‘नोबेल पारितोषिकाचे पहिले चिनी मानकरी’ ठरण्याचा मान ज्या दोघांना (१९५७ मध्ये, विभागून) मिळाला, त्या भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक त्सुंग दाओ ली आणि दुसरे चेंग निंग यांग. यापैकी त्सुंग दाओ ली यांचे निधन अलीकडेच झाले. हे दोघेही चीनमध्ये जन्मलेले, पण अमेरिकेत निरनिराळ्या ठिकाणी संशोधन करत होते. एकाच देशाचे नसते, तरी एकाच क्षेत्रातले म्हणून हे दोघे एकत्र आले असते!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दोघांनी आण्विक बलांचा अभ्यास केला आणि ‘धनभारित व ऋणभारित आण्विक बलाच्या सूक्ष्मकणांत भारांची तुल्यता (पॅरिटी) असते’ हा तोवरचा सिद्धान्तवजा समज त्यांनी १९५६ मध्ये खोडून काढला. भारित सूक्ष्मकणांच्या हालचाली बहुतेकदा आरशातल्या प्रतिमेप्रमाणे होतात आणि तुल्यता कायम राहते, असा तोवरचा समज होता. त्यावर विसंबता येणार नाही आणि सूक्ष्मकणाची हालचाल शिस्तीनेच होते असे मानण्यात अर्थ नाही, हे त्सुंग दाओ ली यांच्यामुळे मान्य झाले. या दोघांना ‘नोबेल’ मिळाल्यानंतर पुढल्या संशोधनाची नवी दिशा खुली होऊन, सुमारे सात वर्षांनी पीटर हिग्ज यांनी ‘बोसॉन’चे सैद्धान्तिक विवेचन केले.

मोरचुदाच्या एका समस्थानिकावर (कोबाल्ट आयसोटोप) ली आणि यांग यांनी प्रत्यक्ष प्रयोग केले होते. त्यामुळे त्यांचा सिद्धान्त मान्य झाला. पण १९५७ मधल्या या उत्तुंग भरारीनंतर ली यांनी पुढे काय केले? हे यश मिळाले तेव्हा ली यांनी नुकता तिशीत प्रवेश केला होता! पुढल्या आयुष्याचा हा उंबरठा… तो ओलांडून पुढेही ते कार्यरत राहिले का?

होय. ते कार्यरत राहिले आणि पुढेही गेले. १९६१ पर्यंत ली आणि यांग या जोडीने एकत्रित प्रयोग केले होते. पुढे आपला मार्ग वेगळा असल्याचे ठरवून ली यांनी काम सुरू ठेवले. ‘ली प्रतिरूप’ म्हणून सूक्ष्मकण- हालचालींचे एक प्रतिरूप आज त्यांच्या नावाने ओळखले जाते तसेच ‘केएलएन थिअरम’ म्हणून ओळखले जाणारे प्रमेय मांडण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.

व्यक्तिगत जीवनात, चीन ते अमेरिका या ली यांच्या प्रवासाला – त्यांनी कधीही, कुठेही उल्लेख केलेला नसला तरीही- माओच्या मनमानीची पार्श्वभूमी असणारच, असे दिसते. त्सुंग दाओ ली जन्मले आणि वाढले शांघायमध्ये. हे तेव्हाचे अठरापगड शहर, इंग्रजाळलेले बंदर. तिथल्या चिनी ख्रिाश्चन व्यापारी कुटंबातले त्सुंग दाओ ली. चीनमधल्या माओ राजवटीच्या सुरुवातीच्या काळातच ते अमेरिकेत आले, कोलंबिया विद्यापीठात त्यांनी प्रवेश मिळवला आणि पुढे पुंजभौतिकीत बौद्धिक चमक दाखवली.

नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतरही माओच्या ‘सांस्कृतिक क्रांती’ची धग शमेपर्यंत त्सुंग दाओ ली यांनी चीनभेट टाळली. १९६२ मध्ये अमेरिकी नागरिकत्व स्वीकारले. १९७२ नंतर मात्र अनेकदा ते चीनच्या निमंत्रणावरून तेथे गेले. चिनी शास्त्रज्ञांच्या संघटनेने त्यांना ‘परदेशी’ म्हणून सदस्यत्व दिले होते. पण अमेरिकेतल्या त्यांच्या दबदब्याची जाणीव चिन्यांना पुरेपूर होती. इतकी की, १९८९ मध्ये तिआनान्मेन चौकातली निदर्शने निष्ठुरपणे चिरडल्यावर जगाला स्पष्टीकरण देण्याच्या फंदात न पडणारे डेंग शियाओपिंग यांनी, त्सुंग दाओ ली यांना मात्र ‘‘चीनमध्ये मोठी यादवी पेटण्याचा धोका ओळखूनच आम्ही कठोर पावले उचलली’’ असे सांगितले होते… अमेरिकेत मोठा मान असणाऱ्यालाच आपला निरोप्या बनवणे सोयीचे, असा हिशेब डेंग यांनी केला असणारच! हा मान ली यांनी अखेरपर्यंत टिकवला होता, हेच त्यांच्या निधनानंतर पंधरवड्याभरात अमेरिका व अन्य देशांतून येणाऱ्या प्रतिक्रियांतून दिसले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh tsung dao li was the first chinese to win the nobel prize amy