लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९१९ ते १९२१ अशी तीन वर्षे काशीमध्ये राहून तर्कतीर्थ पदवीचा अभ्यास पूर्ण केला. १९२२ ला ते पदवी परीक्षा देण्यासाठी काशीहून कलकत्त्यास रेल्वेने निघाले होते. वाटेत बार्डोली स्थानकावर गाडी थांबली. बराच वेळ होऊनही गाडी सुटायचे नाव घेईना म्हणून डब्यातून उतरून ते चौकशी करू लागले. रेल्वेसमोर मोठा जनसमुदाय जमलेला होता. लोकांनी रेल्वे रोखून आंदोलन सुरू केले होते. तो ब्रिटिशांच्या अत्याचारांविरोधातील सत्याग्रह होता. महात्मा गांधी यांच्या आवाहनानुसार जानेवारी १९२२ पासून भारतभर असहकार आंदोलन सुरू होते. हा शांततापूर्ण सत्याग्रह भारतभर मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्यातील वाढत्या जनसहभागाने ब्रिटिश राजसत्ता अस्वस्थ होती. सत्याग्रह मोडून काढण्याच्या इराद्याने २ फेब्रुवारी, १९२२ रोजी ब्रिटिश पोलिसांनी चौरीचौरा (जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सत्याग्रहींवर अमानुष लाठीहल्ला केला. त्यामुळे चिडून निषेध म्हणून सत्याग्रहींनी ५ फेब्रुवारी, १९२२ रोजी चौरीचौरा येथे आंदोलने केली. सुमारे अडीच हजार आंदोलक आक्रमक झाले होते. आंदोलनास हिंसक वळण लागत असल्याचे पाहून ब्रिटिश पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला. त्यात तीन सत्याग्रही हुतात्मा झाले. त्यामुळे जनसमुदाय अधिकच प्रक्षुब्ध झाला आणि त्यांनी जाळपोळ सुरू केली. उग्र जमावाने चौरीचौरा पोलीस ठाण्यास आग लावली. त्यात २२-२३ पोलीस मृत्युमुखी पडले.
महात्मा गांधींचा मुक्काम त्यावेळी बार्डोली येथील स्वराज्य आश्रमात होता. असहकार आंदोलनास आलेले हिंसक रूप पाहून त्यांनी आंदोलन स्थगित केले आणि उपवास सुरू केला. लक्ष्मणशास्त्री जोशींवर प्राज्ञपाठशाळेच्या राष्ट्रीय वातावरणाचा प्रभाव आणि संस्कार होता. त्यामुळे आंदोलन स्थळावरचे प्रक्षुब्ध वातावरण पाहून लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी परीक्षा सोडून राष्ट्रीय चळवळीत सक्रिय व्हायचे ठरवले आणि ते स्वराज्य आश्रमात सत्याग्रही म्हणून दाखल झाले. १९२० मध्ये महात्मा गांधींनी प्राज्ञपाठशाळेस भेट देऊन तिथे चालणाऱ्या शिक्षण व राष्ट्रीय संस्कारांची प्रशंसा केली होती. या निर्णयामागे तो एक दुवा होता.
लक्ष्मणशास्त्री जोशी अनेक महिने बार्डोली आश्रमात होते. प्राज्ञमठ, शाळेचे वातावरण आणि स्वराज्य आश्रम यात साम्य असल्याने ते तिथे सहज रमले. अडचण एकाच गोष्टीची होती की, स्वराज्य आश्रमात सर्वांना पहाटे साडेचार वाजता उठून प्रभात प्रार्थनेस अनिवार्यपणे उपस्थित राहावे लागे. महात्मा गांधी प्रार्थनेस नियमित उपस्थित असत. प्रार्थनेनंतर अन्य आश्रमीय ठरवून दिलेला परिपाठ पाळत; पण लक्ष्मणशास्त्रींची झोप अर्धवट होत असल्याने ते परिपाठ काळात झोप घेत. ही गोष्ट गांधींच्या नजरेतून सुटणे अशक्य होते. त्यांनी एकदा बोलावून लक्ष्मणशास्त्रींची कानउघाडणी केली. ‘वाईच्या आश्रमात असेच करता का?’ म्हणून खोचक विचारणा केली. लक्ष्मणशास्त्रींना ही विचारणा बोचली. ते संतापले आणि उत्तर देते झाले, ‘जुलमाचा रामराम करायची मला सवय नाही. माझा नाइलाज आहे.’ या संवादानंतर अर्थातच लक्ष्मणशास्त्रींनी गाशा गुंडाळून वाईस प्रस्थान ठेवले.
लक्ष्मणशास्त्री जोशी प्राज्ञपाठशाळेतही असेच वागत असल्याच्या आठवणी त्यांच्या सहाध्यायांनी लिहून ठेवलेल्या आढळतात. स्वामी केवलानंदांना याची कल्पना होती; पण लक्ष्मणशास्त्री जोशी यांची हुशारी व अन्य गुण लक्षात घेऊन स्वामी कानाडोळा करीत.
या घटनेनंतर सुमारे दशकभराच्या कालावधीनंतर महात्मा गांधींनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा धर्मशास्त्रावरील अधिकार आणि धर्माबद्दलचा परिवर्तनवादी, प्रागतिक दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांना येरवडा तुरुंगात चाललेल्या अस्पृश्यता निवारण चर्चेत मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले. तर्कतीर्थांना पाहताच महात्मा गांधींनी त्यांना ओळखले. महात्मा गांधींची तल्लख स्मरणशक्ती पाहून तर्कतीर्थही चकित झाले; पण महात्मा गांधी आणि तर्कतीर्थ यांच्यातील पुढील आठएक वर्षांच्या निकट सहवासात पूर्वस्मृतींची कटुता नव्हती. उलटपक्षी एकमेकांबद्दल आदर आणि आत्मीयताच होती आणि ती त्या काळात सतत वृद्धिंगत होत राहिली.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com