परंपरेप्रमाणे दहावीला अगदी भरघोस मार्क मिळवून मुले पास झाली आहेत. परीक्षेला बसलेल्या साडेपंधरा लाखांपैकी साडेपाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रावीण्यासह प्रथम श्रेणी, अर्थात ७५ टक्क्यांहून अधिक मार्क आहेत. चांगलेच आहे. निकाल लावणारे राज्य मंडळ खूश, शाळा आनंदी, मुले जल्लोषात आणि पालक स्वप्नात! उत्तम. आता थोडे वास्तव. त्यासाठी, ‘मार्क तर मिळाले, पण ‘गुण’ किती प्राप्त झाले,’ हा एक साधा प्रश्न. दहावीचे हे मार्क बारावीत किती होतात, पदवीला किती होतात आणि नंतर व्यवसाय-रोजगार करताना किती उपयोगी येतात, हा खरा प्रश्न. ज्या विद्यार्थ्याला दहावीत अगदी ९० टक्के किंवा त्याहून अधिक मार्क असतात, त्यांना नववीत किती मार्क होते, असे विचारले, तर अनेकजण उत्तरच देत नाहीत. कारण बहुतांशांचे ते १०-१५ टक्क्यांनी कमी असतात. अकरावीत गेल्यावर या ९० टक्क्यांचे किती होतात? तेही बहुतांशांचे १०-१५ टक्क्यांनी कमी! पण बारावीत पुन्हा भरघोस. नववी व अकरावी आणि दहावी व बारावी या इयत्तांमधील मार्कांत इतका फरक का? नववी-अकरावीच्या परीक्षा शाळा-कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर होतात, तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्य शिक्षण मंडळ घेते. विद्यार्थी तोच असेल, तर लागोपाठच्या दोन परीक्षांत लागणारा कस इतका कसा वेगवेगळा असू शकतो? का प्रत्येक विषयाचे अंतर्गत गुण शाळांच्या ‘हाता’त असल्याने काही फरक पडतो? की मंडळावर निकाल उत्तम लावण्याचा दबाव असल्याने सढळ हस्ते मार्क वाटले जातात?

हेही वाचा >>> अन्वयार्थ : काश्मीरमध्ये ‘लोकशाही’?

आणखी एक चर्चेचा मुद्दा म्हणजे कला-क्रीडा गुण. नृत्य, नाट्य, चित्रकला, लोककला शिकणाऱ्या आणि त्यातील काही ठरावीक प्रमाणपत्रे असणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीत वाढीव गुण मिळतात. एनसीसी, स्काउट, गाइड, तसेच एखाद्या क्रीडा प्रकारात राज्य-राष्ट्रीय स्तरावर सहभाग आदींसाठीही ही सवलत आहे. यासाठी त्या कला-क्रीडा प्रकाराची वेगळी परीक्षा होत नाही, तर प्रमाणपत्रावर विसंबून हे मार्क दिले जातात. यंदा दहावीला असे वाढीव दोन ते तीन टक्के (१० ते १५ मार्क) मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे तब्बल पावणेदोन लाख! आणि, या वाढीव गुणांसाठी ज्यांची प्रमाणपत्रे ग्राह्य धरली गेली, अशा संस्थांची संख्या आहे ७६! या सर्व संस्था खरेच प्रावीण्य बघून प्रमाणपत्रे देतात का, हा स्वतंत्र शोधाचा विषय. तरीही असे गृहीत धरू, की कला-क्रीडा प्रकारांत काही मुले निश्चित प्रवीण असतात, पण त्यांचे कला किंवा क्रीडाप्रावीण्य दहावीला मार्क फुगवण्यामुळे झळाळून निघेल, हा कोणता तर्क? मुळात मुद्दा असा आहे, की नियमित अभ्यासाचे विषय काय, कलाविषय काय किंवा क्रीडाप्रावीण्य काय, व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठी या सगळ्यांतीलच ‘गुण’ विकसित करणे हाच मुळात शालेय शिक्षणाचा उद्देश नको का? आपण मात्र ‘मार्क्स संस्कृती’ जोपासून शालेय स्तरावर ‘वर्ग’व्यवस्था चोख ठेवली आहे.

हेही वाचा >>> लोकमानस :आंतरराष्ट्रीय सन्मानाची वाट का पाहावी?

सन २००५ च्या अभ्यासक्रम आराखड्यात विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधणारी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची संकल्पना मांडली गेली होती. यामध्ये वर्षभर सातत्याने वेगवेगळ्या विषयांत विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे, याची चाचणी घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्याला मार्क किती पडतात, या निकषाऐवजी त्याला त्या संकल्पनेचे आकलन किती झाले आहे, याचे प्रयोगांद्वारे मूल्यमापन यात करायचे असते. याचा फायदा असा, की काही विषय उत्तम जमत असतील, तर त्यात प्रावीण्याच्या दिशेने जाता येेते आणि कच्चे असतील, ते किमान चांगली ओळख होण्यापर्यंत शिकता येतात. म्हणजे गाण्याची आवड, कल आणि गुण असणारा गायक होईल आणि गाण्याऐवजी गणित आवड आवडणारा अभियंता होईलच, पण गाण्यातील प्राथमिक आकलन प्राप्त करून किमान कानसेन तरी होऊ शकेल. आता ही संकल्पना राबवायची, तर असे प्रयोग करायला आधी शिक्षकांची क्षमतावृद्धी करून त्यासाठी त्यांची स्वीकारवृत्ती जागवावी लागेल. पण, शिक्षक होण्यासाठीच्या ‘टीईटी’ परीक्षेतच मार्कांसाठी गैरप्रकार करणाऱ्यांकडून आपण काय अपेक्षा करणार? केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ‘सीबीएसई’ने काही वर्षांपूर्वी ही पद्धत राबविली. त्यात विद्यार्थ्यांना श्रेणी दिली जायची. पण, दहावीनंतर राज्य शिक्षण मंडळांच्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशासाठी अजूनही मार्कच लागत असल्याने ‘सीबीएसई’लाही पुन्हा ‘मार्क्स’व्यवस्थेकडेच यावे लागले. मार्कांचे हे गारूड आपल्या मनावर इतके आहे, की आपल्याला तीच गुणवत्ता वाटते. मग मार्क कमी म्हणजे गुणवत्ता कमी, असे म्हणून आपण काहींना शिक्षणाच्या प्रवाहातूनच बाजूला ढकलतो. त्यासाठीच, ‘भरघोस मार्क म्हणजे खरेच किती ‘गुण’,’ हा एक साधा प्रश्न आपण सातत्याने विचारत राहायला हवा.