महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठेची कुस्ती शनिवारी रात्री पुण्यात पार पडली. योगायोग म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी, म्हणजे १५ जानेवारीला स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदकवीर खाशाबा जाधव यांच्या ९७व्या जन्मदिनानिमित्त ‘गूगल’ने खास ‘डूडल’ प्रसृत केले. जवळपास ७० वर्षांपूर्वी कोणत्याही अपेक्षा वा मदतीविना, हॉकी या एकाच खेळावर येथील क्रीडारसिकमानस एकवटलेले असताना खाशाबांनी हेलसिंकीच्या थंडीत भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून आणले. त्यानंतर ४४ वर्षे भारताला वैयक्तिक ऑलिम्पिक पदकासाठी वाट पाहावी लागली. कुस्तीमधील पुढील ऑलिम्पिक पदकासाठी तर ५६ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. खाशाबांच्या त्या अविस्मरणीय पदकानंतर कुस्तीमध्ये सुशीलकुमार (२), योगेश्वर दत्त, साक्षी मलिक, रविकुमार दाहिया आणि बजरंग पुनिया यांनी आणखी सहा ऑलिम्पिक पदके जिंकली, परंतु ती सगळी नवीन सहस्रकात.
आणखी वाचा – विश्लेषण : ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे महत्त्व किती?
खाशाबांच्या बरोबरीने त्याच स्पर्धेत केशव माणगावे या आणखी एका मराठी मल्लाचे ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकले. नवीन सहस्रकातील पदकविजेत्यांमध्ये मात्र मराठी मल्ल कुठेही नाही. म्हणजे ज्या मातीतून ऑलिम्पिक कुस्तीमधील पदकाची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या मातीत आज पदकविजेते जन्मालाच येत नाहीत, असे समजावे का? महाराष्ट्र केसरी बहुमानाची चर्चा करताना, या वास्तवाकडे डोळेझाक करता येत नाही.
एके काळी भारतीय कुस्तीचे केंद्र असलेल्या पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात आजही कुस्तीची लोकप्रियता टिकून आहे हे दरवर्षी महराष्ट्र केसरीच्या निमित्ताने होणाऱ्या कुस्त्या पाहायला येणाऱ्या प्रेक्षकसंख्येवरून पुरेसे स्पष्ट होते. आणखी तपशीलही उद्बोधक ठरावा. अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन मल्लांपैकी शिवराज राक्षे नांदेडचा, तर महेंद्र गायकवाड सोलापूरचा. ते ज्या मल्लांना मात देत अंतिम फेरीत पोहोचले, त्यांपैकी हर्षवर्धन सदगीर हा माजी विजेता नाशिकचा, तर सिकंदर शेख वाशीमचा. शिवराज आणि महेंद्र ज्या एकाच तालमीत घुमायचे, ती तालीम आहे पुण्यातली. अंतिम सामनाही पुण्यात रंगला. तेव्हा या भूगोलाची नोंद घेण्याचे कारण म्हणजे, कुस्ती हा खेळ आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळला जातो, मात्र त्याला सर्वाधिक लोकाश्रय आणि राजाश्रय पश्चिम महाराष्ट्रात मिळतो, हे महत्त्वाचे. तरीदेखील कुस्तीच्या बाबतीत आपल्याकडे रिंगणाबाहेर राजकारण्यांचेच फड अधिक रंगतात असे गेली काही वर्षे दिसून येते. ब्रिजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष. महाराष्ट्र केसरीच्या लढतीवेळी या महाशयांनी महाराष्ट्रातील ऑलिम्पिक पदकदुष्काळाचा उल्लेख केला. त्याला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीपटूंच्या विविध स्तरांतील मानधनांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. हा उत्स्फूर्तपणा स्तुत्यच. परंतु फडणवीस कोणत्या पक्षाचे आहेत किंवा राज्यातील कुस्तीचे आश्रयदाते शरद पवार यंदा महाराष्ट्र केसरीसाठी का आले नाहीत, वगैरे चर्चा पक्षीय रंग देऊन सुरू आहेत त्यांना पूर्णविराम मिळाला पाहिजे. महाराष्ट्र हे उद्योगप्रधान राज्य आहे आणि येथील अनुभवी राज्यकर्त्यांना निधीउभारणी आणि गुंतवणुकीविषयी पुरेपूर भान आहे. त्या भानाचा वापर करून कुस्तीकडे लक्ष देण्याची वेळ केव्हाच येऊन ठेपली आहे. हरयाणासारख्या छोटय़ा राज्याने या बाबतीत मोठी आघाडी घेतली आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश ही राज्येही मागे नाहीत. कुस्ती मातीतच रुजलेली अशी ही राज्ये महाराष्ट्रासारखीच. इतर बहुतेक निकषांवर ती महाराष्ट्राच्या मागे असताना, कुस्तीतला विरोधाभास मात्र ठळक दिसून येतो.
नवा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे हा अभिनंदनास पात्र आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवराजने प्रतिकूल परिस्थिती आणि सततच्या दुखापतींवर मात करून येथवर मजल मारली. चांदीची गदा, पाच लाख रुपये, मोटार यांची प्राप्ती होऊनही शिवराजला राज्य सरकारी नोकरी मिळावी, अशी अपेक्षा त्याच्या वडिलांनी व्यक्त केली. त्यात काहीही चूक नाही. कारण प्रत्येक कुस्तीपटूला सोन्याचे दिवस सरल्यानंतर भविष्याची चिंता वाटू नये, असे वातावरणच आपण तयार केलेले नाही. शिवराज राक्षे, नरसिंह यादव, राहुल आवारे, नुकताच हिंदूकेसरी झालेला अभिजित कटके असे उत्तमोत्तम मल्ल याही मातीत तयार होतात. काका पवारांसारखे उत्तम प्रशिक्षक आजही आपल्याकडे आहेत. परंतु या मांदियाळीला आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्तरावर नेण्यासाठी सरकारी पाठबळ आणि सरकारी कार्यक्रमाची नितांत गरज आहे. हे होत नाही तोवर महाराष्ट्र केसरी, पुढे जमल्यास हिंदू केसरी आणि दिवस सरल्यानंतर भविष्याची भ्रांत या चक्रातून या गुणवंतांची सुटका नाही. खाशाबांच्या राज्यात ही परिस्थिती निश्चितच शोभादायी नाही!