गेल्या आठवडय़ात चिमुकल्या केरळ राज्यात ‘केरला लिट फेस्ट’ (केएलएफ) झाले. राष्ट्रीय माध्यमांतून त्याबाबत ज्या बातम्या झळकल्या, त्यातून ठळक दिसली, ती व्यासपीठापासून प्रेक्षकांपर्यंत तरुणांची उपस्थिती. शिवाय भाषण- व्याख्यान- मुलाखती सोहळय़ांमध्ये ताज्या बुकर आणि इंटरनॅशन बुकर विजेत्यांची चर्चा. नोबेल विजेत्या लेखकांचे मार्गदर्शन वगैरेही तेथे झाले. पण सर्वात महत्त्वाचे हे नव्हतेच. ते होते देशभरात भाषांतर होऊन आधीच पोहोचलेल्या मल्याळी लेखकांच्या फौजेचे आपल्यातल्या चांगल्या लेखनाला आता आहे त्यापेक्षा अधिक अनुवादाद्वारे जगात कसे पोहोचवावे याचे मंथन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(गंमत म्हणजे याच आठवडय़ात चेन्नई इंटरनॅशनल बुक फेअरमध्ये तमिळमधून इंग्रजीत आणि भारतासह जगभरातील भाषांतून ३६५ कथनात्मक पुस्तके अनुवादित करण्याचे करार झाले आहेत) गेल्या दोन दशकांमध्ये इंग्रजी अनुवाद होण्यात आणि त्यांना पुरस्कार मिळण्यात केरळच्या जवळपासही कुणाला जाता आलेले नाही. तरीही जगाला आपले साहित्य कळावे यासाठी चालणारी मल्याळम भाषेची मनोहारी धडपड कौतुकास्पद.

बेन्यामिन या बहु-अनुवाद झालेल्या मल्याळी लेखकाच्या ‘माक्र्वेझ ईएमएस गुलाम अ‍ॅण्ड अदर स्टोरीज’या निवडक कथा वर्षांरंभी इंग्रजीत दाखल झाल्या आहेत. हे पुस्तक पुढल्या काही दिवसांत देशात आणि या लेखकाच्या परदेशी वाचकांत चर्चेचा विषय ठरणार आहे.

कथामग्न कॅनडा..

साहित्य अकादमी-राज्य पुरस्कारानंतर थेट कैलासवासी अमुक-तमुक यांच्या नामे चालणारे चिल्लरोत्तम रकमेचे शेकडो साहित्य पुरस्कारांचे मरहट्ट भूमीतले हट्ट अलीकडे ठळक दिसतात. पण त्या हट्टांतून जणू ‘सर्वोत्कृष्ट बेडूक’ स्पर्धा होत असल्यासारखी प्रांतीय-मैत्रमर्जीय हितसंबंधांना सुखावत आपापल्या डबक्यांना सजवण्याची चूष दिसून येते. कॅनडाची अ‍ॅलिस मन्रो ही आयुष्यभर फक्त कथाच लिहिणारी लेखिका नोबेल पारितोषिक मिळवती झाली तेव्हा ‘कथेपेक्षा कादंबरी श्रेष्ठ’ मानणारे जग अचंब्याच्या गर्तेत सापडले. पण कॅनडियन माणसांना अचंब्यापलीकडे आपल्या देशाच्या कथाप्रेमाचा सन्मान झाल्याचा आनंद अधिक झाला. कारण कथनात्मक साहित्यासाठी या देशात केवळ इंग्रजीत प्रसिद्ध होणारी २९ मासिके आहेत. सारीच राष्ट्रीय खपाची. त्यांतून येणाऱ्या साहित्यातून उत्तमोत्तम कथांचे संचदेखील एकापेक्षा अधिक. अन् कथाकारांसाठी योजलेल्या पुरस्कारांची संख्या जवळजवळ त्रेचाळीस. प्रत्येक पुरस्काराची रक्कम लेखकाला ओरडून सांगता येईल इतकी मोठी. ‘गव्हर्नर जनरल अवॉर्ड’ (१९३६ पासून), ‘स्कॉटिया बँक गिलर प्राईझ’(१९९४ पासून), कॅनडियन ब्रॉडकास्टिंग को-ऑपरेशनतर्फे चालवले जाणारे ‘सीबीसी शॉर्टस्टोरी अवॉर्ड’ यात झळकणारे लेखक अमेरिकी लेखकांइतकेच लोकप्रिय असतात. त्यांच्या कथा ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ या संचातही दाखल होतात आणि ‘बेस्ट कॅनडियन शॉर्ट स्टोरीज’मध्येही धडक देतात.

नाणावलेल्या लेखकांच्या कथा घेऊन निघणारा ‘बेस्ट कॅनडियन शॉर्टस्टोरीज’चा खंड नुकताच दाखल झाला असून त्यात गेल्या वर्षांत प्रसिद्ध झालेल्या सर्वोत्तम कथांचे एकत्रीकरण वाचायला मिळते. जेम्स. ए. मिशनर या पुलित्झर विजेत्या अमेरिकी लेखकाने ‘जर्नी’ या आपल्या पुस्तकाच्या मानधनातून या कथाखंडाची आजीवन तजवीज केली. आपल्या जवळच्या माथेरानमध्ये राहून ‘लाइफ ऑफ पाय’ ही कादंबरी पूर्ण करणारा यान मार्टेलदेखील १९९१ साली या जर्नी स्टोरीजमधून जगाला कळालेला. लेखक आणि साहित्य पुढे नेणारी संस्कृती जिथे असते, तिथेच दर्जावंत लेखन होण्याची शक्यता अधिक, हे कॅनडाच्या कथामग्नतेतून दिसते. 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malayalam writers in kerala lit fest of canadian short story writers alice munro zws