ऑगस्ट, १९८१ चा ‘किर्लोस्कर’ मासिकाचा अंक- या मासिकाच्या प्रारंभास ६० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ हीरकमहोत्सवी वर्ष विशेषांक म्हणून तो प्रकाशित केला होता. त्या विशेषांकात योजलेल्या परिसंवादाचा विषय ‘महाराष्ट्राची नवी अस्मिता’ हा होता. स्वातंत्र्य मिळवून तीन दशके लोटली होती. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्नावरून दलित-सवर्ण संघर्ष पेटला होता. पुरुषी वर्चस्वातून मुक्ततेसाठी स्त्री धडपडत होती. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा म्हणून शेतकरी संघटना आंदोलन करीत होती. राज्यातील तरुणांच्या मनात अस्मितेचे नवे धुमारे फुटत होते. अशा काळाची पार्श्वभूमी या परिसंवादास होती. सर्वश्री तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. गं. बा. सरदार, ना. ग. गोरे, प्रा. वि. म. दांडेकर, प्रा. नरहर कुरुंदकर, राजाभाऊ गवांदे, प्रा. रावसाहेब कसबे यांनी परिसंवादात आपली मते मांडली होती. दलित समस्या, स्त्रीमुक्ती, शेतकरी आंदोलन आणि समाजप्रबोधन अशी चतु:सूत्री या लेखनाची चौकट होती.
यात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले होते की, ‘‘आपल्याकडील वर्णव्यवस्था धार्मिक तत्त्वज्ञानावर अधिष्ठित होती. दलित, शोषितांचे प्रश्न यामुळे ऐरणीवर आले होते. हे प्रश्न परंपरागत आर्थिक व्यवस्थेची परिणती होती. स्पृश्य समाजवर्गास स्वस्तात मजूर मिळावा म्हणून ही व्यवस्था स्थायी राहील, अशी व्यवस्था धर्माचा आधार घेत कायम ठेवली जात होती. दलितवस्तीत दलित डॉक्टर बनू शकत नव्हता, म्हणून राखीव जागा आल्या. त्यातील सवर्ण-दलितांतील अल्प गुणवत्ता फरकाची सल सवर्णांत खदखदत होती. खरं तर सवर्णांची ही आत्मवंचना होती. सवर्णांचा हा नागडा स्वार्थ होता.’’
स्त्री-पुरुष भेद व स्त्रीमुक्तीवर भाष्य करत तर्कतीर्थांनी म्हटले होते, ‘‘आपल्या समाजात स्त्री-पुरुष मिसळत नाहीत, म्हणून त्यांचे सामाजिक जीवन कुटुंबाबाहेर भिन्न असते. परिणामी, स्त्रीस लग्नात जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य राहात नाही. हुंड्याबाबत मुलाच्या लग्नात आणि मुलीच्या लग्नात सोयीस्कर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात. मुलीला पालकांनी चांगले स्थळ काहीही करून मिळवून द्यावे, अशी अपेक्षा असते. कारण, तिला परक्या घरात आयुष्य काढायचं असतं. स्त्री- पुरुषात पाशवी शक्तीशिवाय अन्य फरक नाही, हे विज्ञानाने सिद्ध केल्याने पाशवी शक्ती (अन्याय)तून मुक्तता मिळून स्त्रीला व्यक्ती वा माणूस म्हणून प्रतिष्ठा लाभली पाहिजे, ही काळाची मागणी होती.’’
सामाजिक प्रबोधनासंदर्भात आपल्या समाजात बुद्धिवादी दृष्टिकोनाची रुजवण न झाल्याने दैवी शक्तीचे स्तोम माजवणाऱ्या साधू-साध्वींचे प्रस्थ आहे, याकडे लक्ष वेधत तर्कतीर्थ स्पष्ट करतात की, ‘‘गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासात रोगाराईस बळी पडलेले साधू-साध्वी दिसून येतात. दैवी शक्ती त्यांच्यात आहे, तर त्यांना मृत्यू कसा झाला, असा प्रश्न आपणास पडत नाही. शिवाय डोक्याला टक्कल, वृद्धपणी दात पडणे, हाती काठी येणे यांतून त्यांची मुक्ती नसते. हे आपल्या लक्षात आले पाहिजे. चिकित्सा, बुद्धिवादी दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठा रुजविण्यासाठी समाजप्रबोधन आवश्यक आहे.’’
प्रा. वि. म. दांडेकर शेतकरी कुटुंबात दोन भावांतील शिक्षित-अशिक्षित तफावत, त्यातून शिक्षित भावाचे शहरात जाऊन नोकर होणे, पाण्याचे समन्यायी वाटप नसणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास रास्त भाव न मिळणे, इ. प्रश्नी लक्ष वेधत ते मांडणी करताना दिसतात. महाराष्ट्राची नवी अस्मिता रुजायची, तर समाजात पारंपरिकतेस फाटा देऊन नवी जीवनपद्धती स्वीकारणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य असल्याचे मत विविध मान्यवरांच्या मतसंग्रहातून पुढे येते. त्यातही तर्कतीर्थ बुद्धिवादी दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठा, चिकित्सकवृत्ती या त्रिपदी परिवर्तनाची जी आवश्यकता स्पष्ट करतात, ती सन १९८१ नंतरच्या गेल्या सुमारे ५० वर्षांत आपण अंगीकारली नसल्याने महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी होऊ शकला नाही, हे वास्तव होय. आपले शिक्षण जोवर माणूस घडणीचे माध्यम व साधन बनणार नाही, तोवर या स्थितीत फरक पडण्याचे स्वप्न पाहणे, ही आत्मवंचनाच ठरणार. म्हणून नव्या महाराष्ट्राची नवी अस्मिता अंगीकारायची ही योग्य वेळ होय, असे वाटते.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com