सिद्धार्थ खांडेकर
अमेरिकेमध्ये क्रिकेटचे अस्तित्व अर्थातच ब्रिटिशांमुळे वर्षांनुवर्षे होते. परंतु क्रिकेट लोकप्रिय होण्याचे आणि त्याला फ्रँचायझी क्रिकेटच्या स्तरापर्यंत नेण्याचे श्रेय अर्थातच भारतीयांना द्यावे लागेल..
खेळांच्या व्यावसायिकीकरणाचे आणि व्यापारीकरणाचे एक प्रमुख केंद्र म्हणजे अमेरिका. जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि सर्वाधिक सुस्थिर देशाचे हे वैशिष्टय़ अर्थातच आश्चर्यकारक नाही. पण अमेरिकेमध्ये बहुत करून ज्या खेळांचे आणि खेळाडूंचे भले होते, ते प्राधान्याने त्याच देशात खेळले जातात. बेसबॉल आणि अमेरिकन धाटणीचे रग्बी म्हणजे अमेरिकन फुटबॉल; उत्तर अमेरिका, उत्तर युरोपात खेळले जाणारे आइस हॉकी आणि जागतिक व्याप्ती असलेले पण व्यावसायिक लीगच्या रूपाने अमेरिकेतच यशस्वी ठरलेले बास्केटबॉल असे हे मोजके खेळ. आता आर्थिक उन्माद म्हणूनही असेल, पण हे खेळ जगात पोहोचावेत किंवा त्यांचे जागतिकीकरण व्हावे वगैरे तात्त्विक फंदात अमेरिकन कधी पडले नाहीत, पडत नाहीत. याचा एक तोटा म्हणजे इतर खेळांचा विकास तितकासा होताना दिसत नाही. टेनिसमध्ये एके काळी या देशाचा विलक्षण दबदबा. परंतु एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत चमकतील असे टेनिसपटू आज तेथे अभावानेच घडताना दिसतात. ॲथलेटिक्स, जलतरण या बहुविध प्रकारांतील ऑलिम्पिक खेळांमध्ये तेथील प्रशिक्षण व्यवस्था टिकून आहे. त्यातून विजेतेही निर्माण होत असतात. तरी त्यांचे व्यावसायिकीकरण झाले नाही. तीच बाब फुटबॉलची. विश्वचषक स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून अमेरिकेचा संघ खेळतोय. कॉसमॉससारख्या क्लबकडून साक्षात पेले खेळले. पण त्या वेळी आणि आताही मावळतीला निघालेल्या फुटबॉलपटूंचा ‘पेन्शनर्स क्लब’ ही मेजर लीग सॉकरची ओळख मिटू शकलेली नाही. युरोपात खेळून झाले आणि मनासारख्या संधी वा क्लब लाभेनासे झाले, की बरेचसे खेळाडू अटलांटिक ओलांडून अमेरिकेची वाट धरतात. यातून त्या देशात उत्तमोत्तम फुटबॉलपटू निर्माण झाले असे काही घडलेले नाही. १९९४ मध्ये अमेरिकेत विश्वचषक भरवला गेला, त्या वेळी अमेरिकेत फुटबॉल लोकप्रिय करण्याचा तो प्रयत्न असल्याचे सांगितले गेले. २०२६ मधील विश्वचषकाचे अमेरिका संयुक्त यजमान आहेत. तरी या खेळाच्या लोकप्रियतेत फार फरक पडला आहे असे दिसत नाही.
