संध्या गरवारे
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्रशासन सज्ज झालं आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी निवडणूक यंत्रणा सर्वांना आवाहन करत आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याचं मतदानाचं प्रमाण वाढावं असं उद्दिष्ट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समोर ठेवलं आहे आणि त्यासाठी राज्यभर मतदार जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राज्याची मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. या वेळी नंदुरबार जिल्ह्यात ७२.९४ टक्के, कोल्हापूरमध्ये ७१.७८ टक्के, गडचिरोलीत ७०.५५ टक्के मतदान झालं तर मुंबई शहर हा राज्यात सर्वांत कमी मतदान झालेला जिल्हा असून या जिल्ह्यात ५१ टक्के मतदान झालं होतं. मुंबई शहर जिल्ह्यात कुलाबा मतदारसंघ, मुंबई उपनगर जिल्ह्यातला कलिना मतदारसंघ, ठाणे जिल्ह्यातला अंबरनाथ, पुणे जिल्ह्यातली पुणे छावणी (कंटोनमेंट) येथे सर्वांत कमी मतदान झालं होतं. मतदान कमी असलेल्या जिल्ह्यांत मतदान वाढविण्यासाठी प्रशासन विविध जनजागृतीपर उपक्रमांवर भर देत आहे.
हेही वाचा :उलटा चष्मा: पदात स्वारस्य आहे, पण…
‘स्वीप’ उपक्रमामुळे मतदानात वाढ
‘स्वीप’ (सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) उपक्रमामुळे तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी २०१९ मधील २,५९३ वरून ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत ५,९४४ पर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर युवा मतदार निवडणूक प्रक्रियेत अधिक सक्रिय व्हावेत, यासाठी निवडणूक प्रशासन अनेक उपक्रम राबवत आहे. अमरावती जिल्ह्यात ‘स्वीप’च्या विविध उपक्रमांमुळे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत झालेले ६०.३६ टक्के मतदान २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत ६३.५८ टक्क्यांपर्यंत वाढले. नाशिक जिल्ह्यातदेखील जनजागृतीमुळे मतदान ६१.७४ टक्क्यांवरून ६४.२१ टक्क्यांपर्यंत पोहोचले.
मल्टिमीडियाचा वापर
‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदारांशी विविध माध्यमांतून संवाद साधला जात आहे. यात मल्टिमीडियाचा प्रभावी वापर आणि थेट जनसंपर्क अशा दोन्ही पद्धतींचा यात समावेश आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘अठरावं वरीस मोक्याचं’, ‘इथे सगळी बोटे सारखी आहेत’, ‘मधाच्या बोटाला बळी पडू नका’, ‘निर्धार महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा’, अशा आकर्षक संदेशांचा वापर केला जात आहे. हे संदेश शासकीय आणि नागरी सेवांच्या सहकार्याने राज्यभर पोहोचवले जात आहेत. राज्यातली माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाची ८०० होर्डिंग, वाहतूक कार्यालयाच्या राज्यभरातील शाखांमधील होर्डिंग, राज्यभरातील महानगरपालिकांचे ३ हजारांपेक्षा जास्त डिजिटल डिस्प्ले, सार्वजनिक बस सेवा पुरवणाऱ्या १००० पेक्षा जास्त बस आणि १५०० पेक्षा जास्त इतर वाहनं, ११०० पेक्षा जास्त बस स्थानकं, सुमारे ५ हजार स्वच्छता वाहनांवरून होत असलेल्या घोषणा, मध्य आणि पश्चिम रेल्वे तसंच मेट्रो रेल्वे सेवेद्वारा रेल्वेगाड्यांमधल्या घोषणा- फलाटांवरील जाहिरातींचे डिस्प्ले इतकी याची व्याप्ती मोठी आहे. इतकंच नाही तर महानगर- टाटा पॉवर- बेस्ट वीज सेवा यांच्याद्वारे २० लाखांपेक्षा जास्त देयकांवर तसंच राज्यभरातील महानगरपालिकांनी पाठवलेल्या आठ लाख मालमत्ता करांच्या देयकांवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरात स्वरूपातील संदेशांमधून, राज्यभरातील लाखो कुटुंबं म्हणजे कोट्यवधी मतदारांपर्यंत मतदान करण्याचं आवाहन थेट पोहोचत आहे.
हेही वाचा :लोकमानस : संभ्रमात जनता, वाटाड्या कोणी नाही…
राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रम
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय मतदारजागृती उपक्रमांचा प्रारंभही झाला. मुंबई पोलीस दलाच्या वाद्यावृंद पथकाचं सादरीकरण, निवडणूक गीताचं सादरीकरण- त्यावरचं नृत्य, टपाल विभागाकडून विशेष पाकीट- शिक्क्याचं अनावरण, मतदारांना प्रतिज्ञा, असे उपक्रम राबवण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमांत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सदिच्छादूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छादूत नीलेश सिंगीत, राज्याच्या निवडणूक गीताचे संगीतकार गायक मिलिंद इंगळे, गायक राहुल सक्सेना, रॅपर सुबोध जाधव, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री अनन्या पांडे, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, अभिनेते मनोज जोशी, अभिनेता बजाज आनंद, अभिनेत्री सोनाली खरे, अभिनेता अली असगर यांच्यासह सामाजिक आणि कला क्षेत्रातल्या अनेक नामांकित व्यक्तिमत्त्वांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदारांना आपला मताधिकार बजावण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमातच, केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रादेशिक कार्यालयाच्या फिरत्या मतदार जनजागृती वाहनालाही हिरवा झेंडा दाखवला गेला. हे फिरतं वाहन राज्यातील मतदानाचं अल्प प्रमाण असलेल्या १५ जिल्हे आणि १३३ मतदारसंघांमध्ये जनजागृती करत आहे. या वाहनाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राचं ठिकाण समजून घेणं, आदर्श आचारसंहिता, आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी, उमेदवारांविषयी जाणून घेणं याविषयी मतदार जागृती केली जात आहे.
जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणांची भूमिका
राज्यात प्रत्येक जिल्ह्याची निवडणूक यंत्रणाही ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत स्वतंत्रपणे मतदार जनजागृतीचे उपक्रम राबवते आहे. घरोघरी भेटी, रांगोळ्या, मानवी साखळ्या, प्रभात फेऱ्या, पथनाट्य, सायकल – बाइक रॅली, मॅरेथॉन, मतदारांना शपथ, संकल्पपत्र, विविध स्पर्धा, सण साजरे करण्याच्या निमित्ताने मतदारजागृतीपर उपक्रम सुरू आहेत. बुलडाणा जिल्ह्यात मतदारांना मतदान प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमार्फत अभिरूप मतदान केंद्रांची तालीम आयोजित करण्यात आली. यामुळे लोकांना प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेचा अनुभव मिळाला.
हेही वाचा :लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
लातूर जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अभंग, गवळणी, भारूड, गोंधळगीत, पोवाडा अशा पारंपरिक कलाप्रकारांचा अभिनव वापर केला जात आहे. तिथे १२१ शाळांच्या विद्यार्थ्यांमार्फत १ लाख ३ हजारांपेक्षा जास्त पालकांपर्यंत पोहोचत मतदानाचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलं आहे. सांगलीत शासकीय रुग्णालयाच्या ओपीडी दस्तावेजांवर, बँकांच्या व्यवहार पावत्यांवर मदानाच्या तारखेचं स्मरण करून देणारा शिक्का वापरून मतदार जनजागृती केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात, एकाच वेळी तब्बल १,३३३ ग्रामपंचायतींमध्ये मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. सव्वा लाखापेक्षा अधिक मतदारांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली तर दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांनी संकल्पपत्र भरलं.
एक जिल्हा – एक व्हॉट्सअॅप नंबर
अहिल्यानगर जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक जिल्हा – एक व्हॉट्सअॅप नंबर हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमासोबतच, जिल्ह्यातील मतदारांसाठी ई-शपथविधीचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये मतदारांना शपथ घेतल्यानंतर क्यूआर कोडच्या माध्यमातून ई-प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्रीमध्ये ‘स्वीप’ची टीम थेट शेतमजुरांपर्यंत पोहोचली. सर्व शेतमजुरांनी काम तर बारा महिने सुरूच असतं, पण मतदानाच्या दिवशी आम्ही नक्की मतदान करणार असा संकल्प व्यक्त केला आहे. या अशा प्रयत्नांसोबतच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सर्व जिल्ह्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरूनही मतदारजागृती केली जात आहे. मतदारजागृतीच्या उपक्रमांना प्रसिद्धी दिली जात आहे. समाजमाध्यमांवरून सेलिब्रिटी, समाजातील प्रभावी व्यक्तिमत्त्वांची आवाहनं प्रसिद्ध केली जात आहेत.
हेही वाचा :चिप-चरित्र: हुआवेचं काय करायचं?
सर्व सोयीसुविधायुक्त मतदान केंद्र
मतदान प्रक्रिया मतदारांना आकर्षित करणारी असावी यासाठीही राज्यात अनेक ठिकाणी विशेष संकल्पना घेऊन मतदान केंद्रे उभारली जात आहेत. यात वन्यजैवविविधता, सांस्कृतिक – सामाजिक वारशाचं दर्शन, स्तनदा – गर्भवतींसाठी हिरकणी मतदान केंद्र, युवा- अपंग- महिला संचालित विशेष मतदान केंद्रे उभारली जात आहेत. अपंग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सहकार्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था, मतदारांसाठी शेड – पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध असेल, याची खातरजमा करून घेतली जात आहे. अभिनव पद्धतीनं मतदारांचं स्वागत करून त्यांचा मतदानाचा अनुभव संस्मरणीय करण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी केला जात आहे.
अशा या विविधांगी प्रयत्नांच्या माध्यमातून नऊ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त मतदारांपर्यंत ज्यात दोन कोटींपेक्षा जास्त युवा म्हणजे १८ ते २९ वयोगटातलेही मतदार आहेत आणि वयाची शंभर पूर्ण केलेले ४७ हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचून सजग, जाणकार आणि शिक्षित मतदार घडवण्याचा आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न आहे. निवडणूक यंत्रणा मतदानाच्या दिवसासाठी सज्ज झाली असून आता प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे आपला मतदानाचा हक्क बजावण्याची.
संध्या गरवारे (विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय)