‘युक्रांद’- युवक क्रांती दल- या चळवळीला सुरुवातीस अवघ्या दोघा-तिघांच्या साथीने मुंबईत रुजवणारे अरुण ठाकूर, स. का. पाटील वि. जॉर्ज फर्नांडिस या (दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ- १९६७) निवडणुकीत जॉर्ज यांच्यासाठी झटून काम करणारे लोहियावादी अरुण ठाकूर, रुईया महाविद्यालयात शिकून ‘स्टॅटिस्टिक्स-इकॉनॉमिक्स’ या विषयात मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाल्याने ‘मफतलाल’सारख्या तत्कालीन बड्या कंपनीत वरिष्ठ पद मिळवणारे, ‘मफतलाल’चे संगणकीकरण झाल्यानंतर पुढे ‘सीएमसी’ या कंपनीतर्फे देशाच्या संगणकीकरणाला मोठा हातभार लावणारे अरुण ठाकूर, हे सारे एकाच व्यक्तित्वाचे पैलू होते. या पैलूंमध्ये तुटलेपणा नव्हता. विषय मुळापासून समजून घेण्याची बौद्धिक आस, संघटन करण्याची हातोटी आणि पुढे काय होणार आहे हे पाहण्याची क्षमता हे व्यक्तिगत गुण जसे या सर्व पैलूंत समानपणे दिसले, तसेच लोहियावादी तत्त्वज्ञानाची बैठक अगदी कॉर्पोरेट विश्वातसुद्धा त्यांनी सोडली नाही. त्यामुळे झाले असे की, कॉर्पोरेट विश्वात मिळवलेल्या यशाला व्यक्तिगत यश म्हणून मिरवणे तर सोडाच उलट घर चालवण्यासाठी आणि जोडीदाराला (रेखा ठाकूर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष) तसेच मुलांना (सई ठाकूर- ‘टाटा समाज विज्ञान संस्थे’त सहायक प्राध्यापक व सौरभ ठाकूर- दृश्यकलावंत) अधिक स्वातंत्र्य मिळावे म्हणून केलेली वैयक्तिक निवड मानून ते कार्यरत राहिले. गेल्या पाच वर्षांत वयपरत्वे त्यांचे काम आणि सलग बोलणे कमी झाले होते, बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या या अरुण ठाकुरांची ओळख ‘कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते’ अशी करून द्यायला हवी. स्वत: महाविद्यालयात असताना नायगावच्या कामगार वस्तीतील आठवी-नववीच्या मुलांशी संवाद ठेवून त्यांतून कार्यकर्ते घडवणारे अरुण ठाकूर, ‘मफतलाल सेंटर’ या नरिमन पॉइंट भागातल्या संगमरवरी इमारतीतल्या त्यांच्या कचेरीकक्षात कार्यकर्त्यांना मुक्त प्रवेश असे. लेनिन ते लोहिया हा प्रवास समजावून सांगताना भारतासाठी कोणता समाजवाद योग्य आणि त्यासाठी आता संघर्षाचा मार्ग कसा आवश्यक हेही सांगून आपले वैचारिक भरणपोषण करणारा हा अरुण (कार्यकर्त्यांसाठी अरे-तुरेच) आपल्या पोटाची भूकही न सांगता ओळखतो, असा विश्वास या कार्यकर्त्यांना होता. पुन्हा संध्याकाळी काळा घोडा भागातल्या मोर्चालाही हा हजर असतो म्हणून आपुलकीही होती. अभ्यासवर्गाला अरुणच हवा, हा आग्रह त्या आपुलकीतून येई. पुढे आणीबाणीनंतर आणि ‘जनता पक्षा’च्या सरकारचा प्रयोग फसल्यानंतर पक्षबाह्य राजकीय कार्याचा प्रस्ताव उचलून धरणाऱ्या फळीचे खंदे समर्थन अरुण ठाकुरांनी केले. तोवर मागल्या दारानेच समाजकार्यात प्रवेश करणाऱ्या ‘स्वयंसेवी संस्थां’मुळे- अर्थात एनजीओंमुळे- राजकीय विचारधारांचे नुकसानच होणार आहे, हे पहिल्यांदा ओळखणाऱ्या काहींपैकी ते एक. त्यामुळे विधायक काम तुम्हाला नकोच की काय, अशा अटीतटीच्या वादाचाही प्रतिवाद त्यांना करावा लागला होता. १९८५ नंतर हे सक्रिय काम त्यांनी जवळपास सोडले. पण म्हणून कार्यकर्त्याचा आशावाद त्यांनी सोडला नव्हता. उलट ‘सीएमसी’तल्या तत्कालीन संगणक-तज्ज्ञांपर्यंतही लोहियावादी समतावाद आणि श्रमप्रतिष्ठेचा विचार त्यांनी स्वत:च्या उदाहरणाने (केबिनऐवजी क्युबिकल्सची सुरुवात, पोशाखातून ‘टाय’ची हद्दपारी) रुजवला होता!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh statistics economics mumbai university gold medal amy
Show comments