स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात १९४८ ते साधारणपणे १९८५ पर्यंतचा काळ हा मराठी नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता. घरोघरी वर्तमानपत्रांच्या बरोबरीने साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके, अर्धवार्षिक, वार्षिक, दिवाळी अंक वाचणाऱ्यांचा मोठा वर्ग होता. दिवाळी अंक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण. ते इतर प्रांत नि भाषांमध्ये अपवादाने दिसून येत असे. दिवाळी अंकाचे हे वैशिष्ट्य होते. संपादक ललित साहित्याइतकेच महत्त्व वैचारिक साहित्यास देत असत. कथा, कविता, कादंबरीइतकेच वैचारिक लेख, मुलाखती, परिसंवादांचे महत्त्व होते. १९५९च्या ‘मौज’ दिवाळी अंकाने ‘उद्याचा महाराष्ट्र’ विषयावर परिसंवाद योजला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेचे आंदोलन टिपेला पोहोचले होते. या लिखित परिसंवादात सर्वश्री एस. एम. जोशी, कॉम्रेड एस. ए. डांगे, स्वामी रामानंद तीर्थ, ना. ग. गोरे, बी. सी. कांबळे, शंकरराव मोरे, पु. ह. पटवर्धन, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. दत्तो वामन पोतदार, कुलगुरू र. पु. परांजपे यांनी भाग घेतला होता. ते विविध पक्ष व समाजवर्गाचे प्रतिनिधी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिसंवादात तर्कतीर्थांचे मत होते की, केंद्र सरकारने स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीस हिरवा कंदील दाखविण्यामागे इथे कम्युनिझमचा धोका वाटतो. द्वैभाषिक राज्य विसर्जनाचा केंद्र सरकारचा विचार हा निश्चितच जागृत जनशक्तीच्या प्रभावी मागणीचा विजय होय. ते लोकचळवळ व लोकशाही सरकारचे संयुक्त फळ होय. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सर्वत्र विवेकाच्या गोष्टी झाल्या नाहीत. या चळवळीमुळे जातिवादाचे प्रस्थ तात्पुरते का असेना कमी झाले. संकल्पित महाराष्ट्रात भाषिक अल्पसंख्याकांचे हितरक्षण झाले पाहिजे. नव्या राज्यात वैरभावास थारा देता कामा नये. राज्याचे ऐक्य साधण्यासाठी विदर्भ विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. एकसंध मराठी समाजनिर्मितीकडे लक्ष पुरविले पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे आर्थिक धोरण व विकासाचा विचार देशाच्या संदर्भात केला पाहिजे. हे राज्य पुरोगामी होण्यासाठी जमीन मालकीचा प्रश्न (कूळ कायदा) जागतिक दृष्टिकोनाने सुटला पाहिजे. पंचवार्षिक योजनांमध्ये नियोजन आणि अंमलबजावणी दोन्ही स्तरांवर काटेकोरपणा असणे आवश्यक आहे. मुंबईच्या आर्थिक नेतृत्वाकडे लक्ष दिले पाहिजे. सर्व भाषिक, क्रांतिकारकांना हा प्रांत आपला आहे, असे वाटले पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र समिती विसर्जनाचा निर्णय केरळचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून करावा. लोकशाहीचे राजकीय शिक्षण रुजले पाहिजे. तर्कतीर्थ काँग्रेस समर्थक असले तरी उद्याच्या महाराष्ट्रबाबतचा त्यांचा दृष्टिकोन पक्षीयतेपेक्षा राज्यहिताचा विचार करणार असल्याने अनुकरणीय ठरतो.

या परिसंवादाचे स्वत:चे असे एक वैशिष्ट्य होते. काही प्रश्न सर्वांना समान होते; पण काही प्रश्न त्या त्या पक्ष वा वर्गाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन विचारले होते. हेतू हा की, मतसंग्रहात नेमके आकलन प्रतिबिंबित व्हावे, हा संपादकांचा द्रष्टेपणा होता. तर्कतीर्थांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेत मुंबईस आलेल्या महत्त्वाकडे लक्ष वेधत मुंबईसाठी ग्रीकपुराणातील वैमनस्य देवतेच्या सुवर्णफलाचा (अॅपल ऑफ डिस्कॉर्ड) दृष्टांत उद्धृत केला आहे. ग्रीक मिथक कथांत एरिस ही विवाद देवता म्हणून प्रसिद्ध आहे. तिला आमंत्रित न केलेल्या मेजवानीत ती रागाने ‘सर्वांत सुंदर व्यक्तीसाठी’ असं लिहून एक सोनेरी सफरचंद मेजवानीत फेकते. हेरा अथेन, एप्रोडाइड त्यावर आपापला दावा सांगतात. या मतभेदाचे रूपांतर पुढे जनयुद्धात होते. मुंबईवर महाराष्ट्र व गुजरात राज्याने सांगितलेल्या दाव्याची पार्श्वभूमी या दृष्टांतास आहे. तर्कतीर्थ आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ अशी उदाहरणे अनेकदा प्रस्तुत करून आपले म्हणणे चपलखपणे पटवून देत आले आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत महाराष्ट्रातील जातीयवाद गाडला गेला, असा दावा केला जात असे. त्याच्या अनुषंगाने ते स्पष्ट करतात की, गाडला गेला म्हणण्यापेक्षा तात्पुरता झाकून गेला म्हणणे अधिक समर्थनीय ठरेल, असे सांगत दृष्टांत देतात की बर्फवृष्टीखाली, देवदाराची उतारावरची झाडे गाडली जात. परंतु, उन्हे पडून बर्फ वितळू लागला, म्हणजे वसंत ऋतूत ती गाडलेली झाडे पुन्हा उघडी होतात. तर्कतीर्थांच्या लेखनशैलीचे उदाहरण म्हणून या मतप्रदर्शनाकडे पाहणे म्हणजे त्यांच्या लेखनशैलीची आस्वादक नोंद घेणे होय.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com