आजोळ कुरुंदवाड. बालपण हुबळीत. वडील रामचंद्र कुलकर्णी हे प्रख्यात शल्यविशारद.. हा कौटुंबिक तपशील जितका सुधा मूर्तीबद्दल खरा, तितकाच श्रीनिवास कुलकर्णीबद्दलही! पण या चार भावंडांच्या कुटुंबातील कुणीही एकमेकांच्या प्रसिद्धीवर अवलंबून नाही. किंबहुना श्रीनिवास कुलकर्णी यांना आता हाँगकाँगचे ‘शॉ पारितोषिक- खगोलशास्त्र’ जाहीर झाल्यामुळे त्यांची कीर्ती केवळ अंतराळभौतिकी आणि खगोलविज्ञानापुरती न राहता दिगंत झाली आहे. खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि गणितशास्त्र अशा तीन शाखांमधील प्रत्येक शाखेच्या मानकऱ्याला मानपत्र, मानचिन्ह आणि १२ लाख (अमेरिकी) डॉलर अशा स्वरूपाचे हे ‘शॉ पारितोषिक’ असते. ते कुलकर्णी यांना जाहीर करताना, ‘त्यांच्या संशोधन व अभ्यासामुळे अवकाशीय प्रकाशघटनांतील काल-परिवत्र्यतेच्या अभ्यासाचे स्वरूप पालटले’ अशी दाद ‘शॉ फाऊंडेशन’ने दिली आहे.
‘अवकाशीय प्रकाशघटनांतील काल-परिवत्र्यता’ – इंग्रजीत ‘टाइम-व्हेरिएबल ऑप्टिकल स्काय’ हे शब्दसमूहसुद्धा सामान्यजनांना अनाकलनीय वाटतील. नेमका कुठला अभ्यास श्रीनिवास कुलकर्णी करतात, असा प्रश्नही पडेल. त्याचे अतिसोपे उत्तर म्हणजे, ताऱ्यांचे लुकलुकणे ते मोजतात.. अगदी काटेकोरपणे! अर्थात त्यांच्या अभ्यासाचा परीघ याहून खूपच मोठा आहे. तारे अथवा त्याहून अधिक वेगाने- पण कमी काळ प्रकाशित दिसणाऱ्या ‘पल्सर’चा प्रकाश हा रेडिओ लहरींवर अवलंबून असतो. या रेडिओ लहरींची लांबी आणि त्यांचे प्राबल्य पल्सरमध्ये कमीजास्त होत असते. अशा अनेक पल्सरच्या प्रकाशकारकीर्दीचा अभ्यास करून, त्यांमधल्या तफावती आणि साम्यस्थळे कुलकर्णी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी मोजली. या मोजदादीसाठी नवी साधने कोणती – कशी आवश्यक आहेत यावर अभ्यास तर केलाच पण ‘गॅलेक्टिक रेडिओ एक्स्प्लोअरर’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट एक्स्प्लोअरर’ यांसारखी अभ्याससाधने उभारलीसुद्धा. छोटे उपग्रह आणि त्यांची प्रकाशीय क्षमता यांचीही मोजदाद यातून झाली. अवकाशीय गॅमा किरणांचा अभ्यास त्यांनी पुढे नेला आणि कमी आयुर्मानात भपकन प्रकाश देणाऱ्या सुपरनोव्हांचाही अभ्यास त्यामुळे पुढे गेला. सापेक्षतावाद आणि क्वांटम सिद्धान्त यांचे आकलन या साऱ्या अभ्यासांच्या परिणामी वाढू शकेल, इतके काम त्यांनी केले.
अमेरिकेत ‘कॅल्टेक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅलिफोर्निया तंत्रशास्त्र संस्थेत कुलकर्णी हे खगोलविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. तिथे खासगी व सार्वजनिक विद्यापीठांच्या सहभागातून त्यांनी ‘झ्विकी ट्रान्झियंट फॅसिलिटी’ ही वेधशाळा उभारली. याचाही खास उल्लेख ‘शॉ फाऊंडेशन’ने केला आहे. ‘शॉ पारितोषिका’च्या मानकऱ्यांपैकी, कुलकर्णी हे भारतीय वंशाचे पहिलेच ठरले आहेत.