अमृता प्रीतम यांच्या उल्लेखाशिवाय इमरोज यांची निधनवार्ताही दिली जाऊ नये, यामागे केवळ अमृता प्रीतम यांचे व्यक्तिमत्त्व एवढेच कारण नाही. त्या व्यक्तिमत्त्वात स्वत:चे अस्तित्व इमरोज यांनी लोपामुद्रेप्रमाणे विरघळू दिले. त्यामुळे ‘ते चित्रकारही होते’ ही त्या निधनवार्तामधली ओळ वाचताना अनेकांना आठवतील, ती अमृता प्रीतम यांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांवरली इमरोज यांची चित्रे! कुणाला कदाचित एकेक चित्र ठाशीवपणे आठवणार नाही, पण रंगसंगती आठवेल.. लाल, गुलाबी, पिवळा यांच्या मध्येच एखादी निळी छटा, किंवा कधी मातकट रंगही पिवळयासह वापरल्यामुळे मुखपृष्ठाला आलेला उजळपणा.. अशा त्या रंगसंगतींमधून हळूहळू एखाद्या स्त्रीचा चेहरा आठवू लागेल, जलरंगांचा वाहता तरलपणा तर आठवेलच, पण या मुखपृष्ठांवरच्या अक्षरांची वैशिष्टयपूर्ण शैलीही नक्की आठवेल – एखाद्या टय़ूबमधून पेस्ट बाहेर काढतेवेळीच त्यांची अक्षरे केली असावीत, तशी ती अक्षरे. तैलरंगांप्रमाणेच जलरंगाच्याही टय़ूब कैक दशके सर्रास वापरल्या जायच्या, तशा एखाद्या टय़ूबमधूनच पहिल्यांदा या अक्षर-शैलीचा जन्म झाला असेल का? असेल तर, ती पहिलीवहिली अक्षरेसुद्धा ‘अमृता प्रीतम’ अशीच असतील.. टय़ूबमधून अशाच प्रकारे रंगधानीवर (पॅलेटवर) रंग अवतरतो, तेव्हा पुढल्या काही क्षणांत तो ब्रशने पसरवला जातो, उचलला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा