पाच सहकारी साखर कारखान्यांच्या ६३१ कोटी रुपयांच्या कर्जाला थकहमी देण्याचा आदेश राज्य शासनाने काढला आहे. साखर उद्याोग अडचणीत असल्याने साखर कारखान्यांना मदत करावी लागते, असा सरकारचा दावा असतो. राज्यातील साखर कारखान्यांकडून शासनाला विविध कर रूपाने वर्षाला पाच हजार कोटींपेक्षा अधिक महसूल मिळतो. याशिवाय ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला साखर कारखान्यांमुळे चालना मिळते म्हणूनच सहकारी साखर कारखान्यांना मदत केली जाते. याचाच भाग म्हणून सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाला थकहमी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पाच कारखान्यांच्या कर्जाला हमी देण्यात आली. साखर कारखान्यांकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांकडून घेण्यात येणाऱ्या कर्जाला सरकारची हमी असते. यामुळे साखर कारखानदारांवर बोजा पडत नाही आणि मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. सरकारची हमी असल्याने बँकाही कर्ज देण्यास काचकूच करीत नाहीत. चारच दिवसांपूर्वी सूत गिरण्यांच्या कर्जाचे व्याज सरकारने फेडण्याच्या योजनेला आणखी पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापाठोपाठ सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाला सरकारची हमी मिळणार आहे. या पाचपैकी एका कारखान्यावर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सत्ता आहे. तीन कारखाने हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे आहेत. आणखी एक कारखाना हा काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे यांचा आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला शिंदे सरकारने झुकते माप दिले. विरोधकांच्या संस्थांना मदत केल्यास ओरड होत नाही हे तत्त्व शिंदे यांनी बरोबर पाळले आहे. कराची रक्कम भरली नाही म्हणून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यानाथ साखर कारखान्यावर अलीकडेच जीएसटी विभागाने छापे घातले. केंद्र व राज्यात पक्ष सत्तेत असताना आपल्याविरोधात कारवाई करण्यात आल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी नाराजी बोलून दाखविली. पण त्याच वेळी काँग्रेसच्या अ. भा. कार्यकारी समितीचे सदस्य असलेल्या अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला सरकारी मदत दिली जाते यावरून सत्ताधाऱ्यांच्या खेळीचा अंदाज येतो. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याच्या कर्जाला हमी देण्यास यापूर्वी सरकारने नकार दिला होता ही बाबही दुर्लक्षित करता येणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा