तारक काटे
निसर्गाचे आणि माणसाचेही मोल ओळखणारी ही आधुनिक खेडी आहेत..
‘सृष्टीमध्ये प्रत्येक माणसाच्या गरजापूर्तीसाठीची विपुलता आहे, परंतु त्याच्या लोभासाठी नाही’ हे गांधीजींचे जगप्रसिद्ध सुवचन आज भेडसावणाऱ्या प्रश्नांवर नेमके बोट ठेवते. या विधानातून निसर्गातील संसाधने, त्यांचे जतन आणि त्यांचा काटकसरीने वापर याविषयीचा गांधींचा दृष्टिकोन नेमकेपणाने लक्षात येतो. स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील ग्रामीण रचनेची कल्पना करताना परिसरातीलच साधनांचा वापर करूनच निसर्गसुसंगत घरे बांधली जावीत, गावपरिसर आणि पाणवठे स्वच्छ असावेत, लोकांच्या व पाळीव गुरांच्या अन्नाची स्वयंपूर्णता आणि इतर गरजांची पूर्तता गावातील अथवा पंचक्रोशीतील संसाधनांमधूनच व्हावी, ही त्यांची दृष्टी होती. तसेच स्थानिक पातळीवरील उद्योगांमधून रोजगारनिर्मिती, विजेची स्थानिक निर्मिती (त्या काळात हा विचार क्रांतिकारीच होता) आणि वापर, लोकांमधील साहचर्य व सहकार्य आणि श्रमाधारित शांत जीवन यावर त्यांचा भर होता.
मानवी उत्क्रांतीच्या दोन लाख वर्षांपैकी जवळपास ९९ टक्के काळ माणूस शिकारी व भटक्या अवस्थेत होता. सुमारे १२ हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागून मानवाचे स्थायी वास्तव्य सुरू झाले. यातून खेडी व पुढे नगरे वसली. या लोकवस्त्याही सुरुवातीला आकाराने लहान असल्याने लोकांचे सहजीवन परस्परावलंबी व परस्परपूरक होते. औद्योगिक क्रांतीनंतर मात्र शहरीकरण वेगाने होऊ लागले. १८०० च्या काळात जगात फक्त तीन टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहात होती, ती आता ५० टक्क्यांवर गेली आहे. आज जगातील ३५० कोटी जनता शहरात राहते, तर संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार २०३० साली ती ५०० कोटींवर जाईल. जगाच्या एकूण भूभागापैकी पैकी तीनच टक्के जमीन शहरांनी व्यापली आहे, पण जगात वापरल्या जाणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी ६० ते ८० ऊर्जावापर, तसेच एकूण कर्बउत्सर्जनापैकी ७५ टक्के उत्सर्जन शहरांकडून होते.
या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये लोकांमधील दुरावलेल्या परस्परसंबंधांचे, अस्वस्थ समाजजीवनाचे, संसाधनाच्या अन्याय्य वाटपाचे, पेयजलाच्या उपलब्धतेचे, प्रदूषणाचे, सांडपाण्याच्या व वाढत्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे, ऊर्जा पुरवठय़ाचे, सार्वजनिक आरोग्याचे, बेरोजगारीचे, कुपोषणाचे असे नवनवे प्रश्न अक्राळविक्राळ स्वरूपात उभे राहात आहेत. त्यामुळे झालेली तणावग्रस्तता आणि अस्वस्थ झालेली मानवी ऊर्जा सामाजिक असहनशीलता, दहशतवाद, सामूहिक क्रौर्य या स्वरूपात प्रकटते आहे. हजारो वर्षांत मानवाची जी सांस्कृतिक उत्क्रांती झाली त्यातून करुणा, प्रेम, दया व बंधुभाव अशी मूल्ये समाजात रुजविली गेली. तो वारसा आता संपल्यासारखा भासून माणसातील मूळ रानटी पशुत्वच जणू मानवी समूहांच्या गर्दीतील क्रूर वागणुकीतून प्रकट होताना दिसते. अनियंत्रित भांडवलशालीने निर्माण झालेली आत्यंतिक आर्थिक विषमता आणि त्यामुळे समाजातील तळच्या वर्गाची दारिद्य्राकडे होणारी वाटचाल सामान्य लोकांना पुन्हा अंधाराकडे लोटताना दिसते. औद्योगिक क्रांतीनंतरच्या गेल्या २५० वर्षांत मानव समाजाने अनिर्बंध हव्यासापोटी निसर्गाला ओरबाडून काढल्यामुळे जमीन- पाणी- हवा यांचे प्रदूषण, जैविक विविधतेचा ऱ्हास, जागतिक तापमानवाढ, हवामानबदल अशा नव्या समस्या आता निर्माण झाल्या आहेत. त्या संभाव्य भयावह परिस्थितीच्या निदर्शक आहेत.
