वयाच्या साठीत असलेले तंदुरुस्त नल्लमुथू गेली किमान १५ वर्षे वन्यजीवांवर लघुपट/ माहितीपट तयार करतात. त्यांच्या लघुपटांनी पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत आणि आता,‘मिफ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘व्ही. शांताराम कारकीर्द-गौरव’ सन्मानदेखील त्यांना मिळाला आहे. मानपत्र आणि १० लाख रु. रोख अशा स्वरूपाच्या या पुरस्कारासाठी हिंदी वा अन्यभाषक अभिनेत्यांपासून दिग्दर्शकांचा विचार केला जातो; त्यांतून वाट काढत हा पुरस्कार नल्लमुथूंपर्यंत पोहोचला. याआधी नॅशनल जिऑग्राफिक, बीबीसी यांसाठी त्यांनी काम केलेच पण तांत्रिक सफाई, वाघाच्या जबड्यामध्ये पोहोचणारी समीपदृश्ये आणि जनावर काय करणार आहे याचा मागोवा घेणारी ‘गोष्ट’ त्याच्या बहुतेक लघुपटांत दिसते. ‘मी माहितीपटकार नाही; लघुपटकार आहे. मी केवळ माहिती देत नसून प्राण्यांचे भावजीवन टिपण्याचा यत्न करतो’, असे सांगणाऱ्या नल्लमुथू यांना एकेका वाघाची ‘गोष्ट’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असते.
उदाहरणार्थ मछली ही ‘रणथंबोरची राणी’ म्हणून ओळखली जाणारी वाघीण. नऊ वर्षे नल्लमुथू या वाघिणीचा माग काढत होते. तिच्या दोन विणी त्यांनी टिपल्या, अवखळ छाव्यांना ही वाघीण कायकाय शिकवते, नरांशी कशी वागते याचे चित्रण नल्लमुथू करत असतानाच अखेर मछलीचे निधन झाले, तेव्हाही नल्लमुथू तिथे होते. ती १९ वर्षे जगलेली एकदा मगरीच्या झुंजीतूनही सुटलेली महत्त्वाकांक्षी, ताकदवान वाघीण. किंवा इथलीच दुसरी वाघीण बाघिनी. तिला सरिस्का अभयारण्यात पाठवले गेले, ते ‘पहिलेच शास्त्रीयदृष्ट्या उचित असे स्थलांतर’ होते, अशी माहिती नल्लमुथू देतात बाघिनीने नव्या परिसराशी कसे जुळवून घेतले, क्षेत्राचा व्याप कसा वाढवला याचा तपशील ते टिपतात. याखेरीज ईशान्य भारताचे प्रतीक ठरलेला ‘महाधनेश’ (ग्रेट इंडियन हॉर्नबिल) हा माणगावपासून पुढल्या पश्चिम घाट पट्ट्यात आढळतो, या भागातली ‘सिंहमुखी वांदरे’ तसेच ‘वनमानव’ माकडे आता दुर्मीळ होत चालली आहेत … यासारख्या माहितीकडे मनोरंजकपणे नेणारा लघुपट पश्चिम घाट भागातील वन्यजीवांचे जगणे मांडतो. बारावीनंतर नल्लमुथू चित्रपट क्षेत्राकडे आकृष्ट झाले. कॅमेरामन म्हणून चेन्नईच्या चित्रपट-क्षेत्रात उमेदवारीही केली. काही वर्षांनी ते ‘इस्राो’मध्ये लागले आणि तिथे नोंदवजा चलचित्रण करतानाच, अग्निपंख अथवा तत्सम पक्ष्यांची उड्डाणे टिपण्याचे काम ‘इस्राो’ने (उड्डाण तंत्राच्या अभ्यासासाठी) दिले. चित्रवाणीसाठीही १९८७ पासून त्यांनी भरपूर काम केले. ‘धर्म’ हा ‘एचडी’ तंत्राने बनलेला भारतातला पहिला पूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट काढण्याचे श्रेयही त्यांचे! ताज्या ‘व्ही. शांताराम जीवन गौरवा’ने याहीपुढल्या पुरस्कारांच्या वाटा खुल्या झाल्या आहेत.