आधीच अनेक प्रकारच्या तीनेक डझन कामांनी कावलेल्या शाळा शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळणारा निर्णय प्रत्येक सरकार का घेते? असा प्रश्न सरकारला कोणी कधी विचारत नाही. गावातले संडास मोजण्यापासून ते माध्यान्ह भोजन शिजवण्यापर्यंत आणि जनगणनेपासून ते आरोग्य अभियानापर्यंत सगळी कामे करून भागल्यानंतर त्यांना शिकवण्याचेही काम करावे लागते. असे हरघडी समोर दिसणारे ‘मास्तर’ आता शाळेतल्या भिंतीवरही ‘लटकणार’ आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खोलीत किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयातील प्रमुखाच्या खोलीत देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून ते पहिले राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींपर्यंत सर्वाची छायाचित्रे ओळीने लावलेली दिसतात. सरकारी आदेशच आहे तसा. गेल्या काही वर्षांत त्यापैकी कोणाचे छायाचित्र अधिक ठळक हवे, याच्याही अस्पष्ट परंतु कळतील अशा आदेशवजा सूचना देण्यात येतात. आता राज्यातील सध्या नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने प्रत्येक शिक्षकाला वर्गात ‘चौकटबंद’ करण्याचा आदेश दिला आहे. वर्गातील शिक्षकाचे छायाचित्र वर्गात सर्व विद्यार्थ्यांना दिसेल, असे लावण्याचा हा आदेश नेमका कशासाठी? असा प्रश्नही विचारण्याची हिकमत नसलेले शिक्षक तो न पाळल्यास शिक्षेस पात्र ठरणार आहेत. दिवसभर विद्यार्थ्यांसमोरच उभे राहून घसाफोड करून शिकवणारे गुरुजी कोण, हे विद्यार्थ्यांना आता छायाचित्रावरूनही कळेल, असा उदात्त हेतू त्यामागे नसेलच असे सांगता येत नाही. नाही तरी अलीकडील विद्यार्थ्यांचे पालक फारच जागरूक झाल्याकारणाने शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून जपूनच राहावे लागते. पूर्वीच्या काळी शिक्षकाच्या हातून पाठीत धपाटा न खाल्लेला विद्यार्थी विरळा असे. वर्गाबाहेर अंगठे धरून उभे राहण्याची शिक्षा ही तर प्रत्येक शिक्षकाची खरीखुरी ओळख असे. अशी शिक्षा केल्याबद्दल घरी पालकांकडे तक्रार केलीच, तर पालकांकडूनही फटके बसण्याची खात्री असणारे आज्ञाधारक विद्यार्थी त्यामुळे मूग गिळून गप्प बसत. आता कोणत्याही शिक्षकाला अशी शिक्षा केल्यास कारवाईची भीती असते. ‘शिक्षक शाळेत जातच नाहीत, विद्यार्थ्यांना शिकवतच नाहीत,’ अशी खात्री झाल्याने सरकारने आता वर्गातच छायाचित्र लावण्याचा आदेश दिला असेल, तरीही तो अन्यायकारकच आहे. पोलीस ठाण्यातील गुन्हेगारांच्या छायाचित्रांप्रमाणे वर्गात असे फोटो लावून नेमके काय साधणार आहे, हा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडणार आहे. मागील एका सरकारातील शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांना वर्गावर गेल्यानंतर त्यांच्या मोबाइलमधून विद्यार्थ्यांसमवेत ‘सेल्फी’ काढून ती सरकारजमा करण्याचे आदेश दिले होते. एकीकडे सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे, हे सरकारचे आद्यकर्तव्य असल्याप्रमाणे परीक्षांचे निकाल लावण्याचे आदेश द्यायचे आणि दुसरीकडे विद्यार्थी वर्गात ‘दिसतात’ की नाही, यावर लक्ष ठेवायचे, हा निव्वळ सरकारी उफराटा कारभार झाला. शिक्षकांबद्दल त्यांचा फोटो पाहून आदराची भावना निर्माण होईल, की त्यांच्या अध्यापन कौशल्यामुळे, याचा सारासार विचार करण्याची गरज ना मंत्र्यांना वाटत, ना शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना. अशी छायाचित्रे लावून बोगस शिक्षक कसे सापडतील, हाही प्रश्नच. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना शाळेत येताना आणि जाताना, तंत्राधारित हजेरी लावण्यास सांगणे हा सरकारसाठी खर्चीक निर्णय असल्यामुळे असेल कदाचित, शिक्षकांनी स्वत:चेच किमान २९ सेंटिमीटर उंचीचे (ए-४ साइझ) छायाचित्र स्वखर्चाने आपल्याच वर्गात, आपल्याच विद्यार्थ्यांसमोर लावण्याची ही सक्ती ही तात्काळ रद्द होण्याच्याच लायकीची आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा