नाट्यमयता निर्माण करणे म्हणजेच राजकारण असा गैरसमज अलीकडे दृढ होत चालला आहे. त्याचेच दर्शन महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर टाकलेल्या बहिष्कारातून घडवले. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा ताठर पवित्रा घेणाऱ्या या नेत्यांनी दुसऱ्या दिवशी मात्र गपगुमान शपथ घेतली. मग काही तासांसाठी हे टोकाचे पाऊल उचलण्याची गरज या नेत्यांना का भासली याचे तर्कसंगत उत्तर कुणीही देऊ शकले नाही. विजय म्हणजे जनतेने दिलेला कौल. तो स्वीकारल्यावर व त्याचे प्रमाणपत्र घेतल्यावर आमदार म्हणून शपथ न घेण्याचा बहाणा करणे योग्य ठरूच शकत नाही. याहीवेळच्या निवडणुका मतदान यंत्रावर – ईव्हीएमवर- होणार हे यातल्या प्रत्येकाला ठाऊक होते. त्या यंत्रावर विश्वासच नसेल तर निवडणुका न लढण्याचा बाणेदारपणा या सर्वांनी आधीच दाखवायला हवा होता. तसे न करता रिंगणात उतरायचे व पक्ष पराभूत झाला म्हणून नंतर यंत्रावर खापर फोडायचे हा रडीचा डाव झाला. तो खेळून या आघाडीने पहिल्याच टप्प्यात आपली विश्वासार्हता गमावली. मतदान यंत्राला विरोध, मतदानातील गैरप्रकार यावर आवाज उठवण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. त्याचा वापर त्यांनी जरूर करावा; पण विधिमंडळ हे त्यासाठीचे व्यासपीठ नाही याचे भान या आघाडीतील नेत्यांना राहिले नाही हेच या कृतीतून दिसले. ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मारकडवाडी या गावाचे गुणगान करणारे फलक हाती धरून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्याची या आमदारांची कृती बालिशपणाचा उत्तम नमुना म्हणावा अशीच. यावरून राजकीय आंदोलन उभारायचे असेल तर ते जरूर करावे, पण त्यासाठी शपथ घेण्याच्या रीतीला गालबोट लावण्याची काही गरज नव्हती. निवडणुकीच्या काळापासून समन्वयाच्या अभावामुळे ही आघाडी कायम चर्चेत होती. त्याचे दर्शन या कथित बहिष्काराच्या वेळीसुद्धा झाले. आज आंदोलन करायचे, सभागृहात जायचे नाही हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतलेला निर्णय विजय वडेट्टीवारांसह अनेकांपर्यंत पोहोचलाच नाही. वडेट्टीवारांना कळल्यावर ते लगेच बाहेर आले, पण आत गेलेल्या माकपच्या दोन आमदारांनी शपथ घेऊन टाकली. समन्वय नसणे हे आघाडीच्या पराभवाचे एक प्रमुख कारण होते. यावर सर्वत्र मंथन सुरू असताना एककल्ली कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या नानांकडून पुन्हा त्याचेच दर्शन घडावे ही शोकांतिकाच म्हणायला हवी. पराभव नेहमी विचार करायला भाग पाडत असतो. यातूनच झालेल्या चुका शोधत व आत्मपरीक्षण करत समोर जाण्याची ऊर्मी प्राप्त करावी लागते. हे साधे तत्त्व अजून या आघाडीच्या नेत्यांना उमगले नाही असाच अर्थ या बहिष्कारातून निघतो.

हेही वाचा : पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!

george soros loksatta editorial
अग्रलेख : ‘परदेशी हाता’चे भूत!
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!

निवडणुकीत पक्षसंघटना कुठे कमी पडली, बूथव्यवस्थापन चुकले का, नियोजनात कुठे कमी पडलो, प्रचाराचे मुद्दे योग्य होते की नाही, जाहीरनाम्यात काय चुकले अशा प्रश्नांना आघाडीतील नेत्यांनी आता भिडणे गरजेचे. ते सोडून मतदान यंत्राला दोष देणे म्हणजे स्वत: केलेल्या चुकांवर पांघरूण घालण्यासारखेच. हा प्रकार नुसता हास्यास्पद नाही तर सत्ताधाऱ्यांच्या हाती कोलीत देण्यासारखाच. याचेही भान आघाडीतील नेत्यांना राहिलेले दिसत नाही. महायुतीचा दणदणीत विजय झाला पण जनता जल्लोष करताना दिसली नाही हे आमदार आदित्य ठाकरेंचे विधान असेच हास्यास्पद वळणावर जाणारे. एखाद्या विजयाची सत्यता अधोरेखित करण्यासाठी हा निकष कसा काय योग्य ठरू शकतो हे आकलनापलीकडले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हा जनतेचा अवमान’ अशी दिलेली प्रतिक्रिया दुसऱ्या टोकाची ठरते. महायुतीला मिळालेल्या विजयाचा आकार खूप मोठा आहे. अशा परिस्थितीत विरोधकांची जबाबदारी आणखी वाढते. त्याकडे लक्ष देण्याचे सोडून आघाडीतील नेत्यांनी अशा कृती व वक्तव्यांतून टिंगलटवाळीचा विषय व्हावे हे अजिबात शोभणारे नाही. आता प्रश्न आहे ते आघाडीचे पुढील काळातील वर्तन असेच राहील का? एकीकडे संख्याबळ कमी असल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याची मारामार असताना असा उथळपणा दाखवून या आघाडीला नेमके साध्य काय करायचे आहे? राज्यातील सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यात आपण कमी पडलो हे सत्य स्वीकारणे अथवा पचवणे अवघड जात आहे म्हणून हा उतावीळपणा आघाडीतील नेते दाखवत आहेत का? असे असेल तर ते चुकांची पुनरावृत्ती करत आहेत असेच खेदाने नमूद करावेसे वाटते. पराभवातून शहाणपण शिकणे हाच उत्तम मार्ग असतो. नेमक्या याच जाणिवेचा अभाव आघाडीत दिसणे हे चांगले लक्षण नाही.

Story img Loader