‘दूध दरात दोन रुपयांनी वाढ’ ( वृत्त : लोकसत्ता- १५ मार्च ) करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. ‘उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि आइस्क्रीमसह मागणी वाढल्याने तसेच उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली’ आदी कारणे या दरवाढीसाठी देण्यात आली आहेत. वरकरणी प्रति लिटर दोन रु. वाढ तुटपुंजी वाटत असली तरी दुधाचा दैनंदिन खर्च बघता सामान्यजनांच्या खिशाला झळ बसणार आहे. या दरवाढीमागे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी हे एक कारण दिले गेले असले तरी शेतकरी आंदोलन करतो त्यामुळे तो नजरेस येतो. या व्यवसाय साखळीतील इतर घटक आंदोलन करत नाहीत; कारण त्यांना त्यांचा नफा न मागता वाढवून मिळत असतो. मात्र शेतकऱ्यांचा दूध उत्पादनावर खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. एक लिटर दूध मिळवण्यासाठी शेतकऱ्याला दुभत्या जनावरांच्या दोन टक्के (पाचशे किलो वजनाची गाय असेल तर दहा किलो) आणि ती देत असलेल्या दुधाच्या एकतृतीयांश (तीन किलो) इतके खाद्या नियमितपणे द्यावे लागते. रोज दहा लिटर दूध देणाऱ्या एकट्या जनावरांच्या केवळ खाद्यावर शेतकऱ्याला रोज ३०० – ३५० रु.खर्च येतो. शारीरिक कष्ट वेगळेच! शेतकऱ्यांकडून कमी दराने संकलित केलेले दूध मात्र ग्राहकांना दोन ते अडीच पट जास्त किमतीत विकले जाते. कोणत्याही परिस्थितीत मधल्या साखळीतील विक्री घटक आपले नफ्याची मलई कमी करीत नाहीत. या नफेखोर घटकांनी जर आपल्या दूध विक्री नफ्यातील प्रमाण ५५ – ६० टक्क्यांपर्यंत खाली आणले तर शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या ८० टक्के दर मिळू शकतील. हे शक्य झाले तर आणि तरच ग्राहकांना दूध स्वस्तात उपलब्ध होईल आणि पर्यायाने मागणी वाढून या व्यवसायाचे प्रमाण (स्केल) वाढेल.

‘दूध विकत घेऊन पिणे हे सगळ्यांना परवडले पाहिजे. सगळ्यांना परवडेल या दरात चांगल्या दर्जाचे दूध मिळाले पाहिजे’ असे भारतातील धवल क्रांतीचे पितामह आणि ‘अमूल’च्या यशाचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांचे स्वप्न होते. पण वास्तव काय आहे ? महाराष्ट्रात दर माणशी दर दिवशी दुधाचे आहारातील प्रमाण अवघे २२२ ग्रॅम आहे. राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण ३१५ ग्रॅम, तर पंजाबात हेच प्रमाण ९०० ग्रॅम (१ लिटर) आहे. दुधाचे वाढते दर हेही कमी सेवनामागचे कारण असू शकते.

● बाळकृष्ण शिंदे, पुणे</p>

दुधाच्या दरांचेही नियमन हवे

‘दूध दरात दोन रुपयांनी वाढ’ ही बातमी वाचली. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि आईस्क्रीम व अन्य दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी अशी त्यासाठी दिलेली कारणे वाचून प्रश्न पडले : एकतर आईस्क्रीम आणि इतर दुग्धजन्य पदार्थ हे वर्षभर खाल्ले जातात, अपवाद फक्त हिवाळा. हिवाळ्यात आईस्क्रीमची मागणी कमी होते? मग पावसाळ्यात पाणी/चारा अगदी भरपूर उपलब्ध असताना हे लोक वाढवलेले दु्धाचे भाव कमी का बरे करत नसावेत? दुधाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी एखादा नियामक आयोग स्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून या लोकांची मनमानी चालणार नाही.

● डॉ. संजय पालीमकर, दहिसर पूर्व (मुंबई)

आज तरी लोकांकडे अधिकार आहेत…

नुकतेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे, ‘व्यक्ती आणि संघटना यांच्या विविक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी विधेयक’ संदर्भात जनतेच्या सूचना मागविणारे निवेदन प्रसारित करण्यात आले. मुळात सामान्य व्यक्ती / एखाद्या संघटनेचे कृत्य हे कायदेशीर आहे किंवा कसे हे ठरविण्याचा अधिकार सरकारच घेणार असल्यास, सरकार नेहमी योग्यच निर्णय घेते असे मानावे कसे? मग राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे काय? गेल्या काही महिन्यांत काही लोकप्रतिनिधी जी काही मुक्ताफळे उधळताहेत त्यांची नोंद येऊ घातलेल्या विधेयकानुसार ‘बेकायदेशीर कृत्य’ या सदरात करणार का, असा प्रश्न विधेयकाचा मसुदा वाचताना पडतो.

एकंदर विधेयक असे की, सकृतदर्शनी सरकार सर्व काही आपल्या ताब्यात घेऊ पाहाते आहे हेच लक्षात यावे. तेव्हा काळाची पावले ओळखून विविध व्यक्ती, संस्था / संघटना (एनजीओ) या विधेयकाला विरोध करतील अशी अपेक्षा करावी काय? राजकारणी, विविध नियामक संस्था, त्यांना असणारे – नसणारे अधिकार वापरत असताना लोकांनीही स्वत:कडे आज तरी शाबूत असलेल्या अधिकारांचा वापर करणे इष्ट ठरेल.

