या निवडणुकीच्या तीन नायकांतील मुख्य चेहरा कोणाचा असेल तर तो नि:संशय देवेंद्र फडणवीस यांचा. भाजपची गेल्या १० वर्षातील वाटचाल हा फडणवीस यांच्या नेतृत्वाचा आणि त्यातील आव्हानांचा प्रवास आहे…याची सुरुवात २०१४ साली झाली. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निर्विवाद यश मिळवले आणि अर्थातच त्याचे फळ म्हणून त्यांच्या हाती सत्तासूत्रे दिली गेली. त्यांचा पाच वर्षांचा कारभार हा महाराष्ट्राच्या स्थैर्याचा काळ होता. नंतर २०१९ साली त्यांना स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही आणि त्यावेळी एकत्रित शिवसेनेने आणि त्याहीपेक्षा त्या एकत्रित शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना सत्तासहभागासाठी राजी करण्यात भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने दाखवलेली अनाकलनीय उदासीनता त्यांना भोवली. तो फडणवीस यांच्या परीक्षा-काळाचा प्रारंभ. पुढे शिवसेनेते फूट घडवून आणि एकनाथ शिंदे यांस हाताशी धरून फडणवीस यांनी सत्ताकारण केले खरे. पण त्यांच्या प्रतिमेस तडा गेला. तोही विरोधकांकडून नव्हे तर स्वपक्षीयांकडून. आपल्याच दिल्लीश्वरांनी लादलेली दुय्यम भूमिका फडणवीस यांनी गोड मानून घेतली. याच काळात मराठा आंदोलन पेटले आणि फडणवीस यांच्या शिरावर खलनायकत्वाचा मुकुट चढवला गेला. मनोज जरांगे या तोपर्यंत फारशा ज्ञात नसलेल्या कार्यकर्त्यावर पोलिसांचा लाठीमार झाला आणि त्याचे बालंट गृहखाते सांभाळणाऱ्या फडणवीस यांच्यावर आले. तेथून पुढे फडणवीस स्वपक्षीय आणि अन्यांस नकोसे झाले. याच वातावरणात झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपस फटका बसल्यावर तर फडणवीस यांच्या पापाचा घडा भरला असेच विरोधकांस वाटले.
त्यावेळी खरेतर फडणवीस यांनी सत्तापदाचा त्याग करून पक्षाच्या प्रचारार्थ झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामागील खरे कारण हे शिंदे यांच्या हाताखाली ते काम करू इच्छित नव्हते हे होते आणि आताही आहे. या कठीण समयी त्यांना हात दिला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने. या निवडणुकीत संघ पूर्ण ताकदीनिशी उतरला तो भाजपसाठी कमी आणि फडणवीस यांच्यासाठी अधिक, हे सत्य. संघाच्या सहाय्याने भाजपने हा विक्रमी विजय नोंदवला. नायक ते खलनायक आणि पुन्हा आताचा विक्रमी जयनायक असा हा फडणवीस यांचा हा प्रवास. या प्रवासातील त्यांच्या कष्टाची दखल पक्ष कशी घेतो, ते आता पाहायचे.
हेही वाचा : ‘लाडकी बहीण’ला प्रत्युत्तर देण्यात अडथळा कोणाचा?
‘ननायक’ ते नायक!
शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची बक्षिसी दिली तेव्हा शिंदे हे भाजपच्या हातचे ‘बाहुले’ ठरतील आणि सरकारची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राहातील, असे दावे राजकीय विश्लेषक करत होते. ठाणे जिल्ह्यात ‘मातोश्री’चे मनसबदार इतकीच काय ती शिंदेची ओळख. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राची त्यांना ओळख नाहीच शिवाय मुख्यमंत्रीपद संभाळण्याइतका त्यांचा राजकीय वकुबही नाही, असे बोलले जात होते. चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत नाही, भाषण करता येत नाही, इंग्रजी कसे बोलतील, पक्ष कसा चालवतील, असे प्रश्न वारंवार, कुचेष्टेने विचारले जात होते. ‘शिवसेनेतून फुटला तो अल्पकाळात मिटला,’ असे इशारेही दिले गेले. शिवसेनेचे खलनायक आणि न—नायक अशी त्यांची संभावना केली गेली. पण या सर्व शंका, शक्यतांना पुरून उरत ‘न’नायक ते नायक असा दोन—सव्वा दोन वर्षांचा त्यांचा प्रवास राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात अनेकांना थक्क करणारा ठरला आहे.
ठाण्यातील किसन नगर या दाटीवाटीच्या वस्तीत राहाणारा रिक्षा चालक, शिवसेनेचा शाखा प्रमुख, नगरसेवक असा शिंदे यांचा सुरुवातीचा प्रवास. पुढे आमदार, पालकमंत्री हा त्यांचा प्रवासही ‘मातोश्री’च्या कृपेने झालेला. त्यामुळे ४० फुटीर आमदारांचे त्यांनी केलेले नेतृत्व हेच अनेकांसाठी धक्कादायक होते. लोकसभा निवडणुकीपुरतीच त्यांची उपयुक्तता असेल आणि वापर संपला की भाजप त्यांचे ‘ओझे’ फार काळ खांद्यावर घेणार नाही असेही बोलले गेले. याच काळात शिंदे यांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. आपलीच शिवसेना खरी हे पटवून देण्यासाठी ठाकरेंच्या गोटातील अनेकांना आपल्या गोटात आणले. त्यासाठी जे काही करावे लागते ते सगळे ‘उपाय’ त्यांनी आखले. सोबत आलेल्या आमदारांना, नेत्यांना पद्धतशीर बळ दिले. प्रशासन, पोलीस, उद्योग वर्तुळात स्वत:चा दबदबा कायम राहावा, यासाठी योग्य ठिकाणी आपली माणसे नेमली, पेरली. राज्यात मराठा आरक्षणाचे वादळ घोंघावत असताना आपले ‘मराठा’पण त्यांनी मिरवले नाही पण जाणवू मात्र दिले. दिल्लीतील भाजप श्रेष्ठींची पुरेपूर काळजी वाहताना महाराष्ट्रात शरद पवारांसारख्या बड्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठी त्यांच्यातील राजकीय मुरब्बीपणाची साक्ष देत राहिल्या. दिवसरात्र राबायचे, ‘वर्षा’चे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवायचे, यातून ‘सीएम म्हणजे ‘कॉमन मॅनत्र ही प्रतिमा त्यांनी निर्माण केली. ‘महाराष्ट्राचे शाखा प्रमुख’ अशा हेटाळणीपासून शिंदे आता विजयाचे नायक ठरले आहेत.
हेही वाचा : संख्याबळाला मान की शिंदेंचा सन्मान?
उपनायक ते उपनायक…!
‘नायक, खलनायक आणि जयनायक’, ‘न—नायक ते नायक’ या नायकत्वाच्या संघर्षांत अजित पवार यांचा उपनायकपदापासून सुरू झालेला प्रवास मात्र उपनायक पदावरच थांबणार अशी चिन्हे दिसतात. केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी आपले राजकीय जनक, काका शरद पवार यांचा हात सोडून अजित पवार यांनी स्वत:स भाजपच्या गो—शालेत बांधून घेतले खरे. पण तेथेही त्यांच्या वाट्याचे उपमुख्यमंत्रीपद काही त्यांचे साथ सोडण्यास तयार झाले नाही. शरद पवार यांच्या साथीने सत्तेच्या राजकारणात उतरलेल्या अजित पवार यांना पहिल्या छूट उपमुख्यमंत्रीपद मिळाले हेही खरे. पण ते पद इतके आपणास चिकटेल असे तेव्हाही त्यांना वाटले नसेल.
या विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादांनी काय नाही केले? स्वत:ची प्रतिमा नव्याने घडवली, एरवी माध्यमांस चार हात दूर ठेवण्याची सवय सोडली आणि आपणही मनमिळाऊ, स्नेहशील वागू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. स्वत: गुलाबी रंगात न्हाऊन निघाले. तथापि याआधीच्या लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या पत्नीस चुलत बहिणीविरोधात लढवून पराभवच पत्करावा लागणे ही त्यांची राजकीय घोडचूक ठरली. त्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वाट्यास एकच विजय आला. परिणामी विधानसभा निवडणुकांत त्या मुळे अगदीच मोजक्या जागा त्यांच्या पदरात पडल्या. तरीही मुख्यमंत्रीपदाची त्यांची इच्छा काही त्यामुळे कमी झाली नाही. त्रआमची गाडी उपमुख्यमंत्रापदाच्या पुढे काही जात नाही,त्र अशी खंत जाहीर व्यक्त करण्यापर्यंत अजितदादांनी आपला स्वभाव बदलला.
हेही वाचा : महायुती सव्वादोनशेर!
त्याचा परिणाम अर्थातच झाला. त्यांच्या पक्षास दणदणीत विजय मिळाला. अजितदादांचे राजकीय अध्वर्यू काका शरद पवार यांच्या पक्षापेक्षाही अजितदादांस अधिक जागी विजय मिळाला. यासारखा आनंद दुसरा नाही, हे खरेच.
पण तरीही या विजयानंतरही पुन्हा उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागत असेल तर यापेक्षा अधिक मोठी वेदना नाही, हेही तितकेच खरे. अजितदादादेखील हे मान्य करतील.