अमेरिकी सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती ही सॅण्ड्रा डे ओ’कोनूर यांची ओळख त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहीलच. पण त्यांना हयातभर प्रतिगामीपणाशी संघर्ष कसा करावा लागला आणि तो त्यांनी कसा यशस्वी केला, हे सांगण्याचे काम एखादा शोधक- संवेदनशील चरित्रकारच करू शकेल. त्या मूळच्या टेक्सासमधल्या आणि बालपण गेले अॅरिझोनात. ही दोन्ही राज्ये स्त्रियांनी अधिकारपदे भूषवण्यापासून दूरच. सॅण्ड्रा या एका प्रतिष्ठित ‘रँच’मालकाच्याखानदानात (१९३० साली) जन्मल्या. पहिलेच अपत्य असलेल्या या मुलीला वडिलांनी ‘अगदी मुलासारखेच’ वाढवले- म्हणजे बंदुकीने शिकार करणे आणि मोटारगाडी चालवणे शिकवले. पण कायद्याचे शिक्षण घेण्याच्या इच्छेसाठी त्यांना घरात संघर्षच करावा लागला. कॅलिफोर्नियात जाऊन, स्टॅन्फर्ड विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी मिळवली. हे उच्चशिक्षण घेतानाच खुल्या विचारांचे वकील जॉन ओ’कोनूर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यांनाही वकिली करायची होती, पण आईपणामुळे उशीर झाला.. ज्येष्ठ वकिलांकडे त्यांनी काम सुरू केले तेव्हा अन्य पुरुष वकिलांप्रमाणे स्वतंत्र टेबल न देता, ज्येष्ठ वकीलसाहेबांच्या महिला सेक्रेटरीच्याच टेबलाचा अर्धा भाग सॅण्ड्रा यांना देण्यात आला. तरीही अॅरिझोनाच्या वकिली क्षेत्रात सॅण्ड्रा डे ओ’कोनूर यांनी प्रभावी काम केले. राज्य सरकारच्या अॅटर्नी पदापर्यंत त्या पोहोचल्या. रिपब्लिकन पक्षाशी जवळीक असल्याने अॅरिझोनाच्या सिनेटमध्ये ऑक्टोबर १९६९ मध्ये स्थान मिळाले, ते त्यांनी पुढील दहा वर्षे टिकवले. याच काळात १९७४ मध्ये सॅण्ड्रा यांनी गर्भपाताच्या बाजूने भूमिका घेतली! अर्थात आदल्या वर्षीच अमेरिकेत ‘रो वि. वेड’ निकाल आला होता आणि गर्भपात कायद्याने मंजूर झाला होता, पण रिपब्लिकनांचा- आणि कॅथलिक ख्रिस्ती अमेरिकनांचाही- विरोध कायम असताना सॅण्ड्रा यांनी गर्भपाताला पािठबा देण्याचे धाडस केले. रीतसर निवड होऊन त्या अॅरिझोना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या तेव्हा गर्भपाताला पािठबा देणाऱ्या व्यक्तीला पद नको असा हट्ट धरणारे लोक रिपब्लिकन पक्षात भरपूर होते. मात्र १९८१ मध्ये राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी सर्वोच्च न्यायालयासाठी त्यांची निवड केली तेव्हा ‘विचारधारेचीच री ओढणाऱ्यांपैकी त्या नाहीत’ हा महत्त्वाचा गुण ठरला!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा