पाकिस्तानी सरकारातील किंवा प्रशासनातील व्यक्ती बऱ्याचदा तेथील क्रिकेटच्या प्रशासकही असतात. शहरयार खान अशांपैकीच एक. भारतीयांना त्यांची दुहेरी ओळख. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव म्हणून आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे दोन वेळचे अध्यक्ष म्हणून. रूढार्थाने ते ‘महाजिर’. भारतात जन्मलेले. परंतु परवेझ मुशर्रफ यांच्यासारखे ते कडवे महाजिर नव्हते. प्रसन्न, ऋजू आणि समजूतदार असे हे व्यक्तिमत्त्व. पेशाने आणि कर्मानेही मुत्सद्दी. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांच्या काटेरी प्रवासात गुलाब पेरणाऱ्या मोजक्यांपैकी एक. पाकिस्तान क्रिकेट नामे गोंधळकल्लोळात शहाणपण शाबूत ठेवून पाकिस्तानी गुणवत्तेला योग्य वळण देणारे बहुधा एकमेव. 

मध्य प्रदेशातील कुरवाई या छोटय़ाशा संस्थानाचे नवाब सरवार अली खान यांच्या घरात शहरयार फाळणीपूर्व काळात जन्माला आले. शहरयार यांची आई अबिदा सुल्तान या भोपाळचे नवाब हमिदुल्ला खान यांच्या कन्या. त्यांची थोरली बहीण साजिदा सुल्तान या शहरयार यांच्या मावशी. साजिदा यांचे पती इफ्तिकार अली खान पतौडी. साजिदा-इफ्तिकार यांचे चिरंजीव मन्सूर अली खान पतौडी हे शहरयार यांचे मावसभाऊ. क्रिकेट आणि नवाबी नजाकत यांचा वारसा असा कुटुंबातच मिळालेला. अबिदा या शहरयार यांना घेऊन १९५०मध्येच पाकिस्तानात गेल्या. तत्पूर्वी भारतात शहरयार यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. डेहराडून मिलिटरी अ‍ॅकॅडमी स्कूल आणि इंदूरचे डॅली कॉलेज येथे ते शिकले.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Manisha kayande
मुख्यमंत्री शिंदेच पुन्हा ‘किंग’?… शिवसेना प्रवक्त्यांनी जे सांगितले त्यावरून…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Aditya Thackeray vidhan sabha
वरळीतील ठाकरे गटाच्या प्रचाराची भिस्त तीन आमदार, दोन माजी महापौर, माजी उपमहापौरांवर

पाकिस्तानात गेल्यानंतर मुलकी सेवा परीक्षा देऊन ते पाकिस्तान परराष्ट्र सेवेत दाखल झाले. जॉर्डन, ब्रिटन येथे पाकिस्तानचे राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९० ते १९९४ या काळात ते पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव होते. प्रथम नवाझ शरीफ आणि नंतर बेनझीर भुत्तो यांच्याबरोबर त्यांनी काम केले. काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवादी घुसखोर पेरण्याचे पाकिस्तानी लष्करशहांचे धोरण त्या काळात अव्याहत सुरू होते. त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न शहरयार खान यांनी केल्याचे पुरावे आढळत नाहीत. पण शरीफ यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांनीच पडद्यामागे धावपळ केल्याचे सांगितले जाते. चर्चा आणि संवादाविषयी त्यांना ममत्व होते.

पाकिस्तानी क्रिकेटची धुरा त्यांच्याइतकी उत्कृष्टपणे इतर कोणी सांभाळली नाही, असे आजही सांगितले जाते. संघर्ष दोन प्रकारे असायचा. देशांतर्गत आणि बाह्य क्रिकेट जगताशी. टोकाची भूमिका न घेता, कटुता न आणता प्रश्नांची सोडवणूक करण्यास शहरयार यांनी प्राधान्य दिले. पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे आपसांतील हेवेदावे, सामनेनिश्चिती, २००९मधील लाहोर दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटचे झालेले विलगीकरण अशी एकामागून एक संकटे आली. त्यांना शहरयार एखाद्या मुत्सद्दय़ाच्या तयारीने आणि अभ्यासाने सामोरे गेले. बीसीसीआयशी जुळवून घेण्याचे कसबही त्यांनी दाखवले, त्यासाठी प्रसंगी स्वत:च्या देशात वाईटपणा घेतला. शहरयार खान यांच्या निधनाने मुत्सद्देगिरीचा एक रसरशीत अध्याय संपुष्टात आला.