‘जंगल अम्मा म्हणून त्या अधिक परिचित आहेत’, ‘त्या जणू वृक्षांची देवीच आहेत’ अशी तुलसी गौडा यांची भलामण करण्याची गरज शहरी पत्रकारांना वाटली, ती २०२० सालात ‘पद्माश्री’ त्यांना जाहीर झाल्यानंतर! पण उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या होन्नाळी गावापासून थोड्या दूरच्या वाडीतले सर्वच तीनचारशे रहिवासी तुलसी गौडांना ‘आज्जी’ म्हणून ओळखत. या ‘आज्जी’ने आपल्या परिसरातल्या वनक्षेत्रात दहा हजार वृक्षांचा सांभाळ गेल्या सुमारे ६० वर्षांत केलेला आहे, याची जाणीव ठेवून हे रहिवासी तुलसी गौडांकडून मार्गदर्शनही घेत. हा मार्गदर्शनाचा झरा तुलसी ‘आज्जीं’च्या निधनाने आता आटला आहे.
तुलसी यांचे खरे कर्तृत्व होते ते बियांवरून वृक्ष ओळखण्यात आणि कलम नेमके कोणत्या झाडाचे कशावर करावे हे ठरवण्यात. वन विभागाच्या रोपवाटिकेत त्यांनी आयुष्यभर काम केले. विशेषण लावायचेच असेल तर, दहा हजार वृक्षांचे बाळंतपण करणाऱ्या त्या ‘दाई’ ठरल्या. हे ज्ञान त्यांना मिळाले आईकडून. वयाच्या बाराव्या वर्षापासून आईला मदत म्हणून तुलसीदेखील रोपवाटिकेत जाऊ लागल्या. वयात येताच त्यांचे लग्न करण्यात आले. तरीही त्यांनी काम सुरू ठेवले आणि वन विभागाच्या स्थानिक मजूर-पटावर स्थानही मिळवले. तुलसी या निव्वळ सहायक नाहीत, त्यांनी संगोपन केलेले वृक्ष त्यांच्या ज्ञानामुळे जगताहेत, हे १९८३ साली या वनक्षेत्रात बदली झालेले भारतीय वन सेवेतले अधिकारी येल्लाप्पा रेड्डी यांनी हेरले. मग १९८६ सालच्या ‘इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कारा’साठी तुलसी यांची निवड झाली! कर्नाटक सरकारनेही १९९९ मध्ये ‘राज्योत्सव प्रशस्ति’ पुरस्कार दिला.
२०२० मध्ये पद्माश्री जाहीर झाल्यावर तुलसी गौडा या ‘वनवासी समाजातल्या’ आहेत, याचा गवगवा अधिक झाला; पण तुलसी ज्या ‘हलक्कि वोक्कळु’ समाजातून येतात त्याला अनुसूचित जमातीचा दर्जा नाही. उलट, कर्नाटकात प्रमुख मानल्या जाणाऱ्या वोक्कलिग समाजाची ही शाखा (म्हणून तर तुलसी यांचेही उपनाम ‘गौडा’) असे मानण्यात येते.
एकंदरीत, ‘आदिवासी असूनसुद्धा पुरस्कार दिला’ किंवा ‘अशिक्षित असूनसुद्धा वृक्षांची माहिती आहे’ असल्या प्रकारच्या शहरी पूर्वग्रहच दाखवून देणाऱ्या मानसिकतेतून बाहेर यावे आणि तुलसी यांच्याकडून नेमके शिकावे, त्यांच्यापर्यंत मौखिक परंपरेने आलेल्या ज्ञानाचे जतनच आधुनिक पद्धतीने करावे, असे काही कुणाला वाटले नाही… आणि आता काही तुलसी गौडा परत येणार नाहीत. नाही म्हणायला, न्यू यॉर्क टाइम्ससाठी तुलसी यांच्यावर वृत्तलेख करताना त्या वृत्तपत्राचे दक्षिण आशिया प्रतिनिधी समीर यासिर यांनी तुलसी यांना या दिशेने एक प्रश्न विचारला होता- ‘तुम्ही गेल्यानंतर काय होणार?’ असा. पण प्रश्नाचा रोख नेमका नसल्याने तुलसी यांनी सहज उत्तर दिले- ‘मी मोठं झाड होणार- दोड्ड वृक्षा!’