फुटबॉलला जमले नाही, ते क्रिकेटला जमेल का अशी शक्यता तपासून पाहायला हरकत नाही. निमित्त आहे मेजर लीग क्रिकेटचे. अमेरिकेतली ही पहिलीच फ्रँचायझी क्रिकेट लीग जुलै महिन्यात होणे अपेक्षित आहे. लीगची बातमी जुनीच. ताजी बातमी आहे, ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्याने या लीगबरोबर जाहीर केलेल्या भागीदारीची. वॉशिंग्टन डीसी फ्रँचायझीबरोबर न्यू साउथ वेल्सने करार केला असून, त्याअंतर्गत या राज्याचे काही खेळाडू मेजर लीग क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन डीसी संघाकडून खेळू शकतात. याशिवाय न्यू साउथ वेल्समधील क्रिकेट सुविधांचा वापर वॉशिंग्टन डीसीच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंना करता येईल. ऑस्ट्रेलियातील निम्नस्तरीय क्रिकेटमध्ये सहभागी होऊन अनुभवसंपन्नही होता येईल. न्यू साउथ वेल्स हा ऑस्ट्रेलियातील सर्वात बलाढय़ स्थानिक संघ. तेथील सरकारने अमेरिकेतील एका फ्रँचायझी संघाबरोबर जाहीर केलेली भागीदारी उल्लेखनीय म्हणावी लागेल. ऑस्ट्रेलियासारख्या मोठय़ा क्रिकेटप्रेमी आणि क्रिकेट सुविधायुक्त देशाकडून अशा प्रकारे मिळणारी मदत मोलाची ठरू शकते. भविष्यात ऑस्ट्रेलियातील आणखीही काही संघ अशा प्रकारे भागीदारी करू शकतात. पण ऑस्ट्रेलियातील अव्वल डोमेस्टिक संघाने भागीदारीसाठी अमेरिकन लीगच निवडण्याचे कारण काय असावे?
सध्या जगभर किमान अर्धा डझन लीग वर्षभर सुरू असतात. आयपीएल, बीबीएल, पीएसएल, सीपीएल, टी-२० ब्लास्ट, एसएलपीएल वगैरे. यात आता दक्षिण आफ्रिका आणि यूएईमधील लीगची भर पडली आहे. यांच्यात आयपीएल अर्थातच सर्वात मोठी आणि समृद्ध लीग. या लीगमधील फ्रँचायझीधारकांचा दक्षिण आफ्रिका आणि यूएईमधील लीगमध्ये मर्यादित सहभाग आहेच. या सगळय़ा मांदियाळीत आता अमेरिकन लीगची भर पडेल. जुलै महिन्यात डॅलसमधील नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रँड प्रेअरी स्टेडियममध्ये ती खेळवली जाईल. सहा संघ, १९ सामने आणि १७ दिवस असा कार्यक्रम आहे. डॅलस, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजलिस, वॉशिंग्टन डीसी, सिएटल आणि न्यूयॉर्क सिटी या शहरांमधील फ्रँचायझी सहभागी होतील. शाहरुख खानच्या मालकीच्या नाइट रायडर्स ग्रुपने लॉस एंजलिस ऑरेंज कौंटीमध्ये एक स्टेडियम बांधायला घेतले असून, तेच या फ्रँचायझीचे मालक ठरू शकतील. फ्रँचायझींची नावे निश्चित झालेली नाहीत. बहुतेकांचे मालक कोण असतील, मानधन मर्यादा किती राहील, अमेरिकेतील स्थानिक खेळाडू किती असतील हेही ठरायचे आहे. १९ मार्च रोजी स्पेस सेंटर ह्युस्टन येथे एका कार्यक्रमात अनेक बाबी आणखी स्पष्ट होतील.
अमेरिकेमध्ये क्रिकेटचे अस्तित्व अर्थातच ब्रिटिशांमुळे वर्षांनुवर्षे होते. परंतु क्रिकेट लोकप्रिय होण्याचे आणि त्याला फ्रँचायझी क्रिकेटच्या स्तरापर्यंत नेण्याचे श्रेय अर्थातच भारतीयांना द्यावे लागेल. संजय गोविल ही भारतीय व्यक्ती वॉशिंग्टन फ्रँचायझीची मुख्य प्रवर्तक आहे. तर मेजर लीग क्रिकेटचे सहसंस्थापक आहेत समीर मेहता. अमेरिकेत गेली कित्येक वर्षे भारतीय, पाकिस्तानी, श्रीलंकन, बांगलादेशी नागरिक स्थायिक होत आहेत. ही सगळीच मंडळी क्रिकेटप्रेमी. तरीही गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये सुशिक्षित, सधन, सुस्थापित भारतीयांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. यात गुजराती मंडळींचे प्रमाणही लक्षणीय आहे. या समाजाचे क्रिकेटप्रेम आणि गुंतवणूकप्रेम जगजाहीर असल्यामुळे अमेरिकेमध्ये फ्रँचायझी क्रिकेट आज ना उद्या सुरू होणारच होते. या सगळय़ा भानगडीत ऑस्ट्रेलियानेही अमेरिकेतील क्रिकेटकडे लक्ष द्यायला सुरुवात केल्याचे न्यू साउथ वेल्सच्या उदाहरणावरून लक्षात येईल. ऑस्ट्रेलियाचा मातबर फलंदाज स्टीव्ह स्मिथने विशेषत: न्यूयॉर्कमध्ये क्रिकेट खेळण्याविषयी अनेकदा बोलून दाखवले होते. जुलै महिन्यात लीग खेळवली जाणार असल्यामुळे कॅरेबियन लीग आणि हंड्रेड या दोन फ्रँचायझी स्पर्धाच्याच ती थोडीफार समीप राहील. यामुळे अनेक परदेशी क्रिकेटपटू मेजर लीग क्रिकेटकडे वळतील, असा विश्वास या लीगवाल्यांना वाटतो. अॅशेस मालिकेत यंदा खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना यंदा अमेरिकेत खेळता येणार नाही, कारण तारखा जुळत नाहीत. पण ऑस्ट्रेलियाच्या अनेक जणांना मुख्य संघात संधी मिळाली नाही, तर ते अमेरिकेत जाऊन खेळू शकतील. अर्थात सध्या या लीगचा जीव लहान आहे. शिवाय अजूनही डलास किंवा फार तर लॉस एंजलिस ऑरेंज कौंटी येथेच मैदाने उपलब्ध होतील. पण जसा पसारा वाढेल, तशी ही लीग इतर देशांच्या क्रिकेटपटूंना आकृष्ट करणारच नाही असे नाही. वेस्ट इंडीज किंवा कॅरेबियन देशांशी भौगोलिक जवळीक असल्यामुळे मेजर लीग क्रिकेटसाठी कॅरेबियन बेटांवरील युवा क्रिकेट गुणवत्ता ‘कॅचमेंट झोन’ ठरू शकते. इतर कोणत्याही फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याची परवानगी न देणारे बीसीसीआय हे जगातील एकमेव क्रिकेट मंडळ आहे. इतर मंडळांनी त्यांच्या क्रिकेटपटूंना तसा अटकाव केलेला नाही. ऑस्ट्रेलिया आणि यूएई हे भारतापेक्षा समृद्ध असले, तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा लहान आहे. अमेरिकेचे मात्र तसे नाही. यानिमित्ताने फ्रँचायझी क्रिकेटच्या दुनियेत प्रथमच आकाराने भारतापेक्षा मोठय़ा असलेल्या अर्थव्यवस्थेचा शिरकाव होतो आहे. अमेरिकेविषयी एकूणच जगभर आकर्षण असताना, क्रिकेटविश्वातील अनेकांसाठी एक मोठी संधी निर्माण होत आहे. ऑस्ट्रेलियन, कॅरेबियन, पाकिस्तानी आणि इंग्लिश क्रिकेटपटूंच्या दृष्टीने ही अतिरिक्त रोजगारसंधी मोलाची ठरू शकते. तसे झाल्यास क्रिकेटचे विद्यमान विश्व आणखी ढवळून निघेल. हे चांगले की वाईट, याविषयी चर्चा करण्याचे दिवस आता निघून चालले आहेत. क्रिकेटच्या इवल्याशा विश्वात एका बडय़ा देशाचे सूक्ष्म रूपातील आगमनही त्यामुळे स्वागतार्हच ठरते.
sidhharth.khandekar@expressindia.co