निसर्गाच्या लुटीवर आणि सामाजिक विषमतेवर आधारित सध्याच्या विकासाच्या प्रारूपाविषयी भ्रमनिरास झाल्यामुळे जगभर काही जागरूक व्यक्ती व समविचारी लोकसमूह पर्यायांचा शोध घेत आहेत. त्यातूनच ‘हरित खेडय़ांची’ म्हणजे इको-व्हिलेजेसची चळवळ उभी राहिली. या चळवळीची सुरुवात १९६० /७०च्या दशकांत झाली. परंतु त्याचे स्वरूप तेव्हा विस्कळीत होते. १९९५ साली अशा समुदायांची जागतिक बैठक स्टॉकहोम येथे झाली. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ग्लोबल इकोव्हिलेज नेटवर्क’ (जीईएन) स्थापण्यात येऊन या चळवळीला स्थायी स्वरूप आले. २००८ साली जगात जवळपास अशी १५०० इकोव्हिलेजेस होती; त्यांची संख्या वाढत जाऊन २०१७ पर्यंत ती दहा हजारांवर गेली. अशा प्रत्येक इकोव्हिलेजमध्ये जवळपास ५० ते २५० लोकांचा सहभाग असतो, तर काही मोजक्या वसाहती मात्र हजारपेक्षा जास्त संख्येच्या आहेत. युरोपात इकोव्हिलेजेसची संख्या जास्त असली तरी जगातील सर्वच खंडांमध्ये ती विखुरलेली आहेत. या इकोव्हिलेजेसच्या आपसातील अनुभवांच्या आदानप्रदानाची आणि त्यांतील समन्वयनाची जबाबदारी ‘जीईएन’ सांभाळते. इकोव्हिलेजेस ही वेगळय़ा प्रकारची जीवनप्रणाली असून तिचा उद्देश आपली परिस्थितीकीय पदचिन्हे (इकॉलॉजिकल फूटिपट्र्स) कमी करून परस्परसंवादी समाजनिर्मितीच्या माध्यमातून निसर्गपूरक पद्धतीने गुणवत्तापूर्ण जगण्याचे पर्याय निर्माण करण्याचा आहे. इकोव्हिलेजेसच्या संकल्पनेचे तीन मूलाधार आहेत; ते गांधीविचारांशी साम्य राखून आहेत : (१) समुदायांचे स्थानीय स्वरूप, परस्परसंवाद व सहभागी पद्धतीने जगण्याची तयारी, (२) सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व पर्यावरणीय या चार अंगांनी साधावयाची शाश्वतता आणि (३) परिसरातील समाजाशी समरसतेची तयारी व पर्यावरण पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांशी बांधिलकी.
असे समुदाय उभे करताना या मूलभूत तत्त्वांवर विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते व त्याआधारेच अशा नव्या वसाहतींची बांधणी होते. अशा समुदायांत तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, कलाकार, संगीतप्रेमी अशा घटकांचा समावेश असल्यामुळे परिसरातील प्रश्नांना भिडताना प्रत्येकाचे कौशल्य व अनुभव कामी येताना दिसतात. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमधून काही ठिकाणी अक्षय ऊर्जानिर्मितीचे, अन्नोत्पादनातील स्वयंपूर्णतेचे, निसर्गसुसंगत सामूहिक घरबांधणीच्या नव्या तंत्रांचे, सांडपाण्याच्या यशस्वी व्यवस्थापनाचे, जीवनोपयोगी विविध साधनांच्या निर्मितीचे, सामूहिक वाहतुकीच्या पर्यायांचे यशस्वी प्रयत्न झालेले दिसतात.
अशा काही इकोव्हिलेजेसचा भर पर्यावरणीय उत्थापनाचा, तर काहींचा सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा असतो. प्रत्येक इकोव्हिलेजचे स्वरूप वेगळे असले तरी त्यांच्यात काही साम्येही असतात. जसे, अशा सर्व इकोव्हिलेजेसचा आपल्या परिसरातच शाश्वत पद्धतीने अन्न पिकवून अन्नाची स्वयंपूर्णता साधण्यावर भर असतो, तसेच त्यांचा ऊर्जावापरदेखील सौर /पवनऊर्जा, बायोगॅसनिर्मिती यांसारख्या अक्षय स्वरूपाचा असतो; ऊर्जानिर्मितीत या वसाहती बहुधा स्वयंपूर्ण असतात. त्यांच्या वसाहतीतील मुलांच्या औपचारिक वा अनौपचारिक शिक्षणातून सामाजिक बंधुभावाचे व पर्यावरणीय मूल्यांचे संस्कार केले जातात; तसेच जगण्यासाठीची कौशल्ये आणि भविष्यातील आव्हानांना भिडण्यासाठी आवश्यक असलेली विश्लेषणात्मक तंत्रेही पुढच्या पिढीला शिकवली जातात. बऱ्याच वसाहतींत जवळपास तीन पिढय़ा एकत्र राहतात, परंतु त्या एकाच कुटुंबातील असतील असे नव्हे; यातून मुलांना विविध वयोगटांतील लोकांसोबत सामूहिकरीत्या जगण्याचे भान येते. इकोव्हिलेजेसमधील पर्यायी जीवन पद्धतीचे प्रयत्न केवळ ग्रामीण भागातच होत नसून काही शहरांमधूनही सहजीवनाचे, परस्पर सहकार्याचे, कचरानिर्मितीचे प्रमाण कमी करण्याचे, पर्यायी ऊर्जेच्या वापराचे, घरांमध्ये कमी ऊर्जावापर होईल अशा सुधारणा करण्याचे, सार्वजनिक वाहतुकीवर भर देण्याचे, मोटारगाडय़ा, कपडे धुलाई यंत्रे यांसारख्या साधनांच्या सहभागी पद्धतीने वापराचे, सामूहिक जबाबदारीने मुलांच्या देखभालीचे इत्यादी प्रयोग होत आहेत.
