मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या पुढाकाराने आयोजित ‘शास्त्रार्थसभे’ला ग्रीनीच वेधशाळा, लंडनची रॉयल जिओग्राफिकल सोसायटी व पॅरिसच्या रॉयल सोसायटीच्या शिष्टमंडळाने येण्याचे मान्य केल्याने महाकालनगरीमध्ये उत्साह संचारला होता. आता उज्जैनच्या वेळेला प्रमाणवेळ म्हणून जागतिक पातळीवर मान्यता मिळणारच अशा आशयाचे फलक पूर्णपणे शहरभर लागले होते. प्रमुख रस्त्यावरच्या दुकानदारांनी वाळूने वेळ मोजणाऱ्या प्रतिकृती ठिकठिकाणी उभ्या केल्या होत्या. वेळेचा अभ्यास करण्यासाठी महाराजा जयसिंग यांनी १७२४ मध्ये देशात पाच ठिकाणी उभारलेल्या जंतरमंतरच्या प्रतिकृती प्रत्येक चौकात लक्ष वेधून घेत होत्या. एका चौकात पृथ्वीच्या गोलाकाराची प्रतिकृती वेगाने फिरत होती. त्यावर दक्षिणेकडील देश वरच्या भागात दाखवले होते. त्यात भारताचा समावेश ठळकपणे दिसत होता व त्यातल्या उज्जैनवर लेझरचा प्रकाशझोत सोडला होता. विमानतळापासून ते सभेच्या ठिकाणापर्यंत ग्रॅगेरियन कॅलेंडरला फाटा देत विक्रम संवत व शालिमारच्या दिनदर्शिका लावण्यात आल्या होत्या. या भाऊगर्दीत आयझॅक न्यूटन व लॉर्ड मॅकाले यांच्या चेहऱ्यावर फुली मारलेले दोन फलक लक्ष वेधून घेत होते. या वातावरणनिर्मितीला भुलून जास्त कुरकुर न करता  विदेशी शिष्टमंडळाने उज्जैनची वेळ प्रमाण मानावी हाच उद्देश.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चिंतनधारा : ‘युनेस्को’ परिषदेत राष्ट्रचिंतन

शिष्टमंडळ विमानतळावर उतरले तेव्हा सरकारच्या वतीने खुद्द यादवांनी त्यांचे स्वागत केले तर बाहेर जमलेला भक्तांचा मोठा जमाव ‘नो ग्रीनीच, ओन्ली उज्जैन’ अशा जोरदार घोषणा देत होता. रात्री बरोबर १२ च्या ठोक्याला मंदिर परिसरात उभारलेल्या एका भव्य शामियान्यात सभेला सुरुवात झाली. त्याचे थेट प्रक्षेपण देशभरातील वृत्तवाहिन्यांनी सुरू केले. सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या शिष्टमंडळात अनेक संत, महंतांचा समावेश होता. ते तावातावाने बोलू लागले, ‘‘भोपाळजवळील सांची तसेच उज्जैनवरून कर्कवृत्त व रेखावृत्त जात असल्याने हेच शहर प्रमाणवेळेसाठी योग्य. अगदी १७ व्या शतकापासून या शहरात वेळेचा अभ्यास सुरू झाला. राजा विक्रमादित्याने त्यासाठी पुढाकार घेतला. तुम्ही सेकंद, मिनिट, तास ठरवले, पण त्याच्या किती तरी आधी पल, प्रतिपल, विफल या संज्ञा आम्ही शोधल्या. त्यात उज्जैनच्या जंतरमंतरचे स्थान अगदी वरचे. जगात वेळ मोजण्याचे प्रयत्न सोळाव्या शतकापासून सुरू झाले असे तुम्ही म्हणता, पण त्याआधीच आम्ही ते सुरू करून यश मिळवले. त्याचा पुरावा म्हणून मोडी लिपीतील काही कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत.

ग्रीनीचची वेळ १८४७ ला जगभर लागू झाली, पण त्याआधीच आम्ही वेळ मोजून उज्जैनची प्रमाणवेळ निश्चित केली होती व संपूर्ण आशिया खंडात त्याचे पालन होत होते. विश्वगुरूंनी विनंती केली तर आजही या खंडातील अनेक देश उज्जैनची वेळ पाळायला तयार आहेत. तुम्ही आक्रमण करून हा देश ताब्यात घेतल्याने आमचे संशोधन मागे पडले. तेव्हा आता ते मान्य करून अन्यायाचे परिमार्जन करा.’’ हा युक्तिवाद ऐकून परदेशी शिष्टमंडळातील अनेकांनी स्मितहास्य केले. मग त्यातला एक बोलू लागला, ‘‘तुमच्याकडे वेळेचा अभ्यास झाला हे मान्य, पण त्याचे स्वरूप वैज्ञानिक नव्हते. तुम्ही वेळेच्या अभ्यासाचा वापर नक्षत्रे ठरवण्यासाठी, राशिभविष्य शोधण्यासाठी, ग्रहणांचा शुभअशुभ शकुन पाहण्यासाठी केला. आम्ही अभ्यास केला तो तर्काच्या कसोटीवर. त्याला जगभर मान्यता मिळावी म्हणून करार केले. आता हे सर्व करार मोडून उज्जैनची वेळ निश्चित करायची असेल तर अनेक बदल करावे लागतील. त्यासाठी २० लाख कोटींची भरपाई तुम्हाला द्यावी लागेल. आहे का तुमची तयारी?’’ यावर सारेच एकमेकांकडे बघू लागले. तेवढयात यादवांचा फोन वाजला. पलीकडे चाणक्य होते. ‘ये क्या नौटंकी लगा के रखी है?’ असे चाणक्यांनी म्हणताच ते उठले व कोणत्याही निर्णयाविना शास्त्रार्थसभा स्थगित झाल्याची घोषणा झाली.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh cm mohan yadav claim about ujjain and the prime meridian zws