ज्या गॅरेजमध्ये गूगलची पायाभरणी झाली, ते गॅरेज ज्यांचे होते; गूगल इमेजेस, गूगल अॅनालिटिक्स गूगल डूडल ज्यांनी लाँच केले; यूट्यूबला इथवर पोहोचवण्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले; कॉर्पोरेट जगतात महिलांचे प्रमाण वाढावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले अशा गूगलच्या ‘एम्प्लॉयी नंबर- १६’ सुसन वोचेत्स्की यांचे नुकतेच कर्करोगाने वयाच्या अवघ्या ५६व्या वर्षी निधन झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुरुषसत्ताक असलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुसन यांनी स्वत:ची ठसठशीत ओळख निर्माण केली आणि इंटरनेटसंबंधीत तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचा भरभक्कम पायाही रचून दिला.
सुसन यांचा जन्म कॅलिफोर्नियातील पालो अल्टोमध्ये ५ जुलै १९६८ रोजी झाला. आज हे शहर सिलिकॉन व्हॅलीचा भाग आहे, मात्र तेव्हा ते एक सुस्तावलेले उपनगर होते. सुसन यांचे पोलिश वडील स्टॅन्ली वोचेत्स्की स्टॅनफर्ड विद्यापीठात भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारातच त्या मोठ्या झाल्या. मानव्यविद्योचा अभ्यास केलेल्या साहित्य आणि इतिहासची ऑनर्स पदवी संपदान केलेल्या सुसन यांना पुढे तंत्रज्ञानात स्वारस्य निर्माण झाले. संगणकशास्त्राचे शिक्षण घेऊन त्या ‘इंटेल’मध्ये रुजू झाल्या. विवाहबद्ध झाल्या. घर घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना त्यांनी त्यांचे गॅरेज लॅरी आाणि ब्रिन या परिचितांना भाड्याने दिले. त्यांनी तिथे ऑफिस थाटले आणि तिथेच जन्म झाला आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गूगलचा. १९९९मध्ये सुसान यांनी इंटेल सोडले आणि गूगलच्या पहिल्या मार्केटिंग मॅनेजर झाल्या. डिझायनर रुथ केडर यांच्या मदतीने त्यांनी गूगलचा लोगो तयार करून घेतला. पहिले गूगल डूडल तयार केले आणि इमेज सर्चची सुविधा दिली. पुढे गूगलच्या व्हिडीओ सर्चशी स्पर्धा करणाऱ्या यूट्यूबकडे त्यांचे लक्ष गेले. ही कंपनी गूगलने खरेदी करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि २००६मध्ये तो प्रत्यक्षातही आणला.
सुसन २०१४मध्ये यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. २०१५मध्ये त्यांचा समावेश ‘टाइम मॅगझिन’च्या १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत झाला. ‘टाइम’ने त्यांचे वर्णन ‘इंटरनेटवरची सर्वाधिक बलशाली महिला’ असे केले. जाहिरात हा सुसनचा हातखंडा होता, पण यूट्यूबचा जाहिरातमुक्त अनुभव देणारी ‘यूट्यूब प्रीमियम’ ही सशुक्ल सेवा सुरू करण्याची कल्पनाही त्यांचीच होती. द्वेषयुक्त आशयासंदर्भातील वादांना सुसन यांना तोंड द्यावे लागले. त्यांनी तत्त्वांसाठी लढा दिला. कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह वेळ व्यतीत करण्यासाठी स्वतंत्र रजा दिली जावी, तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्यांतील लैंगिक भेदभाव दूर व्हावेत यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सुसन वोचेत्स्की यांच्या जाण्याने इंटरनेट विश्वातील इतिहासाची एक साक्षीदार पडद्याआड गेली आहे.