सारा जेसिका पार्करचे नाव घेतले की कोणाच्याही डोळ्यांसमोर येते ती ‘सेक्स अँड द सिटी’ ही लोकप्रिय मालिका. एक ‘एमी’ आणि चार ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार नावावर असलेली ही ५९ वर्षीय अभिनेत्री आता वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. तिची ‘बुकर पारितोषिक २०२५’च्या निवड समितीवर नेमणूक झाली आहे.
जेसिका तिने ‘सेक्स अँड द सिटी’त साकारलेल्या कॅरी ब्रॅडशॉ या हातात पुस्तके घेऊन न्यूयॉर्कमध्ये फिरणाऱ्या पात्राप्रमाणेच पुस्तकवेडी आहे. कथाकथनाला प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी तिची पूर्वीपासूनची भूमिका. ग्रंथ विक्रेत्यांच्या हक्कांसाठीही ती वेळोवेळी व्यक्त होत आली आहे. ‘एसजेपी लिट’ नावाचा तिचा स्वत:चा बुकक्लब असून त्यात ‘दे ड्रीम इन गोल्ड’, ‘विमेन अँड चिल्ड्रन’, ‘द स्टोरी ऑफ द फॉरेस्ट’, ‘कोलमन हिल’ इत्यादी पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. जगातील वेगळ्या आवाजांना व्यासपीठ देणे हा या उपक्रमामागचा हेतू आहे.
पार्करमध्ये पुस्तकांविषयीचे प्रेम आले तिच्या पालकांकडून. कवी आणि पत्रकार असलेले वडील आणि नर्सरी शिक्षिका असलेली आई, दोघांनाही वाचनाची आवड होती. आईचे वाचनवेड तर असे की ‘कार पुलिंग’ करतानाही तिच्याजवळ हमखास एखादे पुस्तक असे. कोणत्याही कारणाने कुठे थांबावे लागले की, अजिबात वेळ न दवडता ती शक्य तेवढा भाग वाचून घेत असे. त्यातूनच आपल्यात आणि आपल्या भावंडांत वाचनाची आवड विकसित झाली, असे पार्करचे म्हणणे आहे.
२०२२ मध्ये बुकर पारितोषिकासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यात आली होती. त्यात पुरस्कारासाठी पुस्तक निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना १५० ते १७० पुस्तके वाचावी लागतील आणि त्यातील काही पुस्तके अनेकदा वाचावी लागतील, असे म्हटले होते. त्यावर पार्करने ‘मीसुद्धा प्रयत्न करते,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. आपली प्रतिक्रिया एवढी गांभीर्याने घेतली जाईल, याची तिला तेव्हा कल्पना नसावी.
‘एसजेपीसाठी पुस्तक निवडताना जे निकष ठेवले जातात, तेच इथेही ठेवेन. वेगळा, जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातला, माझ्यासाठी अगदी नवा असलेला आवाज बुकर पारितोषिकाने गौरविण्यात यावा, यासाठी मी प्रयत्न करेन,’ असे तिने ‘न्यू यॉर्क’ टाइम्सला दिलेल्या मुलाखीतत म्हटले आहे.
बुकर पारितोषिक निवड समितीवर पार्करची नेमणूक झाल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आता ती, ही भूमिका कशी वठवते, याविषयी उत्सुकता आहे. पार्करमुळे समितीत कल्पित साहित्यावर प्रेम करणाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळण्याविषयीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र काही टीकाकारांच्या मते अशा सेलिब्रिटीजना परीक्षकाच्या खुर्चीत बसवून पारितोषिकाचे गांभीर्य कमी केले जात आहे. पार्करने उच्चशिक्षण घेतलेले नाही. तिच्याकडे महाविद्यालयीन पदवीही नाही, त्यामुळे तिच्या निवडीच्या विरोधातही सूर उमटू लागले आहेत. पार्कर मात्र अशा टीकेने डळमळीत होणाऱ्यांपैकी नाही.
कथाकथन ही वैश्विक कला आहे आणि बुकर पारितोषिकाचे विजेते निवडण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची, उत्तमोत्तम लेखकांच्या साहित्याला दाद देण्याची संधी मिळणे अभिमानास्पद आहे, असे मत तिने माध्यमांत व्यक्त केले आहे.