मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अधिक पैशांची गरज लागेल, म्हणून शिक्षकी पेशाच्या वडिलांनी मुलाच्याच नावाने ‘सुरेश रद्दीची वखार’ सुरू केली आणि सुरेश चांदवणकर यांना अगदी लहान वयातच वाचन आणि ध्वनिमुद्रिका यांचे वेड लागले. पुण्याच्या अगदी मध्यभागात शनिपारापाशी असलेल्या या वखारीत मध्यमवर्गीयांना आतासारखे उघडपणे येणे अवघडल्यासारखे वाटे, मात्र गुपचूप येऊन लपवून आणलेली रद्दी देणाऱ्यांकडील महत्त्वाच्या ऐवजामुळे चांदवणकरांवर झालेले संस्कार अधिक महत्त्वाचे ठरले. दुकानात ४ किंवा ८ आणे किलोने आलेल्या जुन्या ध्वनिमुद्रिका हे त्यांचे भाग्यसंचित होते. त्या छंदाचे अभ्यासात आणि नंतर संग्रहालयात रूपांतर होण्यासाठी सुरेश यांची चिकाटी, कष्टाची तयारी कारणीभूत ठरली. भारतात विसाव्या शतकाच्या प्रारंभीच अवतरलेल्या या जादुई तंत्रज्ञानाने संगीताच्या दुनियेत जे आमूलाग्र बदल घडत गेले, त्याचे संशोधन हा चांदवणकर यांचा ध्यास होता. वैज्ञानिक म्हणून उच्चशिक्षणानंतर मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधक म्हणून काम करत असतानाही त्यांनी आपल्या ध्वनिमुद्रिका संग्रहाचे वेड मन:पूत जपले. भारतातील आणि परदेशातील अशा ध्वनिमुद्रिका संग्राहकांना एकत्र आणून देवाणघेवाण करणाऱ्या चांदवणकरांनी हा सारा खजिना सर्वासाठी उपलब्ध करून दिला. १९७५मध्ये कॅसेटचा जमाना आला आणि ध्वनिमुद्रिका जवळपास हद्दपार झाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरी त्यामध्ये साठवलेले संगीत हा खरोखरीच अनमोल खजिना होता. तो सुरेश यांनी जपला आणि वाढवला. भारतीय संगीताच्या एका अतिशय उज्ज्वल काळातील ध्वनिमुद्रिका हा संगीताच्या बदलत्या शैलीचा आविष्कार होता. अगदी प्रारंभीच्या काळात ध्वनिमुद्रण भारतात होत असे आणि त्याची तबकडी इंग्लंडमध्ये तयार होत असे. तेथील तंत्रज्ञांना भारतीय कलावंतांची नावे माहीत नसल्याने, ध्वनिमुद्रिकेच्या लेबलवर चुका होत. त्यामुळे ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी कलावंताने आपले नाव जाहीर करून टाकण्याची पद्धत असे. त्या काळच्या अनेक ध्वनिमुद्रिका आय अ‍ॅम अ गोहरजान ऑफ इंडिया या वाक्याने संपतात. संगीताचा हा इतिहास किती महत्त्वाचा आहे, हे जाणकारांच्या सहज लक्षात येणारे आहे.  तरीही बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, विष्णू दिगंबर पलुस्कर, भास्करबुवा बखले, अल्लादिया खाँ यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांचे गाणे काळाच्या पडद्याआड राहिले. सुरेश चांदवणकरांची चिकाटी अशी की ध्वनिमुद्रिकांच्या शोधात त्यांना जे अमूल्य संगीत सापडले, त्यामुळे भारतीय संगीताच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडू शकला. चांदवणकर यांच्या निधनाने, या क्षेत्रातील एक हरहुन्नरी, जाणकार आणि संगीताच्या इतिहासाचा भाष्यकार आपल्यातून निघून गेला आहे!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh suresh chandwankar higher education suresh raddi readingaudio recorder amy