विसाव्या शतकातील सहाव्या दशकात मराठी नियतकालिकांमध्ये शब्दकोड्यांचे पेव फुटले होते. त्यात ‘लोकसत्ता’मधील शब्दकोडी प्रसिद्ध होती. ती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर व नाटककार विद्याधर गोखले आलटून-पालटून तयार करीत. पुढे साळगावकरांनी महाराष्ट्रात ‘शब्दरंजन’ शब्दकोडे स्पर्धा रुजविली. तिला यश आल्यानंतर ‘शब्दरंजन’ दिवाळी अंक सुरू केला. त्याचे संपादक होते ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ग. दि. माडगूळकर. त्यांनी १९६२ च्या आपल्या दिवाळी अंकात ‘महाराष्ट्राची नीतिमत्ता’ विषयावर परिसंवाद योजला होता. त्यात नीतिमत्ता विषयाच्या विविध पैलूंवर विद्वानांनी प्रकाशझोत टाकला होता. डॉ. गो. स. घुर्ये, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर, प्रा. गोवर्धन पारीख, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. सुमंत मुरंजन, वि. पु. भागवत यांनी नीतिमत्तेवर लिहिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राजकीय क्षेत्रातील नीतिमत्ता’ या विषयावर विचार व्यक्त करीत सुमारे सहा दशकांपूर्वी तर्कतीर्थ म्हणत होते, ‘‘पूर्वी ही ‘राजाची नीती’ म्हणून पाहिले जायचे. आज लोकशाहीत ती ‘राजनीती’ झाली आहे. राजनीतीला नैतिक पावित्र्याचे बंधन असावे की नाही, याबाबत महाभारत काळापासून वाद आहे. राजकारण आणि राजनीतीमध्ये नैतिक मूल्ये असलीच पाहिजेत, याबाबत मी ठाम आहे. राज्यसत्ता वा राज्यसंस्था समाजाचे अभिन्न अंग असतात. या संस्थांचा नीती हाच प्राण आहे. प्रामाणिकपणा, सचोटी, सत्यनिष्ठा, अहिंसा ही नीतीची स्थायी तत्त्वे होत. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील नीतिमत्तेचे महत्त्व व्यास नि कौटिल्य यांनी स्पष्ट केले आहे. इतिहासकाळात राज्यविस्तारासाठी साम, दाम, दंड, भेद वैध होते. लोकशाही सुरू झाल्यावर मात्र राज्यसत्तेवर नीतीचा अंकुश सर्वोपरी झाला. महात्मा गांधींनी राजनीती नैतिकतेच्या मूल्यांवर केली. स्वातंत्र्योत्तर काळात घटनेने नियम, कायदे इ. आधारे नैतिकता अंतिम तत्त्व म्हणून स्वीकृत केली, तरी राजकारण मात्र लाचलुचपत, काळाबाजार, नफेबाजीवर चालले आहे. सामान्य प्रजेमध्ये कायद्यातून पळवाट काढण्याची वृत्ती वाढली आहे. प्रशासनात वशिलेबाजी, दप्तरदिरंगाई वाढते आहे.’’

भारतात व महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष महात्मा गांधीप्रणीत नैतिकता मानत नाहीत. ध्येयवाद, साधनशुचिता मान्य केली, तरच राजकीय जीवनात नैतिकता नांदेल. आज पंचायतराज व्यवस्थेने राजसत्ता गावापर्यंत रुजवली आहे. ‘सूर्य-जयद्रथ’ न्यायाने राज्यकारभारातील प्रमादांची शहानिशा व्हायला हवी, तरच विकेंद्रित लोकशाही शुद्ध राहील.

‘‘भारतीय लोकशाही ही जगातील लोकशाही राष्ट्रांना कौतुकास्पद आहे. तिचे रक्षण करण्यास पात्र असे लोक आणि लोकनेते या देशात आहेत, अशा तऱ्हेचा भरवसा जगात निर्माण करणे, हा या देशात लोकशाही स्थिर होण्याचा एकमेव मार्ग आहे, असे मला वाटते. आपल्या देशाची राजकीय नीतिमत्ता स्थिरावत आहे. याचे एकमेव प्रमाण म्हणजे देशातील लोकशाही स्थिरावणे व वाढीस लागणे होईल. आपल्या देशातील राजकारण, प्रशासन आणि राज्यकारभार नैतिकदृष्ट्या शुद्ध आहे की नाही, याचे मुख्य गमक देशातील राजकारण शुद्ध होणे व वाढणे हेच आहे. आमच्या राजकीय पक्षोपक्षांची नीतिमत्ता वाढत आहे की नाही, याचेही तेच प्रमाण होय. लोकांचा कोणत्याही राज्यसंस्थेवर विश्वास बसतो, तोही विशिष्ट राज्यसंस्था व तिचे प्रशासन नैतिकदृष्ट्या चोख, कार्यक्षम आणि निर्दोष असेल तर.’’

१९६२ चा हा तर्कतीर्थ विचार वर्तमान ‘‘महाराष्ट्रास आपणास लागू करता येतो का, ते पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. या परिसंवादात सामाजिक नीतिमत्ता विषयावर विचार व्यक्त करीत प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर म्हणतात, ते अधिक महत्त्वाचे आहे. ‘‘महाराष्ट्राच्या सामाजिक नीतिमत्तेच्या अवनतीच्या समस्या व्यासपीठावरील उपदेशाने अथवा व्याख्यानबाजीने सुटू शकतील, असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही… नीतिमत्ता हा विषय मूळ परंपरा, आदर्श व अंत:प्रेरणेच्या कक्षेत येणारा विषय आहे. हे आदर्श, परंपरा अथवा अंत:प्रेरणा समाजमनांत निर्माण व्हायच्या, तर आमच्या बुद्धीवादी आणि सुशिक्षित समाजात त्या प्रथम निर्माण झाल्या पाहिजेत.’’

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com