बालकांवरील शस्त्रक्रियेसारखी नाजुक गोष्ट आणि त्याचवेळी काहीसे रूक्ष वाटावे असे प्रशासकीय कामकाज, दोन्ही आवडीने करणाऱ्या डॉ. स्नेहलता देशमुख. नुकतेच त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गंभीर आजारी असलेले आपले बाळ कुणी डॉ. देशमुख यांच्याकडे सोपवावे आणि त्यांच्या स्नेहलता या नावाला साजेसा शांत चेहरा पाहून मनातली घालमेल क्षणात थंड व्हावी असे त्यांचे आश्वासक व्यक्तिमत्त्व. त्याचवेळी कठोर निर्णय घेण्यासाठी लागणारा करारीपणा, त्याला नेतृत्व गुणांची जोड आणि नावीन्याचा वेध घेण्याची वृत्ती. जन्म नगरचा, तरी त्यांची जडणघडण मुंबईतलीच. शीव रुग्णालयाशी त्यांचे पिढ्यानपिढ्यांचे नाते. त्यांचे वडील डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर नामांकित शल्यचिकित्सक. शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालय व केईएम रुग्णालयात ते अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. आज डॉ. देशमुख यांची कन्याही शीव रुग्णालयात रुग्णसेवा करत आहे. डॉ. देशमुख यांना खरेतर कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचे शिक्षण घ्यायचे होते. पण एमबीबीएसला प्रथम येऊनही, त्याकाळी मुलींना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात नसे म्हणून त्या अर्भक- शल्यविशारद झाल्या. त्या १९९० साली लो. टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाता झाल्या. जागतिकीकरणाच्या त्या सुरुवातीच्या टप्प्यातही, शासकीय रुग्णालयात अनेक नवे विभाग, नव्या उपचार पद्धती सुरू करण्यासाठी डॉ. देशमुख प्रयत्नशील राहिल्या. त्यांच्या कार्यकाळात शीव रुग्णालयातील ‘संशोधन सोसायटी’ला विशेष महत्त्व होते. दुग्धपेढी ही संकल्पना नवी होती. त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात त्यांचा पुढाकार होता. मातांच्या शरीरातील ‘फॉलिक अॅसिड’च्या कमतरतेमुळे नवजात अर्भकांच्या पाठीवर एक विशिष्ट प्रकारची गाठ असण्याचे प्रमाण खूप होते. विशेषत: धारावीत अशी बालके आढळत. डॉ. स्नेहलता यांनी सहकारी डॉक्टरांसोबत या प्रश्नावर काम केले. असे का घडते ते सिद्ध केले. त्याबाबत असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यानंतर धारावीत गर्भवती महिलांना ‘फॉलिक अॅसिड’च्या गोळ्या वाटण्यात येऊ लागल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा