‘‘ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर केव्हाही होईल सपाट’’, अशा स्पष्ट शब्दांत परिवर्तनवादी विचारांचा मार्ग दाखवणारे महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासातील अर्ध्वयू म्हणजे प्रा. मा. म. देशमुख. उजव्या विचारांच्या लेखकांनी लपवलेला आणि इतिहासात शिवरायांवर तलवारीने वार करणारा अफजलखानाचा वकील सर्वप्रथम आपल्या लेखणीतून समाजासमोर आणण्याचे धाडस ज्यांनी केले ते होते प्रा. मा. म. देशमुख.
प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताच्या इतिहासातील अनेक धक्कादायक पण वास्तव पैलू समाजासमोर यावे, यासाठी मा. म. देशमुख आयुष्यभर प्रस्थापितांशी भिडत राहिले. ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आणि अनेकांची वैचारिक दैवते त्यांच्या देवघरांसह हादरली. पण, या पुस्तकातील संदर्भ जितके सडेतोड होते तितकेच अचूकही होते. हे पुस्तक आले तेव्हा मा. म. देशमुख नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये इतिहास शिकवत. त्यांच्या या पुस्तकातील मुद्दे खोडता येत नाहीत म्हणून नागपुरातील काही प्रतिगामींनी देशमुखांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न केला.
या कारस्थानाबाबत देशमुखांच्या विद्यार्थ्यांना कळताच हजारो तरुण त्यांच्या मदतीला धावले. जिथे देशमुखांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न झाला त्याच ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘प्रेमयात्रा’ काढली. पुढे या पुस्तकावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली. पण, न्यायालयात अवतरण चिन्हापर्यंत लढून देशमुखांनी ही बंदी उठविण्यास शासनाला भाग पाडले. त्यांच्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ना नफा ना तोटा तत्त्वावर त्याची विक्री करण्याचा निर्णय देशमुखांनी घेतला. त्यातून पुस्तकाने प्रचंड खपाचा उच्चांक गाठला. या घटनेतून देशमुख यांची वैचारिक कीर्ती देशभर पोहोचली. हजारो दाणे असणारे कणीस जमिनीच्या गर्भात उगवावे असे वाटत असेल तर आधी कुठल्यातरी एका बीजाला स्वत:ची आहुती द्यावी लागते. झापडबंद बहुजनांचे डोळे उघडण्यासाठी मा. म. देशमुख स्वत: ते बीज झाले. ‘‘इतिहास फक्त राजे-रजवाड्यांचा नसतो, तो लढणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या बहुजनांचाही असतो,’’ असे ते निर्भयपणे सांगत. प्रा. मा. म. देशमुख हे एक बहुजनकेंद्री आक्रमक प्रचारक व इतिहास संशोधक होते. महाराष्ट्राला पुरोगामी मार्गावर न्यायचे असेल तर लेखणीसारखे साधन नाही, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. म्हणून, देशमुखांनी राष्ट्र जागृती लेखमाला हा प्रकल्प सुरू केला. त्याअंतर्गत अनेक ग्रंथ लिहिले.
‘जय जिजाऊ, प्राचीन भारताचा इतिहास, बहुजन समाज आणि परिवर्तन, बौद्ध धम्म आणि शिवधर्म, भांडारकर झाँकी है, शनिवारवाडा बाकी है, मनुवाद्यांशी लढा, मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा, मराठ्यांचे दासीपुत्र, युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा, रामदास आणि पेशवाई, वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य ही त्यांची पुस्तके प्रचंड गाजली. लेखणी इतकीच धार त्यांच्या वाणीलाही होती. जाहीर व्याख्यान देत असताना अनेकदा ते ‘पाणी तापू द्या…’ असे आपल्या खास शैलीत सांगायचे आणि श्रोत्यांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचायचा. विधायक परिवर्तनासाठी तरुणांना लाजवेल इतक्या क्षमतेने वयाच्या ८८व्या वर्षांपर्यंत ते कार्यरत राहिले आणि परवा अखेर गेले. तब्बल आठ दशके अविरत गर्जत राहणारा बहुजनांचा हुंकार अखेर शांत झाला.