग्नी -५’ने भारताला अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, इस्रायल आणि उत्तर कोरिया या राष्ट्रांच्या यादीत भारताला स्थान मिळाले. रीएन्ट्री तंत्रज्ञान, जहाजावरील क्षेपणास्त्र प्रणाली, ऑनबोर्ड प्रोपल्शन सिस्टीम, क्षेपणास्त्रांसाठी मार्गदर्शन आणि नियंत्रण स्थापित करणे आदी कामांवर अग्रवाल यांनी भर दिला. ‘डीआरडीओ’च्या प्रगत प्रणाली प्रयोगशाळेचे संस्थापक- संचालक अग्रवाल, २००५ मध्ये निवृत्त झाले. त्याआधीच पद्माश्री (१९९०) आणि ‘पद्माभूषण’ (२०००) चे ते मानकरी ठरले होते.