नाट्यमयता निर्माण करणे म्हणजेच राजकारण असा गैरसमज अलीकडे दृढ होत चालला आहे. त्याचेच दर्शन महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर टाकलेल्या बहिष्कारातून घडवले. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा ताठर पवित्रा घेणाऱ्या या नेत्यांनी दुसऱ्या दिवशी मात्र गपगुमान शपथ घेतली. मग काही तासांसाठी हे टोकाचे पाऊल उचलण्याची गरज या नेत्यांना का भासली याचे तर्कसंगत उत्तर कुणीही देऊ शकले नाही. विजय म्हणजे जनतेने दिलेला कौल. तो स्वीकारल्यावर व त्याचे प्रमाणपत्र घेतल्यावर आमदार म्हणून शपथ न घेण्याचा बहाणा करणे योग्य ठरूच शकत नाही. याहीवेळच्या निवडणुका मतदान यंत्रावर – ईव्हीएमवर- होणार हे यातल्या प्रत्येकाला ठाऊक होते. त्या यंत्रावर विश्वासच नसेल तर निवडणुका न लढण्याचा बाणेदारपणा या सर्वांनी आधीच दाखवायला हवा होता. तसे न करता रिंगणात उतरायचे व पक्ष पराभूत झाला म्हणून नंतर यंत्रावर खापर फोडायचे हा रडीचा डाव झाला. तो खेळून या आघाडीने पहिल्याच टप्प्यात आपली विश्वासार्हता गमावली. मतदान यंत्राला विरोध, मतदानातील गैरप्रकार यावर आवाज उठवण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. त्याचा वापर त्यांनी जरूर करावा; पण विधिमंडळ हे त्यासाठीचे व्यासपीठ नाही याचे भान या आघाडीतील नेत्यांना राहिले नाही हेच या कृतीतून दिसले. ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मारकडवाडी या गावाचे गुणगान करणारे फलक हाती धरून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्याची या आमदारांची कृती बालिशपणाचा उत्तम नमुना म्हणावा अशीच. यावरून राजकीय आंदोलन उभारायचे असेल तर ते जरूर करावे, पण त्यासाठी शपथ घेण्याच्या रीतीला गालबोट लावण्याची काही गरज नव्हती. निवडणुकीच्या काळापासून समन्वयाच्या अभावामुळे ही आघाडी कायम चर्चेत होती. त्याचे दर्शन या कथित बहिष्काराच्या वेळीसुद्धा झाले. आज आंदोलन करायचे, सभागृहात जायचे नाही हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतलेला निर्णय विजय वडेट्टीवारांसह अनेकांपर्यंत पोहोचलाच नाही. वडेट्टीवारांना कळल्यावर ते लगेच बाहेर आले, पण आत गेलेल्या माकपच्या दोन आमदारांनी शपथ घेऊन टाकली. समन्वय नसणे हे आघाडीच्या पराभवाचे एक प्रमुख कारण होते. यावर सर्वत्र मंथन सुरू असताना एककल्ली कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या नानांकडून पुन्हा त्याचेच दर्शन घडावे ही शोकांतिकाच म्हणायला हवी. पराभव नेहमी विचार करायला भाग पाडत असतो. यातूनच झालेल्या चुका शोधत व आत्मपरीक्षण करत समोर जाण्याची ऊर्मी प्राप्त करावी लागते. हे साधे तत्त्व अजून या आघाडीच्या नेत्यांना उमगले नाही असाच अर्थ या बहिष्कारातून निघतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा