‘माझ्या शब्दांनो, चालते व्हा- जा परत, जिथनं आलात त्या शब्दकोशांत/ किंवा मग घोषणांमध्ये, भाषणांमध्ये जाऊन बसा… नेतेमंडळींची चाकरी करा/ ओलावा उरलाच असेल तुमच्यात, तर आयाबहिणींच्या हुंदक्यांत थिजून आत्महत्याच का नाही करत तुम्ही? जीव उरलाय म्हणताय? मग शब्दांनो, याच माताभगिनींचं आक्रंदन होऊन पाहा की जरा…/ काय तर म्हणे तुम्ही अंधाऱ्या वाटेवरले दिवे होणार होतात, वाटसरूंना मार्ग दाखवणार होतात, अंगाई गाणार होतात/ गाणी बनून म्हणे तुम्ही जत्रांमध्ये नाचणार होतात, दिव्यांची फौजही होणार होतात तुम्हीच… पण मला कुठं माहीत होतं- अश्रूंपेक्षा तलवारच बलवत्तर ठरणार असल्याचं/ आणि मला कुठं माहीत होतं- सांगणारे नि ऐकणारेही इतके मद्दड होतील की, शब्दांनो, तुम्ही निरर्थकच ठरणार असल्याचं?’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासारख्या कुणालाही भिडणाऱ्या, प्रभावशाली कविता गेल्या अर्धशतकभरात ज्यांनी लिहिल्या, ते पंजाबी कवी सुरजित पातर शनिवारी, वयाच्या ७९ व्या वर्षी लुधियानातल्या राहत्या घरी झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले. मूळचे ते जालंधरचे, पण पदव्युत्तर शिक्षणासाठी अमृतसर आणि प्राध्यापकीसाठी लुधियानात आलेले सुरजीत पातर हे पंजाबातच राहून तिथल्या स्थितीगतीला काव्यरूप देणाऱ्यांपैकी. त्यांनी नाटकांचेही अनुवाद केले-बर्टोल्ट ब्रेख़्त, गिरीश कार्नाड आणि युरिपिडस ही मूळ नाटककारांची नावे पाहिल्यास आधुनिक नाट्यकलेकडे पातर यांचा कल दिसून येतो. पण त्याहीपेक्षा समाजापर्यंत पोहोचण्याकडे त्यांचा ओढा होता. तोच त्यांच्या कवितांमधल्या सुबोधपणातून दिसतो. शब्दांवर कवी प्रेम करेल, पण समाज शब्दांकडे तिऱ्हाईत-तटस्थपणेच पाहणार आहे, याची त्यांना झालेली जाणीव ‘माझ्या शब्दांनो…’खेरीज आणखीही कवितांमध्ये दिसते. चुटकेवजा पाच-सहा ओळींच्या कवितांतूनही भाष्य करण्याची त्यांची आस वाचकाला जाणवते. संयत, सज्जनपणानेच हे भाष्य होत असल्याने कवितेचा कलात्म पाया कुठेही ढळत नाही. त्यामुळेच, १९७९ सालच्या पंजाब साहित्य अकादमी पुरस्कारापासून १९९३ चा केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, १९९९ मध्ये कोलकात्याचा भारतीय भाषा परिषद (पंचनद) पुरस्कार, २००९ मध्ये ‘सरस्वती सम्मान’ आणि त्याच वर्षी ओदिशाचा ‘गंगाधर पुरस्कार’, २०१२ मध्ये ‘पद्माश्री’ किताब, तर २०१४ साली नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज पुरस्कार, असे चौफेर कौतुक त्यांना मिळाले.

पण कवीचे असमाधान पातर यांनी तरीही जपले होते; हे त्यांचे मोठेपण! सरकारची खप्पामर्जीही नको किंवा ‘बंडखोर, गुरिल्ला’ लोकांचाही रोष नको, म्हणून ओळींमागून ओळी खोडणारा कवी हा ‘कवीसाहेब’ होऊ पाहतो आहे काय, याची बोच त्यांनी (ऐन खलिस्तानी चळवळीच्या काळात!) अत्यंत सुशीलपणेच व्यक्त केली होती!