‘या निशा सर्वभूतानाम् तस्यांम जागर्ति संयमी’ म्हणजे सर्व जग झोपलेले असताना जगाचा (राज्याचा) विचार करणारे ज्ञानी जागे असतात’ असा भगवतगीतेतील मजकूर एका बाजूला व दुसरीकडे ‘मी रात्री अकरापर्यंत काम करतो. पहाटे दोनपर्यंत फडणवीस, चारपर्यंत शिंदे व नंतर पुन्हा चारपासून मी’ हे अजितदादांचे प्रसिद्ध वाक्य असलेले फलक राज्यभर लागले व चमत्कार घडावा तसे बदल मुंबईत दिसू लागले.
मंत्रालयात दिवसा होणारी गर्दी अचानक कमी झाली. सरकार जर २४ तास काम करणारे असेल तर ओळख पटवण्याचा आटापिटा करत दिवसा मंत्रालयात जायचेच कशाला? असे म्हणत अभ्यागत रात्री या तिघांच्या बंगल्यावर गर्दी करू लागले. रात्री अकरापर्यंत तिघांपैकी एकाचा पर्याय निवडायचा, अकरानंतर देवाभाऊ वा एकनाथरावांचे घर गाठायचे. पहाटे दोनला एकनाथरावांसमोर गर्दी करायची. या तिन्ही ठिकाणी काम झालेच नाही तर पहाटे चारला पुन्हा दादांना गाठायचे. अभ्यागतांच्या या नव्या युक्तीमुळे मलबार हिलचा परिसर रात्री गजबजून गेला. वाहतूक कोंडी होऊ लागली. हे चित्र बघून दादा व एकनाथराव मनोमन सुखावले. ‘अब आयेगा ऊंट पहाड के निचे’ असे म्हणत दोघांनी रात्रपाळीत सहाय्यकांची संख्या वाढवली. कोंडी अशी करायची की समोरच्याच्या लक्षात येऊनही बोलता येऊ नये. आता बघू पुढे काय होते ते असा संवाद ‘सिग्नल’ अॅपवरून झाल्यावर या दोघांनी देवाभाऊ झोपलेले असताना म्हणजे पहाटे दोन ते सकाळी आठ या काळात निर्णय घेण्याचा धडाकाच लावला. घेतला निर्णय की केला लगेच जाहीर या त्यांच्या धोरणामुळे पुनप्रक्षेपणावर कशीबशी रात्र काढणाऱ्या चॅनेलवाल्यांना ताज्या बातम्या मिळू लागल्या. सरकार खरोखरच वेगवान झाले अशी स्तुती सकाळी उठल्याबरोबर जनतेच्या कानी पडू लागली.
दुसरीकडे भाजपच्या गोटात मात्र शांतता होती. काहीही झाले तरी बहुमत आपल्याकडे. ते दोघे कितीही कार्यक्षम झाले तरी मोठ्या पक्षाचा मान कुणी हिरावू शकत नाही. ‘रात्र थोडी सोंगे फार’ या न्यायाने काही दिवस हे चालेल व मग दोघेही गप्प बसतील. शेवटी देवाभाऊंची सर कुणालाच नाही असाच सूर भाजपच्या गोटात होता. नेमक्या याच गाफिलतेचा फायदा घेत दादा व एकनाथरावांची रणनीती आकाराला आली. मग ठरल्याप्रमाणे एका पहाटे दोघांनीही चाणक्यांची वेळ घेऊन एकत्रपणे दिल्ली गाठली. आता देवाभाऊ नक्कीच झोपलेले असतील असे म्हणत ते निश्चिंत मनाने दरबारात दाखल झाले. राज्यातल्या सामान्य नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा. त्यांच्या तक्रारीची तड लागावी, त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही दोघेही पहाटे दोन ते सकाळी आठ या वेळात कसे काम करतो हे त्यांनी सविस्तरपणे चाणक्यांच्या कानावर घातले. ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर कौतुकभाव पसरलेले दिसताच एकनाथराव हळूच म्हणाले. ‘अडचण फक्त एकच. मला पहाटे व दादांना भल्या सकाळी कामे हातावेगळी करताना मुख्यमंत्र्यांची मान्यता वा सही हवी असेल तर फाइल बाजूला ठेवावी लागते. यामुळे अभ्यागत नाराज होतात. तेव्हा आमची विनंती एवढीच की पहाटे दोन ते चार या वेळेत मला व चार ते आठ या काळात दादांना मुख्यमंत्रीपदाचे अधिकार दिले तर सरकार अधिक गतिमान होईल. शिवाय आमच्याही मनातली रुखरुख कायमची निघून जाईल.’ हे ऐकताच चाणक्य चमकले. मी बोलतो देवेंद्रशी असे म्हणत ते उठले. दोघेही तिथून गेल्यावर त्यांनी थेट देवाभाऊंना फोन केला व म्हणाले ‘ एकतर तुम्ही रात्रभर जागे राहा किंवा ते दोघे रात्री दोन वाजता झोपतील याची तरी व्यवस्था करा. यानंतर अशी मागणी यायला नको’