महायुतीतील तिन्ही प्रमुख नेत्यांची ‘मुख्यमंत्रीपदात रस नाही’ ही विधाने ऐकून दिल्लीतील चाणक्य चक्रावले. या तिघांच्या मनात नेमके काय हे जाणून घ्यायलाच हवे असे ठरल्यावर त्यांना ए. जी. वेल्स या विज्ञान कथालेखकाला आदर्श मनणाऱ्या एका दूताची आठवण झाली. वेल्सपासून प्रेरणा घेऊन ‘मनकवडा’ यंत्र तयार करण्याच्या खटपटीत असलेल्या या दूतालाच मुंबईत पाठवायचे ठरले. त्याने दिलेला अहवाल खालीलप्रमाणे होता.
देवेंद्र फडणवीस : या तावडेंना ऐन प्रचाराच्या काळात ‘विनोद’ करण्याची बुद्धी कुठून सुचली कुणास ठाऊक. आधीचा राग काढत असावेत. म्हणे मुख्यमंत्रीपदाबाबत मध्य प्रदेश व राजस्थानसारखा प्रयोग राज्यात होऊ शकतो. त्यामुळे रस नाही असे बोलावे लागले. तरीही शालजोडीतून चांगले हाणलेच त्याला. ‘ते तर राष्ट्रीय नेते’ असे डिवचत. अरे, मोदीजी पाठीशी असल्यामुळे मी मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या वेळी ते शहांचेसुद्धा ऐकणार नाहीत हे लक्षात ठेव. म्हणूनच अमितजींनी तसे सूतोवाच केले एका सभेत. त्यानंतर मध्ये कडमडायची काही गरजच नव्हती तावडेंना. ठीक आहे ‘आगे आगे देखो होता है क्या’. शेवटी राज्यातला पक्षाचा चेहरा मीच. त्या तावडेंसारखे ‘दरबारी’ राजकारण करत नाही आपण. मार्गातले सर्व काटे एकेक करत बाहेर काढले. एकदा पदावर बसलो की साऱ्यांचा चोख बंदोबस्त करावाच लागेल. काहीही झाले तरी ‘मी पुन्हा येईन’ हे एकदा सिद्ध करून दाखवायचेच. शिंदे पदावर येणे हा एक अपघात होता हे पक्षाला सिद्ध करून दाखवायची संधी, हे मोदीजींना पटवून दिलेच आहे.
हेही वाचा :लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
एकनाथ शिंदे : मी या मुद्द्यावर बोलणार नव्हतोच, तावडेंमुळे ‘पदाची लालसा नाही’ असे म्हणालो. मी ‘डार्क हॉर्स’ आहे, हे भाजपवाले लक्षातच घेत नाही. काहीही झाले तरी राज्यातले नितीशकुमार आपणच. दिल्लीला विश्वासात घेऊन खूश करण्यासाठी ‘काय काय’ करावे लागते हे या भाजपवाल्यांना अजून कळलेच नाही. उगाच भांडत बसतात सारे. जिवावर उदार होऊन अख्खा पक्षच यांच्या बाजूने फिरवला तो काय उगीच! एकदा मराठा मुख्यमंत्री झाला की विरोधकसुद्धा शांत बसतात हे ठाऊक आहे दिल्लीला. त्यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ या पद्धतीने कामाला लागणारच.
हेही वाचा :चिप-चरित्र: हुआवेचं काय करायचं?
अजित पवार : खरे तर निकाल लागेपर्यंत काही बोलायचे नाही असेच ठरवले होते पण भाजपमधील अंतर्गत सुंदोपसुंदीमुळे ‘शर्यतीत नाही’ असे म्हटले. मुळात पक्ष यांच्या दावणीला बांधला तोच या पदासाठी. काकांनी हट्ट पुरवला असता तर इकडे यायची काही गरजच उरली नसती. शिंदे नको असतील तर दिल्लीला माझाच विचार करावा लागेल. शेवटी प्रश्न मराठा राजकारणाचा हे लक्षात आहे त्यांच्या. जे बोललो ते वरवरचे होते असे सर्व आमदारांना सांगावे लागेल. अन्यथा जायचे पळून काकांकडे. पुतण्याचा हट्ट काकाने नाही तर भाजपने पुरवला असे नरेटिव्ह एकदा सेट झाले की पंधरा वर्षे मागे वळून पाहावे लागणार नाही. अमितजी धोरणी आहेत, ते नक्कीच संधी देतील.