अशा बऱ्याच इकोव्हिलेजेसमधून नव्याने केलेल्या आगळय़ावेगळय़ा प्रयत्नांचे फायदे समाजाच्या इतर भागासही झालेले दिसतात. बऱ्याच इकोव्हिलेजेसमधून आर्थिक मिळकतीचे पर्यायी मार्ग शोधले जातात. काही ठिकाणी पर्यायी अर्थव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत, तर इतरत्र स्थानिक परिसरात चालणारे पर्यायी चलनही अमलात आणले गेले आहे. अशा ठिकाणी त्या परिसरातील छोटय़ा उद्योजकांद्वारे, स्थानिक पातळीवर उत्पादन व वितरण आणि खरेदी अशी साखळी उभी करण्याचे प्रयत्न झाल्यामुळे स्थानीय अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होते.
भारतात पुदुचेरीमधील ऑरोव्हिल ही अशीच खूप मोठी वसाहत आहे. यात हरित ऊर्जेवरील बरीच तंत्रे विकसित करण्यात आली आहेत. इथे विकसित करण्यात आलेल्या आशियातील सगळय़ात मोठय़ा सौरचुलीवर जवळपास हजार लोकांचा स्वयंपाक होतो. मातीमध्ये अल्प प्रमाणात सिमेंट मिसळून तयार केलेल्या विटांपासून स्वस्त, मजबूत व स्थानिक हवामानाशी सुसंगत अशी अनेकमजली घरे बांधण्याचे जे तंत्र येथे विकसित करण्यात आले, त्याचा उपयोग दक्षिण आफ्रिकेतील ‘सस्टेनेबल इन्स्टिटय़ूट’मधील निवास परिसरातील घरे बांधण्यासाठी करण्यात आला आहे. भारतात सौर वीजनिर्मितीचा प्रसार होण्याआधीच्या काळात ऑरोव्हिलमध्ये हे तंत्र वापरात होते.
आज आपल्या देशात भूक, कुपोषण, आर्थिक विषमता, मानवी विकास, सुख यांचे जे जागतिक निर्देशांक आहेत त्या संदर्भात खूपच घसरण झाली आहे; खेडी अधिक बकाल आणि शहरे विद्रूप होताना दिसताहेत. कोविड प्रकोपाच्या काळात जीवनाची भयावहता जशी तीव्रतेने जाणवली, तशीच केवळ आर्थिक संपन्नताही किती कवडीमोलाची असते हेही ध्यानात आले. अशा परिस्थितीत भ्रमनिरास झालेल्या परंतु अर्थपूर्ण जगण्याचा शोध घेणाऱ्या सुजाण नागरिकांद्वारे काही सजग खेडय़ांशी जोडून घेऊन समुचित तंत्रज्ञानाच्या आधारे अशा पर्यायी जीवनव्यवस्था निर्मितीचे प्रयत्न होण्याला खूप वाव आहे.
इकोव्हिलेजेसच्या या चळवळीमधून आज भेडसावणारे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे. परंतु निसर्गाला हानीकारक अशा प्रचलित व्यवस्थांऐवजी परिसराला समृद्ध करीत सामूहिक जगण्यातून आपलेही जीवन गुणवत्तापूर्ण करावे अशी आस या उपक्रमांमध्ये दिसते. अशा सामूहिक प्रयत्नांमधूनच आजच्या व उद्याच्याही समाजाच्या काही समस्यांची उकल होण्यात मदत होईल, अशी आशा ठेवण्यास हरकत नाही.
लेखक जैवशास्त्रज्ञ असून शाश्वत विकास व शाश्वत शेती या विषयांचे अभ्यासक आहेत.
vernal.tarak@gmail.com