अमृता प्रीतम यांच्या उल्लेखाशिवाय इमरोज यांची निधनवार्ताही दिली जाऊ नये, यामागे केवळ अमृता प्रीतम यांचे व्यक्तिमत्त्व एवढेच कारण नाही. त्या व्यक्तिमत्त्वात स्वत:चे अस्तित्व इमरोज यांनी लोपामुद्रेप्रमाणे विरघळू दिले. त्यामुळे ‘ते चित्रकारही होते’ ही त्या निधनवार्तामधली ओळ वाचताना अनेकांना आठवतील, ती अमृता प्रीतम यांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांवरली इमरोज यांची चित्रे! कुणाला कदाचित एकेक चित्र ठाशीवपणे आठवणार नाही, पण रंगसंगती आठवेल.. लाल, गुलाबी, पिवळा यांच्या मध्येच एखादी निळी छटा, किंवा कधी मातकट रंगही पिवळयासह वापरल्यामुळे मुखपृष्ठाला आलेला उजळपणा.. अशा त्या रंगसंगतींमधून हळूहळू एखाद्या स्त्रीचा चेहरा आठवू लागेल, जलरंगांचा वाहता तरलपणा तर आठवेलच, पण या मुखपृष्ठांवरच्या अक्षरांची वैशिष्टयपूर्ण शैलीही नक्की आठवेल – एखाद्या टय़ूबमधून पेस्ट बाहेर काढतेवेळीच त्यांची अक्षरे केली असावीत, तशी ती अक्षरे. तैलरंगांप्रमाणेच जलरंगाच्याही टय़ूब कैक दशके सर्रास वापरल्या जायच्या, तशा एखाद्या टय़ूबमधूनच पहिल्यांदा या अक्षर-शैलीचा जन्म झाला असेल का? असेल तर, ती पहिलीवहिली अक्षरेसुद्धा ‘अमृता प्रीतम’ अशीच असतील.. टय़ूबमधून अशाच प्रकारे रंगधानीवर (पॅलेटवर) रंग अवतरतो, तेव्हा पुढल्या काही क्षणांत तो ब्रशने पसरवला जातो, उचलला जातो.

हेही वाचा >>> आरोग्याचे डोही : विज्ञान – एक चळवळ

selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
Romita Majumdar
फेनाम स्टोरी: टेलिंग हर ‘फॉक्स’टेल
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

किंवा तैलरंगाच्या टय़ूब थेट कॅनव्हासवर उतरवून काही चित्रकार झरकन त्यावरून रोलर फिरवतात. इथे एवढया रंगऐवजाने साकारलेल्या ‘अमृता प्रीतम’ या अक्षरांवरून रोलर फिरला असता तर अख्खा कॅनव्हास त्याच एका रंगाच्या थराने झाकला गेला असता.. इमरोज यांच्या आयुष्यावरल्या थरासारखा. पण मुखपृष्ठकार म्हणून इमरोज यांनी पथ्येही पाळलेली दिसतात. त्या शैलीदार अक्षरांमध्ये त्रिमितीचा आभास आणण्यासाठी, अक्षरांचा भाग पांढराच किंवा फिका सोडून एखादी गडद छटा या अक्षरांच्या भोवती असायची. रंगांचा मोजकेपणाही छपाईची तांत्रिक पथ्ये पाळणारा असायचा. या चित्रांपेक्षा निराळी इमरोज यांनी एरवीच, स्वत:साठी (की ‘तिच्यासाठी’?) केलेली चित्रे. ‘साहिर लुधियानवी, अमृता प्रीतम आणि इमरोज’ या त्रिदलाची आठवणही इमरोज यांच्या मृत्यूनंतर निघाली. त्या त्रिदलाचे हे अखेरचे पान गळून पडले. फाळणीपूर्व काळात जन्मलेले, स्वातंत्र्याच्या उदयकाळात लिहू लागलेले असे कैक पंजाबी/ उर्दू/ हिंदी शायर आता कालकथित झाले. यापैकी अनेक जण ‘तरक्कीपसंद’ अर्थात प्रागतिक, पुरोगामी. त्यांच्यावर डावेपणाचा शिक्का मारण्याचे प्रयत्न त्याही काळात झाले होतेच. पण त्यांमध्ये केवढया तरी छटा होत्या. फैज अहमद फैज हे वसाहतविरोधाला सूफी अधिष्ठान देणारे; तर ग्वाल्हेरचे जाँनिसार अख़्तर, सुल्तानपुरी ‘मजरूह’, आजमगढचे कैफी आज़मी, आणि लुधियानवी ‘साहिर’ हे हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ घडवणारे; कुर्रतुल ऐन हैदर, इस्मत चुगताई या प्रेमचंद यांच्याप्रमाणे हिंदूस्तानी उर्दूत गद्य लिखाण करताना अवघड सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या; पंजाबीत तर राजिंदरसिंग बेदी ते पाश अशा किती तरी छटा. यांच्यापेक्षा निराळी छटा अमृता प्रीतम यांची. पंजाबी लोकधाटीतून. हीर-रांझा आणि सोहनी-महिवालच्या प्रेमकथांतून आणि पंजाबच्या मातीतून प्रागतिकतेचा सुगंध दरवळू देणारी. एकटीची कथाव्यथा मांडतानाही स्त्रीत्वाच्या वैश्विक अनुभवाला आवाहन करणारी. इमरोजही कविता करायचे, कधीमधी. ‘वह कविता जीती, और जिन्दगी लिखती’ या ओळी थेटच अमृताबद्दलच्या, पण ‘साहित्य में जितने कवि बढते जाते है जिंदगी में कविता उतनी ही कम होती जा रही है’ या ओळी कवितेचा मान राखणाऱ्या. असा मान राखण्यात इमरोज यांचे आयुष्य गेले, ही झाली सामान्यजनांची समज. पण इमरोज यांच्या प्रेमामागील निष्ठेचे लौकिक मोजमाप करणाऱ्यांचेच खुजेपण दिसेल. इमरोज यांनी जे नाते अमृता यांच्याशी निभावले, त्यासाठी मोजपट्टीच शोधायची तर सूफी संप्रदायातल्या तादात्मापर्यंतच्या सात अवस्था पाहाव्या लागतील.. त्या सातपैकी दिलकशी, उन्स (गाठीभेटी, मैत्री), मोहब्बत या लौकिक पायऱ्या टाळून थेट अक़ीदत (आदर आणि विश्वास), इबादत (नित्य आराधना), जुनून (जीव उधळण्याची तयारी) आणि मौत (अस्तित्वलोप) या पायऱ्यांवर इमरोज जगले.. चित्रकार म्हणूनही ते याच पायऱ्यांवर होते आणि स्पष्ट चेहरा वा पूर्ण शरीरही नसलेल्या त्यांच्या चित्रांबद्दल ‘मी आयुष्यभर एकाच स्त्रीचे चित्र काढतो आहे’ असे म्हणत होते!