काही कलाकार देखणे असतात, त्यांना उत्तम अभिनयक्षमता लाभलेली असते; पण तरीही ते प्रेक्षकांच्या मनात नायक म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात, बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळविण्यात अपयशी ठरतात. ‘बॅटमॅन फॉरएव्हर’, ‘टूम्बस्टोन’ या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अभिनेते वाल एडवर्ड किल्मर हे त्यांच्यापैकीच.
किल्मर यांची जडणघडण अभिनयप्रेमी वातावरणात झाली. ऑस्कर विजेते अभिनेते केविन स्पेसी ज्या शाळेत शिकले त्या ‘चॅट्सवर्थ हायस्कूल’मध्ये किल्मर यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांची अभिनयक्षमता अगदी लहान वयातच सिद्ध झाली होती. हॉलीवूडमधील उत्तमोत्तम अभिनेते, संगीतकार, नर्तक ज्या संस्थेने घडवले त्या ‘ज्युलिअर्ड स्कूल’च्या नाट्य विभागात वयाच्या सतराव्या वर्षी प्रवेश मिळविणारे किल्मर हे त्या काळातील सर्वांत लहान विद्यार्थी ठरले होते. १९८३ मध्ये ‘द स्लॅब बॉय’ या नाटकातून त्यांचे ‘ब्रॉडवे’मध्ये पदार्पण झाले.
किल्मर हे टॉम क्रुझचे समकालीन. १९८६ साली ज्या ‘टॉप गन’ या चित्रपटातल्या भूमिकेने टॉम क्रुझला स्टार म्हणून प्रस्थापित केले, त्याच चित्रपटात वाल किल्मर यांनी साकारलेला ‘आइस मॅन’ लोकप्रिय झाला होता. टॉम हॅन्क्सची हॉलीवूड कारकीर्दही साधारण त्याच सुमारास सुरू झाली होती. हे दोन अभिनेते उत्तमोत्तम भूमिकांतून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले, पुरस्कारांनी गौरविले गेले; मात्र दर्जेदार अभिनयाची क्षमता प्राप्त असूनही किल्मर कधीही तिथवर पोहोचू शकले नाहीत.
लोकप्रिय रॉक गायक जिम मॉरिसनच्या आयुष्यावर आधारित ‘डोअर्स’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली. या भूमिकेत त्यांच्या चतुरस्रा अभिनयाचा दाखला मिळतो. ‘टूम्बस्टोन’मध्ये त्यांनी साकारलेली क्षयग्रस्त डॉक हॉलिडेची भूमिका आणि ‘हीट’ या चित्रपटातील ख्रिास शिहर्लिसची भूमिकाही लोकप्रिय झाली. ‘बॅटमॅन फॉरएव्हर’मधील बॅटमॅनची भूमिका ही खरेतर प्रसिद्धीच्या वाटेवर जाण्याची उत्तम संधी होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, मात्र त्याविषयी समीक्षकांनी संमिश्र मते नोंदवली. बॅटमॅन मालिकेतल्या पुढच्या चित्रपटात किल्मर यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर मात्र प्रमुख भूमिका मिळविणे किल्मर यांच्यासाठी अधिकाधिक कठीण होत गेले.
अभिनयातील कारकीर्दीव्यतिरिक्त त्यांनी ‘द प्रिन्स ऑफ इजिप्त’ या चित्रपटातील गॉड आणि मोझेस या दोन्ही पात्रांना आवाज दिला होता. प्रमुख भूमिकेत मार्लन ब्रँडो असलेल्या ‘द आयलंड ऑफ डॉक्टर मोरो’मध्येही किल्मर यांनी महत्त्वाची भूमिका केली, परंतु हा चित्रपट हॉलीवूडमधील बॉक्स ऑफिसवर जोरदार आदळलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला गेला.
कारकीर्दीची सुरुवात रंगमंचापासून केलेला हा गुणी कलाकार मोठ्या पडद्यावर शेवटपर्यंत हुकूमत प्रस्थापित करू शकला नाही. अखेरच्या काळात त्यांना कर्करोगाने ग्रासले. त्यामुळे बराच काळ ते अंथरुणाला खिळले होते. पुढे त्यांना न्युमोनिया झाला. त्यातून ते बाहेर येऊच शकले नाहीत. १ एप्रिलला त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या मुलीने माध्यमांना दिली.
उमेदीच्या काळात वाल किल्मर किती उमदे कलाकार होते, हे त्यांच्या ‘किस किस बँग बँग’मधून दिसते. विनोदांनी धमाल उडवून देणाऱ्या, समलिंगी आहे की नाही ही साशंकता कायम ठेवणाऱ्या लॉस एन्जेलिसमधील तरुणाच्या भूमिकेत त्याने धमाल उडवून दिली होती. ते पात्र त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायमचे कोरले गेले.