‘सुनीती जैन गेल्या’ ही बातमी आल्यावर ‘अच्छा, अशोक जैन यांच्या पत्नी’ असा उल्लेख अपरिहार्य असला तरी तेवढीच त्यांची ओळख माहीत असणे करंटेपणाचे असू शकते, एवढे संचित सुनीतीबाईंनी नक्कीच कमावले होते. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्याबद्दलचे जे मोजके, पण अत्यंत जिव्हाळय़ाचे जे लेखन प्रसृत होते आहे, त्यावरून त्यांनी जमवलेलं, जपलेलं मैत्र आजच्या ‘फ्रेण्ड्स विथ बेनिफिट’च्या जमान्यात किती दुर्मीळ असू शकतं याचा अंदाज यावा. ‘महाराष्ट्र सरकारच्या दिल्लीतील माहिती केंद्रात माहिती अधिकारी, तसेच मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्यात त्यांनी नोकरी केली’ या विकिपीडियासदृश माहितीपलीकडच्या सुनीती जैन अत्यंत रसरशीत. गिरिभ्रमणात रस असणाऱ्या आणि ते करणाऱ्याला जणू हे विशेषण आपोआप लागते. एव्हरेस्ट चढण्याचं स्वप्न बघण्याइतकी त्यांना गिर्यारोहणाची आवड होती. हे स्वप्न पूर्ण झालं नाही, पण एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत त्यांनी मजल मारली होती.

डोंगरदऱ्या भटकण्याची आवड असणाऱ्यांचा सहसा टेबलवर बसून लिखाण, अनुवाद याकडे कल असत नाही. पण सुनीतीबाई याला सणसणीत अपवाद होत्या. डॉ. रवी बापट यांच्याशी बोलून त्यांनी लिहिलेले ‘वॉर्ड नंबर ५’ हे पुस्तक खूपच गाजले. पती अशोक जैन यांच्या मधुमेहाशी दोन हात करताना त्यांनी स्वत:ही मधुमेहाचा ‘अभ्यास केला’ असे म्हणावे या पातळीवर मधुमेह समजून घेतला आणि डॉ. प्रदीप तळवळकर यांची ‘डायबॅसिटी’ आणि ‘मधुमेही खुशीत’ ही पुस्तके मराठीत अनुवादित केली. अशोक जैन आजारी असल्यामुळे काही पुस्तके त्यांनी सांगितली आणि सुनीतीबाईंनी लिहून घेतली अशा स्वरूपाची आहेत. ब्योमकेश बक्षी आणि फेलुदा हे अशोक जैन यांनी केलेले अनुवाद या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचले आहेत.

 सुनीतीबाईंच्या स्वतंत्र लिखाणात बृहन्मुंबईचे प्रशासन आणि इतिहास या विषयावर त्यांनी मुलाखती घेऊन, अभ्यास करून लिहिलेले पुस्तक महत्त्वाचे आहे. त्यांनी आणि वासंती फडके यांनी मिळून अलीकडच्या काळात मधु लिमये यांच्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला होता. अशोक जैन दिल्लीत पत्रकारिता करत त्या काळात मधु लिमये, मधु दंडवते या नेत्यांचा सत्तावर्तुळात बौद्धिक दबदबा होता. तो काळ जवळून पाहिलेल्या आणि राष्ट्र सेवा दलात बालपणापासून असलेल्या सुनीती जैन यांच्यासाठी मधु लिमये यांचे पुस्तक अनुवादित करणे किती आनंदाचे आणि जबाबदारीचे काम ठरले असणार याची कल्पना करता येते. मुंबईत परतल्यानंतर केशव गोरे स्मारक ट्रस्च्या उपक्रमांतही त्या कार्यरत राहिल्या.

Story img Loader