● शैलेश न. पुरोहित, मुलुंड (मुंबई)

त्यापेक्षा कायमस्वरूपी भरती करा!

‘मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याबाबत मंगळवारी चर्चा- आयोगाकडून बैठक’ ही बातमी (लोकसत्ता- १७ मार्च) वाचली. ही जोडणी आयोगाने अवश्य करावी; परंतु त्याआधी देशभर कोठे ना कोठे चालणाऱ्या सर्व राज्य व केंद्रीय निवडणूक कामांची पूर्णपणे जबाबदारी घेणारे कायमस्वरूपी (इतर सरकारी खात्यातून जबरदस्तीने आणलेले नव्हे!) कर्मचारी भरती करण्याविषयी गांभीर्याने विचार करावा. मतदार ओळखपत्रातील अगणित चुका, कोणतीही कारणे नसताना अचानक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होणे इत्यादी अनेक गैरप्रकार थांबवण्याला निवडणूक आयोगाने प्राथमिकता द्यावी. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीआधी गरज नसताना मतदारांनी आपली नावे मतदार यादीत तपासण्याची गरजच भासणार नाही.

● प्रवीण आंबेसकर. ठाणे</p>

यातून काय साध्य होणार?

आधार कार्डला पॅनकार्ड जोडण्याची मोहीम काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आली. मध्यंतरी आधार क्रमांक मतदारयादीत नाव येण्यासाठी, बदल करण्यासाठी मागितला जाऊ लागला. आधारकार्ड मतदारकार्डला जोडणे सक्तीचे करण्याचा विचार सुरू झाला आहे. पुन्हा या मोहिमेवर प्रसिद्धी व इतर कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतील. पण यातून साध्य काय होणार? निवडणूक आयोग मतदारयादीतील गोंधळ दूर करू शकले नाही, हे सत्य आहे. त्यावर आधी उपाययोजना करावी.

● राजलक्ष्मी प्रसाद, मुलुंड (मुंबई)

संरक्षण खरेदीविषयी स्पष्टता असावी

भारतात सध्या फायटर विमानाच्या खरेदीबाबत चर्चा चालू आहे रशियाने त्यांच्या सुखोई-५७ आणि अमेरिकेने त्यांच्या एफ-३५ विमानांची ऑफर दिली आहे. यासंदर्भात अनेक खासगी चित्रवाणी वृत्तवाहिन्या सध्या उलटसुलट बातम्या देत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत अधिकृतपणे प्रसार माध्यमांवर जाहीर खुलासा करणे आवश्यक आहे. ही गोष्ट वाटते तेवढी किरकोळ मुळीच नाही, कारण यापूर्वी बोफोर्स तोफांप्रमाणे संशयाचे वादळ निर्माण होऊन सरकार विरुद्ध आरोप प्रत्यारोप केले जातात, मोठा गदारोळ केला जातो, प्रसंगी अकारण सरकारचे बहुमत जाते. जनतेच्या पैशातून ही मोठी खरेदी होत असल्यामुळे जनतेला, तसेच सैन्यासह सर्व घटकांना या खरेदीचे महत्त्व नेमके समजले पाहिजे असे वाटते.

● अरविंद जोशी, पुणे

पहिले नव्हे; अखेरचे प्रेषित

‘काळाचे गणित’ या संदीप देशमुख यांच्या सदरातील ‘१५ रमज़ान १४४६’ हा लेख वाचताना, तो खूप मेहनत घेऊन लेख लिहिल्याचे जाणवते. तसेच, एका मुस्लिमेतर मराठी बांधवाने अशा विषयावर लिहिले, यासाठी मनमस्जिदीच्या गाभाऱ्यातून त्यांच्यासाठी दुवा निघत आहे. लेखात फक्त एका जागी दुरुस्तीची गरज भासते. त्यात आदरणीय प्रेषित मुहम्मद सलअम यांना इस्लामचा संस्थापक म्हटले आहे, पण ते इस्लामचे संस्थापक नसून अंतिम प्रेषित आहेत. जसे शिख धर्माचे दहा गुरू – पहिले गुरू नानकजी तर शेवटचे गुरू गोविंदसिंहजी; किंवा जैन धर्माचे २३ तीर्थंकर होऊन गेले- पहिले तीर्थंकर ?षभदेवजी अन् शेवटचे तीर्थंकर महावीरजी; तसेच जगभरात इस्लामचे जवळपास १ लाख २४ हजार प्रेषित होऊन गेले आहेत. पहिले मानव आदरणीय सय्यदना आदम हेच इस्लामचे पहिले प्रेषित होते, तर मुहम्मद सलअम हे शेवटचे प्रेषित. पूर्वीचे प्रेषित हे एका विशिष्ट देशासाठी, विशिष्ट काळासाठी होते, अंतिम प्रेषित हे समस्त मानवतेकरिता आणि सर्व युगांसाठी आलेले असल्याने, पूर्व प्रेषितांचा आदर करत आचरण मात्र अंतिम प्रेषितांवर करणे क्रमप्राप्त आहे, असे इस्लाम मानतो.

● नौशाद उस्मान, छत्रपती संभाजीनगर